विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंग यांनी स्टार्टअपना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाशी (एमएसएमई) जोडण्याचे केले आवाहन
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आवश्यक धोरणात्मक बदलांसह सर्व उपाययोजना करत आहेत : डॉ. जितेंद्र सिंग
नवी दिल्ली येथे 8व्या इंडिया इंटरनॅशनल एमएसएमई आणि स्टार्टअप शिखरपरिषदेला आणि प्रदर्शनाला प्रमुख पाहुणे म्हणून केले संबोधित
Posted On:
26 AUG 2022 7:06PM by PIB Mumbai
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंग यांनी आज स्टार्ट-अपना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राशी जोडण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार एमएसएमई मजबूत करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक बदलांसह सर्व उपाययोजना करत आहे, असेही ते म्हणाले.
नवी दिल्ली येथे 8व्या इंडिया इंटरनॅशनल एमएसएमई आणि स्टार्टअप शिखरपरिषद आणि एक्स्पोला ते प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करत होते. या क्षेत्राने आत्मनिर्भर भारताला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि सरकारने गेल्या आठ वर्षांत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र मजबूत करण्यासाठी अर्थसंकल्पात त्या क्षेत्रासाठी भरीव वाढ केली आहे, असे त्यांनी सांगितले. सरकार जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी अन्य स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देत आहे आणि या प्रक्रियेत भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करत आहे, असेही त्यांनी पुढे नमूद केले.
एमएसएमईना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्याच्या मोदी सरकारच्या वचनबद्धतेची आठवण डॉ जितेंद्र सिंग यांनी करून दिली. महिन्याच्या 15 तारखेला, स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा उल्लेख करून ते म्हणाले, “मी खाजगी क्षेत्रालाही पुढे येण्याचे आवाहन करतो. जगावर वर्चस्व गाजवायचे आहे. आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नांपैकी एक म्हणजे जगाच्या गरजा पूर्ण करण्यात भारत मागे राहू नये हे आहे. एमएसएमई असले तरीही आम्हाला आमची उत्पादने शून्य दोष-शून्य प्रभाव ('झिरो डिफेक्ट-झिरो इफेक्ट')सह जगासमोर न्यावी लागतील. आपल्याला स्वदेशीचा अभिमान असायला हवा.”
त्यापूर्वी त्यांनी 8व्या इंडिया इंटरनॅशनल एमएसएमई आणि स्टार्टअप प्रदर्शनाच्या विविध स्टॉल्सना भेट दिली आणि काही एमएसएमई उद्योजकांशी संवाद साधला.
***
R.Aghor/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1854740)
Visitor Counter : 169