पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी मुंबईत 25 व्या ऊर्जा तंत्रज्ञान संमेलनाला केले संबोधित, शून्य कार्बन उत्सर्जन संकल्पनेच्या वचनबद्धतेचा मंत्र्यांनी केला पुनरुच्चार
जागतिक संकट काळातही भारताने ऊर्जा, अन्न आणि इंधन या तीन आघाड्यांवर अत्यंत चांगली कामगिरी केली आहे: केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी
Posted On:
15 SEP 2022 5:05PM by PIB Mumbai
मुंबई, 15 सप्टेंबर 2022
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज मुंबईत, भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या (MoP&NG) अंतर्गत, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने, सेंटर फॉर हाय टेक्नॉलॉजी (CHT) द्वारे आयोजित 25 व्या ऊर्जा तंत्रज्ञान मेळाव्याला संबोधित केले. देशातील नागरिकांसाठी ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या भारताच्या प्रगतीवर मंत्र्यांनी प्रकाश टाकला तसेच देशातील ऊर्जा मिश्रण अधिक शाश्वत आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या सरकारच्या योजनांची रूपरेषा सांगितली.
पूर्वी रिफायनिंग अँड पेट्रोकेमिकल्स टेक्नॉलॉजी मीट म्हणून ओळखल्या जाणार्या, ह्या वार्षिक ऊर्जा तंत्रज्ञान संमेलनात भारत आणि परदेशातील 1000 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. या वर्षी 15 ते 17 सप्टेंबर दरम्यान चालणारा हा कार्यक्रम, ऊर्जा क्षेत्राशी थेट संबंध असलेल्या अलीकडील काळातील प्रगती आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देणारा ठरला आहे. "नवीन ऊर्जा युगातील परिष्करण" या संकल्पनेअंतर्गत, 25 व्या ऊर्जा तंत्रज्ञान संमेलनात देशातील बदलत्या ऊर्जा परिदृश्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
या संमेलनाला संबोधित करताना, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले की, सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे निर्माण झालेली नवी आव्हाने समोर उभी असताना देखील, भारताने आपले शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य कायम ठेवले आहे. तसेच, भारत हायड्रोकार्बनच्या जगातून अशा जगात संक्रमण करण्यासाठी कटिबद्ध आहे, जिथे हरित आणि शाश्वत ऊर्जा आपली ऊर्जेची गरज भागवेल.
मंत्री म्हणाले की, जागतिक संकटांच्या पार्श्वभूमीवर भारताने ऊर्जा, अन्न आणि इंधन या तीन आघाड्यांवर अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. ऊर्जेची उपलब्धता आणि किफायतशीरतेची हमी देत जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संकटातून देशाला आत्मविश्वासाने मार्ग काढता आला. ते म्हणाले की, देशाचा दरडोई ऊर्जेचा वापर सध्या जागतिक सरासरीच्या एक तृतीयांश आहे आणि येत्या काही वर्षांत तो जागतिक सरासरी ओलांडेल. भारत 2030 मध्ये 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आणि 2047 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामुळे ऊर्जा मिश्रणात बदल करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
ऊर्जा क्षेत्रात देशाने केलेली प्रगती अधोरेखित करताना हरदीप सिंह पुरी म्हणाले की, आज आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन हे निवडीचे पर्याय राहिले नसून अनिवार्य घटक झाले आहेत. मे 2022 पर्यंत, भारताने आधीच 10% जैवइंधन मिश्रण उद्दिष्ट गाठले असून येत्या एक-दोन वर्षात 20% मिश्रणाचा टप्पा गाठणार आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनीही उपस्थित प्रतिनिधींना संबोधित केले आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील देशाच्या प्रगतीवर प्रकाश टाकला. देशातील ऊर्जा मिश्रणातील नैसर्गिक वायूचा वाटा सध्याच्या 6% वरुन 2030 पर्यंत 15% पर्यंत वाढवण्याच्या सरकारच्या संकल्पाची माहिती त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 2030 पर्यंत देशात 18 हजार कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने देशभरात सीएनजी आणि पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) दोन्हीची उपलब्धता अधिक चांगल्या प्रकारे सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या इतर उपाययोजनांची माहिती तेली यांनी दिली.
25 व्या ऊर्जा तंत्रज्ञान मेळाव्यात 15 तांत्रिक सत्रांमध्ये, एकूण 82 मौखिक शोध निबंध सादर केले जातील ज्यात 43 परदेशी कंपन्यांच्या निबंधाचा तर परदेशातील 24 वक्त्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, आघाडीच्या तेल कंपन्या, तंत्रज्ञान / सेवा प्रदात्यांनी आपले तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा याबाबत माहिती देणारे 16 प्रदर्शन स्टॉल्स देखील लावले आहेत.
R.Aghor /S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1859593)
Visitor Counter : 236