पंतप्रधान कार्यालय

गुजरातच्या धरमपूर येथे श्रीमद राजचंद्र मिशनच्या विविध प्रकल्पांच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 04 AUG 2022 9:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2022

नमस्कार,

नमस्‍कार, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, श्रीमद रामचंद्रजी यांचे विचार साकार करण्यासाठी रात्रंदिवस झटणारे राकेश जी, संसदेतील माझे सहकारी सी. आर. पाटिल जी, गुजरातचे मंत्री, या पुण्यदायी कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, महिला आणि पुरुषगण,  

आपल्याकडे शास्त्रांमध्ये म्हटले आहे की -

सहजीवती गुणायस्य, धर्मो यस्य जीवती।

म्हणजे ज्याचे गुणधर्म, ज्याचे कर्तव्य जिवंत राहते, तो जिवंत राहतो, अमर राहतो. ज्याचे कर्म अमर असते, त्याची ऊर्जा आणि  प्रेरणा पिढ्यानपिढ्या समाजसेवा करत राहतात.

धरमपुरच्या श्रीमद राजचंद्र मिशनचा आजचा हा कार्यक्रम याच शाश्वत भावनेचे प्रतीक आहे. आज मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचे लोकार्पण झाले आहे, पशु रुग्णालयाची पायाभरणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर, महिलांसाठी सर्वोत्कृष्टता केंद्रांचे बांधकाम देखील आजपासून सुरु होत आहे. यामुळे गुजरातच्या ग्रामीण, गरीब आणि आदिवासी, विशेषतः दक्षिण गुजरातच्या  नागरिकांना, आपल्या माता भगिनींना मोठा लाभ होईल. या  आधुनिक सुविधांसाठी मी राकेश जी यांना, या संपूर्ण मिशनला, तुम्हा सर्व भक्तगणांचे आणि सेवाव्रतींचे जितके आभार मानू, तेवढे कमी आहेत, जेवढे अभिनंदन करू, तेवढे कमी आहे.

आणि आज जेव्हा माझ्यासमोर धरमपुर इथे एवढा विशाल जनसमुदाय दिसत असताना, मनात होतेच की आज मला  राकेशजी यांचे अनेक विचार ऐकण्याची संधी मिळेल, मात्र त्यांनी खूपच संक्षिप्त स्वरूपात आपले विचार मांडले. त्यांनी रणछोड़दास मोदी जी यांचे स्मरण केले. मी या परिसराशी खूप परिचित आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी मी तुमच्यासोबत असायचो, कधी धरमपुर, कधी  सिधुंबर. तुम्हा सर्वांच्या बरोबर असायचो, आणि आज जेव्हा एवढा मोठा विकासाचा फलक पाहत आहे  आणि तिथल्या लोकांचा अमाप उत्साह पाहत आहे, आणि मला या गोष्टीचा  आनंद होत आहे की मुंबईचे लोक इथे येऊन सेवा कार्यात सहभागी झाले आहेत.

गुजरातच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे सहभागी होतात. परदेशातून देखील लोक इथे येतात. म्हणूनच श्रीमद राजचंद्रजी यांनी एका मूक सेवकाप्रमाणे समाज भक्तिचे जे बीज पेरले आहे, त्याचे आज वटवृक्षात रूपांतर होत आहे. ते आपण अनुभवू शकतो.

मित्रांनो,

श्रीमद राजचंद्र मिशनशी माझे जुने नाते आहे. मी तुमचे समाजकार्य इतक्या जवळून पाहिले आहे की जेव्हा हे नाव ऐकतो, तेव्हा मन तुम्हा सर्वांप्रति सन्मानाने भरून येते. आज जेव्हा देश स्वातंत्र्याच्या 75 वर्षाचे पर्व साजरे करत आहे, अमृत महोत्सव साजरा करता आहे, तेव्हा आपल्याला या  कर्तव्य भावनेची सर्वात जास्त गरज आहे. या पवित्र भूमीत, या महान भूमीत, या पुण्यभूमीत आपल्याला जितके मिळाले आहे, त्याचा एक अंश देखील आपण समाजाला परत देण्याचा प्रयत्न केला तर समाजात आणखी वेगाने बदल घडून येईल. मला नेहमी खूप आनंद होतो की पूज्य गुरुदेव यांच्या नेतृत्वाखाली श्रीमद राजचंद्र मिशन गुजरातमध्ये ग्रामीण आरोग्य क्षेत्रात प्रशंसनीय कार्य करत आहे.  गरीबांच्या सेवेप्रति या वचनबद्धतेला या नव्या रुग्णालयामुळे आणखी बळ मिळेल. हे रुग्णालय आणि संशोधन केंद्र ग्रामीण भागात आधुनिक सुविधा पुरवणार आहे. सर्वांसाठी उत्तम उपचार  सुलभ करत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत काळात निरोगी भारतासाठी देशाच्या स्वप्नांना बळ देणार आहे. ते आरोग्य क्षेत्रात  सबका प्रयास भावना अधिक मजबूत करणार आहे.

मित्रांनो,

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देश आपल्या त्या सुपुत्रांचे देखील स्मरण करत आहे, ज्यांनी भारताला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. श्रीमद राजचंद्रजी असेच एक संत पुरुष, ज्ञाता पुरुष, एक दूरदर्शी महान संत होते, ज्यांचे एक विराट योगदान या देशाच्या इतिहासात आहे. हे दुर्दैव आहे की भारतचे  ज्ञान, भारताच्या खऱ्या शक्तीची देशाला आणि जगाला ओळख करून देणारे ओजस्वी नेतृत्व आपण खूपच लवकर गमावले.

स्वतः बापू, पूज्य महात्मा गांधी यांनी म्हटले होते की आपल्याला बहुधा अनेक जन्म घ्यावे लागतील, मात्र श्रीमद यांच्यासाठी  एकच जन्म पुरेसा आहे. तुम्ही कल्पना करा, महात्मा गांधी यांच्या विचारांना ज्यांनी प्रभावित केले, ज्या महात्मा गांधी यांना आज आपण जगाचे पथ प्रदर्शक मानतो, ज्या महात्मा गांधी यांच्या विचारांच्या प्रकाशात जग एका नव्या जीवनाचा शोध घेते, तेच पूज्य बापू आपल्या आध्यात्मिक चैतन्यासाठी श्रीमद राजचंद्रजी यांच्याकडून प्रेरणा मिळवायचे. मला वाटते, राकेशजी यांचा देश खूप ऋणी आहे, ज्यांनी श्रीमद् राजचंद्रजी यांचा ज्ञान प्रवाह  कायम ठेवला आहे आणि रुग्णालय उभारून या पवित्र कार्यात  राकेश जी यांची दूरदृष्टी देखील आहे, पुरुषार्थ देखील आहे आणि त्यांचे जीवन देखील आहे, मात्र तरीही हा संपूर्ण प्रकल्प रणछोड़दास मोदी यांना समर्पित केला, हे राकेश जी यांचे मोठेपण आहे. समाजाच्या गरीब, वंचित, आदिवासींसाठी अशा प्रकारे आपले जीवन समर्पित करणारी अशी व्यक्तिमत्वे देशाच्या चेतनेला जागृत ठेवत आहेत.

 मित्रांनो,

हे जे नवीन महिलांसाठी उत्कृष्टता केंद्र  बांधले जात आहे, ते  आदिवासी भगिनी आणि मुलींचे कौशल्य वाढवण्यासाठी आणि त्यांचे जीवन अधिक समृद्ध   करण्याच्या दिशेने हे आणखी एक मोठे पाऊल आहे.श्रीमद राजचंद्रजींना शिक्षण आणि कौशल्याच्या माध्यमातून मुलींच्या सक्षमीकरणाबद्दल अत्यंत तळमळ होती. त्यांनी लहान वयातच महिला सक्षमीकरणावर गांभीर्याने भाष्य केले. त्यांच्या एका कवितेत ते लिहितात-

उधारे करेलू बहु, हुमलो हिम्मत धरी

वधारे-वधारे जोर, दर्शाव्यू खरे

सुधारना नी सामे जेणे

कमर सींचे हंसी,

नित्य नित्य कुंसंबजे, लाववा ध्यान धरे

तेने काढ़वा ने तमे नार केड़वणी आपो

उचालों नठारा काढ़ों, बीजाजे बहु नड़े।

याचा अर्थ असा आहे की, मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे.हा समाज वेगाने सुधारण्यासाठी, समाजातील वाईट गोष्टींना आपण आणखी लवकर दूर करण्यासाठी त्यांनी महिलांना स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी खूप प्रोत्साहन दिले.  याचा परिणाम गांधींच्या सत्याग्रहांमध्ये स्पष्टपणे दिसून येतो, ज्यात महिलांचा मोठा सहभाग होता. स्वातंत्र्याच्या अमृत काळात देशाच्या स्त्रीशक्तीला राष्ट्रशक्तीच्या रूपाने समोर आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.आज भगिनी आणि मुलींना प्रगती करण्यापासून  रोखणारा प्रत्येक अडथळा दूर करण्याचा  प्रयत्न  केंद्र सरकार करत आहे.  या प्रयत्नांमध्ये जेव्हा समाज सहभागी होतो  आणि जेव्हा तुमच्यासारखे सेवाकर्मी याच्याशी जोडले जातात  तेव्हा नक्कीच वेगाने बदल घडतोच  आणि हाच बदल आज देश अनुभवत आहे.

मित्रांनो,

आज भारताने जे आरोग्य धोरण अवलंबले  आहे, त्यामध्ये आपल्या सभोवतालच्या प्रत्येक जीवाच्या आरोग्याची काळजी आहे.माणसांचे रक्षण करणाऱ्या लसीसह  भारत प्राण्यांसाठीही  देशव्यापी लसीकरण मोहीम राबवत आहे. लाळया आणि खुरकत या आजारांला  प्रतिबंध करण्यासाठी  देशात, गाई आणि म्हशींसह सर्व प्राण्यांना सुमारे 12 कोटी  लसी  देण्यात आल्या आहेत.त्यापैकी गुजरातमध्येच सुमारे लसीच्या 90 लाख मात्रा देत लसीकरण करण्यात आले आहे.उपचाराच्या आधुनिक सुविधांसोबतच आजारांना प्रतिबंध करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मला आनंद आहे की ,श्रीमद राजचंद्र मिशन देखील या प्रयत्नांना बळ देत आहे.

मित्रांनो,

अध्यात्म आणि सामाजिक उत्तरदायित्व या दोन्ही गोष्टी  एकमेकांना कशा  पूरक आहेत याचे गमक  म्हणजे  श्रीमद राजचंद्रजींचे जीवन आहे.अध्यात्म आणि समाजसेवेची भावना एकीकृत करण्यात आली. बळकट करण्यात आली त्यामुळे त्यांचा प्रभाव आध्यात्मिक आणि सामाजिक प्रत्येक बाबतीत सखोल आहे.त्यांचे हे प्रयत्न आजच्या युगात अधिक समर्पक आहेत. आज एकविसाव्या शतकात नवी पिढी, आपली तरुण पिढी उज्ज्वल भविष्याचे एक सामर्थ्य आहे.  या पिढीसमोर अनेक नव्या संधी, अनेक आव्हाने आणि अनेक नव्या जबाबदाऱ्याही आहेत. या तरुण पिढीमध्ये भौतिक बळ  नवोन्मेषाची इच्छाशक्ती  खूप आहे तुमच्यासारख्या संस्थांचे मार्गदर्शन या पिढीला कर्तव्याच्या मार्गावर वेगाने चालण्यास मदत करेल.मला विश्वास आहे की, श्रीमद राजचंद्र मिशन हे राष्ट्र विचार आणि सेवाभावाचे  अभियान समृद्ध करत राहील.

आणि तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत  आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मी दोन गोष्टी नक्कीच सांगेन की एक म्हणजे , आपण  सध्या कोरोना प्रतिबंधासाठी लसीच्या  प्रिकॉशन मात्रेची  मोहीम राबवत आहोत.ज्यांनी लसीच्या  दोन मात्रा  घेतल्या आहेत, त्यांना तिसरी मात्रा  स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात 75  दिवस विनाशुल्क देण्याची मोहीम सर्वत्र सुरू आहे.येथे उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठांना, माझ्या मित्रांना, माझ्या आदिवासी बंधू-भगिनींना माझी विनंती आहे की, जर तुम्ही प्रिकॉशन मात्रा घेतली  नसेल तर लवकर घ्या.ही  तिसरी  मात्रा  विनामूल्य  देण्यासाठी सरकार ही 75 दिवसांची मोहीमही राबवत आहे.याचा तुम्ही जरूर लाभ घ्या आणि आपण हे कार्य पुढे घेऊन जाऊया. आपल्या शरीराचीही काळजी घ्या, कुटुंबीयांचीही काळजी घ्या आणि गाव, वस्ती आणि परिसराचीही काळजी घ्या.आज जर मला  धरमपूरला प्रत्यक्ष येण्याची संधी मिळाली असती तर मला विशेष आनंद झाला असता, कारण धरमपूरच्या अनेक कुटुंबांशी माझे जवळचे संबंध आहेत, पण वेळेअभावी येऊ शकलो नाही.मी तुम्हा  सर्वांशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून  बोलत आहे.या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी राकेशजींचाही आभारी आहे. पण तिथे येण्याचा जेव्हा कधी कार्यक्रम ठरेल तेव्हा  मला या रुग्णालयाला  भेट देऊन खूप आनंद होईल.तुमचे सेवाकार्य  पाहून आनंद होईल.खूप वर्षापूर्वी आलो होतो, दरम्यान  खूप काळ लोटला आहे , पण परत येईन तेव्हा नक्की भेटेन आणि मी तुम्हाला तुमच्या  आरोग्यासाठी शुभेच्छा देतो आणि तुम्ही उभारत असलेल्या उत्कृष्टता केंद्राचा  सुगंध दिवसेंदिवस वाढत राहावा देशाच्या आणि जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचावा  यासाठी माझ्या  खूप खूप शुभेच्छा आहेत . खूप खूप धन्यवाद.

 

S.Tupe/Jaydevi PS/Sushama/Sonal C/PM

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1848682) Visitor Counter : 133