सांस्कृतिक मंत्रालय

मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिरात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 22 व्या भारत रंग महोत्सवाचे उद्‌घाटन


भारत रंग महोत्सवातील नाटकांमधील स्वातंत्र्यसैनिकांच्या गाथा नागरिकांसाठी प्रेरणादायी- महाराष्ट्राचे राज्यपाल

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) ने स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी पाच दिवसांच्या नाट्यमहोत्सवाचे केले आयोजन

Posted On: 09 AUG 2022 8:54PM by PIB Mumbai

मुंबई, 9 ऑगस्ट 2022

 

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात 22 व्या ‘भारत रंग महोत्सव'चे उद्घाटन केले. स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालय आणि पु. ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने मुंबईत 9 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट, 2022 दरम्यान हा पाच दिवसांचा नाट्यमहोत्सव आयोजित केला आहे. अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, निर्माते दिग्दर्शक सतीश कौशिक आणि ज्येष्ठ रंगकर्मी वाणी त्रिपाठी टिक्कू यांची या उद्घाटन समारंभाला विशेष उपस्थिती होती. राष्ट्रीय नाट्य विद्यालय (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा)चे संचालक, प्राध्यापक रमेश चंद्र गौड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आनंद पसरवण्यासाठी, जागरूकता वाढवण्यासाठी आणि आपल्या समृद्ध वारशाचे आणि संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी रंगभूमी हे महत्त्वाचे माध्यम आहे. एक राष्ट्र आणि समाज म्हणून आपण कसे असायला हवे हे दाखवण्यातही नाटकांची महत्त्वाची भूमिका आहे, असे राज्यपाल यावेळी म्हणाले. नॅशनल थिएटर फेस्टिव्हलमधील नाटकांमधून स्वातंत्र्यसैनिकांसारख्या महान व्यक्तींच्या कथा सांगितल्या जातात तेव्हा नागरिकांना त्यांचे गुण आत्मसात करण्याची प्रेरणा मिळेल असे राज्यपाल म्हणाले. एनएसडी मधून आणखी प्रतिभावान कलाकार पुढे येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अधिकाधिक चांगल्या रंगकर्मींनी समाजासाठी सकारात्मक योगदान द्यावे असे मत त्यांनी व्यक्त केले.

मुंबईतून 'भारत छोडो आंदोलनाला' प्रारंभ झाल्याला 80 वर्ष झाल्याची आठवण त्यांनी करून दिली. राज्यपालांनी भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान प्रदर्शित करणाऱ्या भारत रंग महोत्सवासाठी सर्वतोपरी शुभेच्छा दिल्या.

अभिनेत्री वाणी त्रिपाठी म्हणाल्या की एनएसडीने देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या कहाण्यांची  ओळख नाटकांतून करून दिली हे कौतुकास्पद आहे. आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. तरुणांना उत्सवाबद्दल आणि नाटकांमध्ये चित्रित केल्या जाणाऱ्या कथांबद्दल जागरूक करा, असे आवाहनही त्यांनी केले.

अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा हा स्तुत्य उपक्रम आहे आणि तो तरुण पिढीसाठी प्रेरणादायक आहे, असे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या.

एनएसडीचे संचालक प्राध्यापक रमेशचंद्र गौड यांनी सांगितले की, एनएसडीने यासाठी पुढाकार घेतला आहे. आझादी का अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शूर स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करत कारगिल एक शौर्यकथा नावाचे नाटक रंगवले. काही दिवसांपूर्वी कारगिल विजय दिवस होता, असेही ते म्हणाले.

हा महोत्सव जनतेसाठी खुला आहे. या महोत्सवात नामवंत रंगभूमीच्या नाटकांचे प्रदर्शन होणार आहे. उद्घाटन समारंभानंतर लगेचच, चंद्रकांत तिवारी यांनी दिग्दर्शित केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनावर आणि बलिदानावर आधारित आय एम सुभाष या हिंदी नाटकाचा प्रयोग झाला. भोपाळच्या  ‘The Rising Society of Art and Culture’ या संस्थेने हे नाटक बसविले आहे.

उद्या. 10 ऑगस्टला संध्याकाळी डॉ मंगेश बनसोड यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘ गांधी-आंबेडकर’ या हिंदी नाटकाचा प्रयोग होईल. मुंबईस्थित सम्यक थिएटर या संस्थेने हे नाटक बसविले आहे.

11 ऑगस्टला रुपेश पवार यांचं हिंदी नाटक ऑगस्ट क्रांती या नाटकाचा प्रयोग होणार आहे. नागपूरच्या राष्ट्रभाषा परिवार सामाजिक सांस्कृतिक संस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे.

12 ऑगस्टला सुनील जोशी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘टिळक आणि आगरकर या मराठी नाटकाचा प्रयोग होणार आहे. मुंबईच्या अभिजात नाट्य संस्था आणि श्री आर्यदुर्गा क्रिएशन्स यांचे हे सादरीकरण आहे. सर्व नाटकांचे प्रयोग संध्याकाळी सात वाजता होतील.

महोत्सवाची सांगता, 13 ऑगस्ट मोहम्मद नजीर कुरेशी दिग्दर्शित ‘रंग दे बसंती चोला’ नाटकाने होईल. भोपाळच्या कारवान थिएटर ग्रुपचे हे नाटक आहे.

मुंबईत पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत रंगकर्मी सहभागी होणार आहेत. भारत रंग मंचावरून त्यांचा सत्कार केला जाणार आहे.

या सत्कारमूर्तींच्या यादीत सोहनी कुमार, आनंद पांचाळ, उल्लास सुर्वेचंद्रशेखर वामन किरवडकर, रोहिदास पांगे, शरद सावंत, लहू राहुल, नयना आपटे, बाळू मामा घोडके, सुमिता देशपांडे आणि अभिराम भडकमकर यांचा समावेश आहे

या भारत रंग महोत्सवाचा (आझादी सेगमेंट) चा भाग म्हणून 16 जुलै ते 14 ऑगस्ट, 2022 या कालावधीत दिल्ली, भुवनेश्वर, वाराणसी, अमृतसर, बेंगळुरू आणि मुंबई येथे 30 नाटके सादर केली जात आहेत.

भारत रंग महोत्सव किंवा नॅशनल थिएटर फेस्टिव्हल हा 1999 मध्ये सुरू झाला. हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD), नवी दिल्ली ने आयोजित केलेला वार्षिक थिएटर फेस्टिव्हल आहे.

भारतीय रंगभूमीचे प्रॅक्टिशनर्स कलाकृतींचे प्रदर्शन करण्यासाठी आणि कालांतराने आंतरराष्ट्रीय कलाकारांना आकर्षित करण्यासाठी हा महोत्सव सुरू झाला.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ही भारतातील प्रीमियर थिएटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. भारत रंगमंचची सुरुवात भारतात रंगभूमीच्या वाढीस आणि विकासाला चालना देण्यासाठी करण्यात आली.

मूलतः सर्जनशील नाट्य कलाकारांच्या कार्याचे प्रदर्शन करणाऱ्या या राष्ट्रीय महोत्सवाची व्याप्ती आता  आंतरराष्ट्रीय झाली आहे

आता हा आशियातील सर्वात मोठा नाट्यमहोत्सव आहे.

 

S.Tupe/P.Jambhekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1850328) Visitor Counter : 259


Read this release in: English , Urdu , Hindi