आदिवासी विकास मंत्रालय

केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयातर्फे केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्याशी 378 एकलव्य आदर्श निवासी विद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या ‘संवाद’ या आभासी चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 09 AUG 2022 5:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2022

 

आंतरराष्ट्रीय मूळ निवासी दिनानिमित्त, केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा तसेच केंद्रीय आदिवासी व्यवहार तसेच जलशक्ती विभागाचे राज्यमंत्री विश्वेश्वर तुडू यांच्यासमवेत ईएमआरएस अर्थात एकलव्य आदर्श निवासी शाळांतील विद्यार्थ्यांचा ‘संवाद’ हा आभासी चर्चात्मक कार्यक्रम आयोजित केला. आजच्या या चर्चात्मक सत्रामध्ये 378 ईएमआरएस विद्यालये आभासी पद्धतीने सहभागी झाली होती.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशात द्रौपदी मुर्मू यांच्या रुपात एका आदिवासी राष्ट्रपतींची निवड झाल्याबद्दल एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्याकडे  आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना, केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी सांगितले की केंद्र सरकारने आदिवासी समुदायाच्या शिक्षणाचा प्रश्न मिशन मोडवर हाती घेतला असून आदिवासी व्यवहार मंत्रालय या समुदायाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी प्रयत्नशील आहे. ते म्हणाले की, आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने ही विद्यालये दर्जेदार शिक्षण देतात. परदेशी शिक्षणासह सर्व प्रकारचे उच्च शिक्षण घेण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्यासाठी केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालय या विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती देते अशी माहिती त्यांनी दिली. 

उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा म्हणाले की, आज आपण संपूर्ण जगातील मूळ स्थानिक लोकांचा आंतरराष्ट्रीय दिन साजरा करत आहोत. भारताचे राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू या आदिवासी समुदायातील महिलेची झालेली निवड हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे आणि त्यांचा इथपर्यंतचा प्रवास भारतातील सर्व आदिवासी नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे असे त्यांनी सांगितले. मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी झालेली निवड, भारतीय लोकशाहीचे सामर्थ्य दाखविते असे मत त्यांनी आजच्या विशेष दिनी नोंदविले.

या वर्षीच्या आदिवासी गौरव दिन सोहोळ्यानिमित्त एकलव्य विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा आणि इतर आदिवासी नेत्यांवर निबंध लिहून ते आदिवासी व्यवहार मंत्रालयाकडे पाठवावेत असे आवाहन केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी केले. ते पुढे म्हणाले की, आदिवासी संस्कृतीने जल, जंगल आणि जमीन यांचे महत्त्व समजून घेतले आहे. एकलव्य विद्यालयांत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी त्यांच्या विद्यालय परिसरात तसेच गावांमध्ये झाडे लावावीत आणि इतरांना देखील वृक्षारोपण अभियान हाती घेण्यासाठी प्रेरित करावे असे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना केले.

एकलव्य विद्यालयांतील सुमारे 1 लाख विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन देखील केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी केले.

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1850277) Visitor Counter : 315


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu