जलशक्ती मंत्रालय
नैसर्गिक शेती' या संकल्पनेवर आधारित नदी पुनरुज्जीवनासाठी युवा वर्गाला प्रेरित करणे या विषयाला वाहिलेल्या वेबिनार मालिकेच्या 10 व्या सत्राचे, एनएमजीसीने केले आयोजन.
Posted On:
09 SEP 2022 10:11PM by PIB Mumbai
इग्नाइटिंग यंग माइंड्स रिजुव्हेनेटिंग रिवर म्हणजेच नदी पुनरुज्जीवनासाठी युवा वर्गाला प्रेरित करणे या विषयावरील वेबिनारचे 10 वे सत्र, 8 सप्टेंबर 2022 रोजी झाले. नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा अर्थात राष्ट्रीय स्वच्छ गंगा मोहीम, जल शक्ती मंत्रालय, भारत सरकारने, APAC न्यूज नेटवर्कच्या सहकार्याने, हा वेबिनार आयोजित केला होता. युवा वर्ग आणि विद्यार्थ्यांना, नदी संवर्धन आणि नदी माहात्म्याच्या प्रचाराला चालना देण्यासाठी उद्युक्त करण्याचा, या वेबिनारचा उद्देश होता. नैसर्गिक शेती, ही या वेबिनारची संकल्पना होती. अर्थ गंगा प्रकल्पा अंतर्गत, गंगा खोऱ्यात वसलेल्या राज्यांमधे होत असलेल्या नैसर्गिक शेतीची, युवावर्ग आणि विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारे माहिती मिळवून देणे कसे आवश्यक आहे, याविषयी या विशेष सत्रात चर्चा करण्यात आली.

प्रमुख भाषण करताना, राष्ट्रीय स्वच्छ गंगा मोहीमेचे महासंचालक, श्री जी. अशोक कुमार यांनी नमामि गंगे मोहिमेचा आढावा घेतला आणि गंगा नदी निर्मळ, तसेच सातत्याने प्रवाहित राहण्यासाठी उचलल्या जात असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. श्री कुमार यांनी, शेतातून नदीच्या पात्रात मिसळत असलेली रसायने, तसेच जैवविविधता आणि पाण्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी गंगा नदीच्या काठावर रसायनविरहीत शेती करण्याच्या गरजेवर, यावेळी बोलताना प्रकाश टाकला. ते म्हणाले की नैसर्गिक शेती हा अर्थ गंगा प्रकल्पाच्या सर्वात महत्वाच्या आधारस्तंभांपैकी एक आहे आणि गंगा पुनरुज्जीवनाशी संबंधित अनेक समस्या, नैसर्गिक शेती सोडवू शकते.

‘मोअर क्रॉप पर ड्रॉप’ (पाण्याच्या एका थेंबातून मोठ्या प्रमाणावर पीक) या घोषणेच्या एक पाऊल पुढे जात, त्यांनी, ‘मोअर नेट इन्कम पर ड्रॉप’ (पाण्याच्या एका थेंबातून अधिकाधिक निव्वळ उत्पन्न) ही मोहिम राबवण्याचे आवाहन केले. यामुळे नैसर्गिक शेतीद्वारे शेतकऱ्यांचा खर्च कमी करून, चलनाधारित अर्थव्यवस्थेत पिकांच्या विक्रीतून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नावर भर दिला जातो. रसायनांचा वापर कमी करणे आणि पीक उत्पादनासाठी नैसर्गिक साधनांचा वापर करणे, या बाबींशी ही प्रक्रिया निगडित आहे. कृषी क्षेत्रात 85 ते 90 टक्के पाण्याचा वापर होत असताना, नैसर्गिक शेतीमुळे आपण अर्थव्यवस्थेत पाण्याची 50 ते 70 टक्के बचत करू शकतो, असे त्यांनी नमूद केले. यामुळे पाण्याचा परिणामकारक वापर होईल आणि पिण्याच्या पाण्यासारख्या इतर कारणांसाठी वापरल्या जाणार्या पाण्याचीही बचत होईल.
शेतकऱ्यांचे नैसर्गिक शेतीच्या लाभांबाबत प्रबोधन करणे आणि त्यांच्या शेती करण्याच्या पद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी, नमामि गंगे मोहिमे मार्फत, अनेक वेळा शेतकऱ्यांशी संवाद आणि तज्ज्ञांशी चर्चा घडवून आणल्या जात आहेत, असे त्यांनी नमूद केले. सुरुवातीला मदतीचा हात पुढे करुन शेतकऱ्यांना आधार देण्याचे महत्त्वही त्यांनी विशद केले. या शेतकर्यांकडून येणार्या उत्पादनांची बाजारपेठेत ओळख निर्माण करण्यासाठी, पिकाच्या काढणीनंतर कोणती विपणन धोरणे राबवायची याबाबतही त्यांनी सल्ला दिला. यामुळे नैसर्गिक शेतीद्वारे पिके घेणार्या शेतकर्यांचे उत्पन्न वाढवायला तर मदत होईलच, शिवाय नमामि गंगेच्या नैसर्गिक शेती प्रकल्पाद्वारे लोकांचे नद्यांशी नाते जोडण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार होऊ शकेल, असं ते पुढे म्हणाले.
***
N.Chitale/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1858183)
Visitor Counter : 252