अर्थ मंत्रालय

आयकर विभागाचे मुंबईसह विविध ठिकाणी छापे

Posted On: 05 AUG 2022 9:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2022

 

आयकर विभागाने 28.07.2022 रोजी एका प्रख्यात म्युच्युअल फंड कंपनीच्या इक्विटीचे माजी फंड व्यवस्थापक आणि संबंधित शेअर ब्रोकर, मध्यस्थ आणि एंट्री ऑपरेटर यांच्या विरोधात तपास आणि जप्तीची कारवाई केली. ही तपास मोहीम, कंपनीच्या मुंबई, अहमदाबाद, वडोदरा, भूज आणि कोलकाता येथील 25 पेक्षा जास्त संकुलांमध्ये राबवण्यात आली.

या तपास मोहिमेमधून, कागदपत्रे आणि डिजिटल डेटाच्या स्वरूपातील गुन्हेगारी स्वरूपाचे विविध पुरावे हस्तगत करण्यात आले. विविध व्यक्तींकडून नोंदवण्यात आलेल्या शपथ पत्रांसह हस्तगत करण्यात आलेल्या अन्य पुराव्यांमधून प्रत्यक्षदर्शी पुरावे उघडकीला आले आहेत. यामधून असे आढळून आले आहे की संबंधित फंड मॅनेजर आणि मुख्य व्यापारी हे ब्रोकर्स/मध्यस्थ आणि परदेशातील विशिष्ट अधिकारक्षेत्रातल्या व्यक्तींना व्यापाराशी संबंधित विशिष्ट माहिती पुरवत होते. दोषी व्यक्तींनी या माहितीचा वापर करून शेअर बाजारात स्वतःच्या अथवा आपल्या ग्राहकाच्या खात्याद्वारे व्यवहार करून बेकायदेशीरपणे नफा कमावला. फंड मॅनेजर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह या व्यक्तींनी आपल्या  जबानीमधून  कबूल केले आहे की वरील व्यवहारातून प्राप्त झालेली बेहिशेबी रोकड मुख्यतः कोलकाता येथील शेल संस्थांद्वारे त्यांच्या बँक खात्यांमध्ये पाठवली गेली. या बँक खात्यांमधून ही रक्कम भारतामधील कंपन्या/संस्थांची बँक खाती आणि कमी कर लागू असलेल्या अन्य अधिकार क्षेत्रात वळवण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या पुराव्यांमधून  माजी फंड मॅनेजर, मध्यस्थ, शेअर ब्रोकर्स आणि एंट्री ऑपरेटर यांच्यातील संबंध उघडकीला आला आहे. रोख कर्ज, मुदत ठेवी, स्थावर मालमत्ता आणि त्यांचे नूतनीकरण इत्यादींमधील  मोठ्या प्रमाणातील बेहिशेबी गुंतवणुकीचे पुरावे देखील हस्तगत करण्यात आले आहेत. 20 पेक्षा जास्त लॉकर्स गोठवण्यात आले आहेत. आतापर्यंत रु. 55 कोटी पेक्षा जास्त बेहिशेबी ठेवींचा तपास लागला आहे.

पुढील तपास सुरू आहे.

 

S.Patil/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1848922) Visitor Counter : 132


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu