सांस्कृतिक मंत्रालय
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्य योद्ध्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी संगीत नाटक अकादमीने आयोजित केला रंग स्वाधीनता महोत्सव
यंदाच्या महोत्सवात देशभरातील लोक गायन शैलींवर विशेष भर
Posted On:
30 AUG 2022 8:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑगस्ट 2022
भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, देशाला साम्राज्यवादाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्य योद्ध्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी संगीत नाटक अकादमीने रंग स्वाधीनता महोत्सव आयोजित केला होता. 27 ते 29 ऑगस्ट, 2022 या काळात मेघदूत सभागृहात हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
लोक-गायन शैलींवर विशेष भर देणारा यंदाचा महोत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरला. या महोत्सवात भारताच्या नऊ राज्यांमधील एकूण बारा संघ आणि सुमारे शंभर कलाकार सहभागी झाले होते. रंग स्वाधीनता महोत्सवात देशभरातील लोक संगीत परंपरांचे सादरीकरण करण्यात आले.
रंग स्वाधीनता महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात सुभाष नागदा आणि त्यांच्या सह- कलावंतानी सादर केलेल्या केहेरवा तालाच्या छटा आणि दिल दिया है, जान भी देंगे यासारख्या लोकप्रिय देशभक्तीपर सुरांच्या रचनेने झाली.
रंग स्वाधीनता महोत्सवाच्या दुसर्या दिवशी, चेतन देवांगन यांनी, हार्मोनियम, बँजो, ढोलक, तबला वादकांच्या साथीने आदिवासींच्या जीवनातील संघर्ष आणि संकटे, बिरसा मुंडा यांचे धैर्य आणि झारखंडमधील स्थानिक देवतांना केंद्रस्थानी ठेवून साजरे केले जाणारे उत्सव यावर, कथन सादर केले.
दास्तानगोई हे पर्शियन शब्द ‘दास्तान’ म्हणजे दीर्घ कथा आणि ‘गोई’ म्हणजे कथन या शब्दांचे मिश्रण आहे. प्रज्ञा शर्मा आणि हिमांशु बाजपेई हे या कथा-कथनाच्या कलेत निपुण आहेत. त्यांच्या ओघवत्या वाणीने राणी लक्ष्मीबाई यांची कथा नजरेसमोर साकार झाली.
कलाकारांनी स्वातंत्र्य चळवळीतील वीरांवर आधारित गाथा-गीत सादर केले. महोत्सवाच्या अंतीम दिवसाच्या सादरीकरणाची सुरुवात धर्मेंद्र सिंग यांनी रागिणी शैलीतील गायनाने स्वातंत्र्यसैनिकांना अर्पण केलेल्या आदरांजलीने झाली.
पोवाडा ही महाराष्ट्रात शौर्यगाथा सांगणाऱ्या गायनाची समृद्ध आणि लोकप्रिय पारंपरिक पद्धत आहे. पोवाडा गायनाने या प्रदेशाच्या सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय विकासातही महत्वाची भूमिका बजावली आहे. त्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून झाल्याचे मानले जाते. देवानंद माळी आणि सह-कलाकारांनी शिवाजी महाराजांच्या स्तुतीपर पोवाड्याने अगदी समर्पक सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी राणा प्रताप, भगत सिंह आणि लाल लजपत राय यांच्यासारख्या वीरांना आदरांजली वाहिली.
शैलेश श्रीवास्तव यांनी संस्कृत, हिंदी, उर्दू, भोजपुरी, अवधी, पंजाबी, सिंधी, हरयाणवी, हिमाचली, डोगरी आणि मराठी यासारख्या विविध भाषांमधील लोक-गीते गाऊन मोठी लोकप्रियता मिळवली आहे. शैलेश श्रीवास्तव आणि सह-कलाकारांनी सादर केलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना वंदन करणाऱ्या उत्तर प्रदेशमधील लोक-गीतांनी कार्यक्रमाची सांगता झाली.
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1855593)
Visitor Counter : 234