शिक्षण मंत्रालय
इंडोनेशियातील बाली येथे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा विविध बैठकांमध्ये सहभाग
शिक्षण 2030 कार्यक्रमाविषयी युनेस्कोच्या अतिरिक्त महा संचालकांबरोबर केली चर्चा
ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियाबरोबरच्या द्विपक्षीय बैठकांमध्ये शिक्षण आणि कौशल्य क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्याचे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आवाहन
Posted On:
02 SEP 2022 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2022
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधन यांनी आज इंडोनेशियातील बाली येथे युनेस्कोच्या अतिरिक्त महासंचालक स्टेफानिया गियानिनी यांची भेट घेतली.
शिक्षण 2030 कार्यक्रम पुढे नेण्यासाठी धर्मेंद्र प्रधान आणि स्टेफानिया गियानिनी यांच्यामध्ये अर्थपूर्ण संवाद झाला. यावेळी आगामी काळात भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जी-20 परिषदेमध्ये भाषा-आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या कार्यक्रमाला युनेस्कोने पाठिंबा देण्यासंबंधीही उभयतांमध्ये चर्चा झाली.
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज इंडोनेशियातील बाली येथे इंडोनेशियाचे शिक्षण मंत्री नदीम अन्वर मकरिम यांच्याबरोबर व्दिपक्षीय बैठक घेतली.
उभय मंत्र्यांनी दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक आणि कौशल्य विकासात भागीदारी आणखी वाढविण्यावर भर दिला. तसेच भारत आणि इंडोनेशिया यांच्यामध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या क्षमता ओळखण्यासंबंधी फलदायी चर्चा केली.
दोन्ही नेत्यांनी शिक्षण आणि कौशल्य,यांच्यासंबंधीचा अभ्यासक्रम तयार करणे, विद्यार्थ्यांची देवाण-घेवाण आणि संशोधन क्षेत्रामध्ये सहकार्याच्या संधींच्या शोधाबाबत चर्चा केली.
धर्मेंद्र प्रधान यांनी जी-20 आराखड्यानुसार शिक्षण आघाडी आणि शिक्षण मंत्र्यांची बैठक आयोजित केल्याबद्दल इंडोनेशियाचे आणि त्यांचे शिक्षण मंत्री नदीम यांचे अभिनंदन केले. भारताला दिलेल्या समर्थनाबद्दल आणि भारतातील शिक्षण तसेच कौशल्य विकास क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यासाठी दाखविलेल्या उत्सुकतेबद्दल कौतुक केले. यावेळी इंडोनेशियाच्या शिक्षण मंत्र्यांना भारत भेटीवर येण्याचे निमंत्रणही दिले.
केंद्रीय मंत्री प्रधान यांनी आज ऑस्ट्रेलियाच्या लहान बालकांचे शिक्षण आणि युवा व्यवहार मंत्री डॉ. अॅनी अली एमपी यांच्याबरोबर व्दिपक्षीय बैठक घेतली.
दोन्ही देशांमध्ये लहान बालकांचे शिक्षण आणि शालेय शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सखोल संबंध वाढविण्याच्या दिशेने उभय मंत्र्यांनी फलदायी चर्चा केली.
यानंतर मंत्री प्रधान म्हणाले की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उच्च शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकास या क्षेत्रामध्ये सक्रिय सहकार्य आहे. लहान बालके आणि शालेय शिक्षण यामध्ये आता कार्य केले तर उभय देशांतल्या मुलांना जीवनभर शिकण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक मजबूत आधार तयार होणार आहे.
* * *
S.Patil/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1856434)
Visitor Counter : 205