पंचायती राज मंत्रालय
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून हर घर तिरंगा कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील येत्या 12 ऑगस्टला पुणे येथील आगाखान पॅलेस आणि मेहता नैसर्गिक उपचार केंद्र (राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था) येथे राष्ट्रध्वज फडकविणार
Posted On:
10 AUG 2022 9:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2022
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा भाग म्हणून, भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी सुरु केलेल्या “हर घर तिरंगा अभियान” कार्यक्रमात, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील येत्या 12 ऑगस्टला पुणे येथील आगाखान पॅलेस हे ऐतिहासिक स्मारक आणि डॉ.मेहता यांचे नैसर्गिक उपचार केंद्र (आता राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्र) येथे भेट देऊन राष्ट्रध्वज फडकविणार आहेत. या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे कुटुंबीय तसेच शहीदांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात येईल तसेच या दोन्ही ऐतिहासिक ठिकाणी स्वातंत्र्य संग्रामातील नायकांना श्रद्धांजली वाहण्यात येईल.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सोहोळ्याचा भाग म्हणून असे ठरविण्यात आले आहे की हर घर तिरंगा अभियान कार्यक्रमाअंतर्गत विविध मान्यवर 11 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशातील स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित असलेल्या 400 महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देतील. पुण्याचा आगाखान पॅलेस आणि डॉ.मेहता यांचे नैसर्गिक उपचार केंद्र (आता एनआयएन) यांचा देखील यात समावेश आहे. राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमांना संसद सदस्य तसेच आमदार आणि इतर स्थानिक नेत्यांसह अनेक मान्यवर सहभागी होतील.
पुण्याच्या आगाखान पॅलेसला भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे स्थान आहे कारण स्वातंत्र्य चळवळीदरम्यान 9 ऑगस्ट 1942 ते 6 मे 1944 या कालावधीत महात्मा गांधी, त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी, सचिव महादेवभाई देसाई तसेच मीराबेन, प्यारेलाल नायर, सरोजिनी नायडू आणि डॉ. सुशीला नायर यांना या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आले होते.
एनआयएन अर्थात राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था महाराष्ट्रात पुणे येथे “बापू भवन” या ऐतिहासिक ठिकाणी वसलेली आहे. त्याकाळी ही संस्था “निसर्ग उपचार दवाखाना आणि आरोग्यभवन” या नावाने डॉ.दिनशॉ के. मेहता यांच्यातर्फे चालविली जात होती. गांधीजींनी वर्ष 1945 आणि 1947 दरम्यान एनआयएन संस्थेला सात वेळा भेट दिली आणि तेथे एकूण 156 दिवस वास्तव्य केले.
S.Kulkarni/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1850682)
Visitor Counter : 252