वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली, पुनर्रचित व्यापार मंडळाच्या पहिल्या बैठकीचे आयोजन
भारतात जास्त पारदर्शकता आणि व्यवसायसुलभता हवी – पियुष गोयल यांचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
13 SEP 2022 8:09PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत, पुनर्रचित व्यापार मंडळाची पहिली बैठक पार पडली. 2047 सालापर्यंत भारताला विकसित देश बनवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमध्ये निर्यात क्षेत्र हे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आहे, असे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा स्वातंत्र्यदिनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात याचे सूतोवाच केले होते, असे पियुष गोयल यावेळी म्हणाले.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतात मूलभूत परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, त्यामुळे विकसित राष्ट्र होण्याच्या भारताच्या प्रवासाला गती प्राप्त झाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपली धोरणे पारदर्शक, सातत्यपूर्ण, प्रामाणिक असली पाहिजे असे सांगत, लोकांना दिलेली वचने पूर्ण करण्याच्या दृष्टीने सरकारची धोरणे पुरेशी सक्षम असली पाहिजेत, असा विचारही त्यांनी मांडला.
नियमांचे पालन करण्यास लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच सर्व प्रक्रियांमध्ये पारदर्शकता आणण्याबरोबरच व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी मार्ग शोधण्याची गरज असल्याचे गोयल यांनी सांगितले. प्रामाणिक देश, अशी भारताची ओळख व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
येत्या 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉजिस्टिक धोरण जारी करतील, अशी घोषणाही गोयल यांनी यावेळी केली.
या बैठकीत उपस्थित विविध राज्यांच्या मंत्र्यांनीही आपापली मते व्यक्त केली, संबंधित राज्याच्या अनुषंगाने सूचना दिल्या तसेच केंद्र सरकारच्या व्यापार संदर्भातील प्रोत्साहनपर उपक्रमांना पाठिंबा दर्शविला.
***
S.Kakade/M.Pange/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1859059)
आगंतुक पटल : 279