विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 सप्टेंबर 2022 रोजी सायन्स सिटी, अहमदाबाद येथे राज्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री परिषदेचे उद्घाटन करतील


सर्व 28 राज्यांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री, 8 केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक आणि 100 हून अधिक स्टार्ट अप आणि उद्योगांचे मुख्य कार्यकारी अधिकारी या दोन दिवसीय विज्ञान परिषदेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे: डॉ जितेंद्र सिंह

Posted On: 31 AUG 2022 9:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑगस्‍ट 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 सप्टेंबर 2022 रोजी सायन्स सिटी, अहमदाबाद येथे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान  मंत्र्यांच्या 2-दिवसीय विज्ञान परिषदेचे उद्घाटन करतील.

एका उच्चस्तरीय अधिकृत बैठकीनंतर आज येथे याची घोषणा करताना, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, यावेळच्या परिषदेला वेगवेगळ्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित, नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून वेगळे स्वरूप दिले जात आहे त्याचबरोबर मानवी जीवन अधिक सुकर करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची  कटिबद्धता दृढ केली जाणार आहे. देशभरात अधिक समन्वय साधून विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष पूरक व्यवस्थेला बळकटी देताना केंद्र आणि राज्यांमधील मतभेद दूर करण्यासाठीही  ही बैठक  मदत करेल, असे ते म्हणाले.

सर्व 28 राज्यांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री, 8 केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक, राज्यांचे प्रमुख अधिकारी - मुख्य सचिव, राज्यांमधील विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे प्रभारी प्रधान सचिव आणि डीएसटी,डीबीटी, डीएसआयआर, एमओइएस, डीएइ, डीओएस, आयसीएमआर, एमओइएफ अँड सीसी, एमएनआरइ , जलशक्ती यांसारखे भारत सरकारचे सर्व विज्ञान सचिव आणि 100 हून अधिक स्टार्ट अप आणि उद्योगांचे मुख्य कार्यकारी अधिकारी या दोन दिवसीय विज्ञान परिषदेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

डॉ.जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली की, या दोन दिवसीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेला एक नवीन आयाम मिळेल कारण यात अनेक कृती-आधारित निर्णय घेतले जातील. त्याचबरोबर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना राष्ट्रीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष धोरणाच्या(एसटीआय) धर्तीवर वैयक्तिक धोरण निर्धारित करण्यास सांगितले जाईल. मंत्री म्हणाले, सहकारी संघवादाच्या खर्‍या भावनेनुसार केंद्र सरकार राज्यांना त्यांची एसटीआय धोरणे तयार करण्यात मदत करेल. ते म्हणाले, केंद्र राज्यांसोबत त्यांच्या विशिष्ट विज्ञान-तंत्रज्ञानविषयक गरजा, आव्हाने आणि अंतर क्षेत्रे आणि उपाय विकसित करण्यासाठी संयुक्तपणे काम करेल.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, संशोधन आणि विकास, नवोन्मेष आणि उद्योजकता यांना प्रोत्साहन देऊन राज्यांमध्ये एसटीआय परिसंस्था मजबूत करण्यासाठी केंद्र-राज्य समन्वय आणि सहयोग यंत्रणा मजबूत करण्याच्या मोठ्या उद्दिष्टाच्या  दिशेने राज्यांनी त्यांची धोरणे आखण्यासाठी सक्रिय होण्याची गरज आहे.

 

* * *

S.Patil/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1855872) Visitor Counter : 138