संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चंडीमंदिर येथे व्हिएतनामच्या लष्करासोबत "एक्स विनबॅक्स 2022" संयुक्त सराव

Posted On: 31 JUL 2022 9:13PM by PIB Mumbai

 

चंडीमंदिर येथे 01 ते 20 ऑगस्ट 2022 दरम्यान तिसरा व्हिएतनाम भारत द्विपक्षीय लष्करी सराव "एक्स विनबॅक्स 2022"   आयोजित करण्यात आला आहे. हा लष्करी सराव ,2019 मध्ये व्हिएतनाममध्ये यापूर्वी आयोजित केलेल्या द्विपक्षीय सरावाचा पुढचा भाग आहे आणि भारत आणि व्हिएतनाममधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी  एक महत्वाचा टप्पा आहे. भारत आणि व्हिएतनाममध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी असून  संरक्षण सहकार्य हा या भागीदारीचा प्रमुख आधार आहे.व्हिएतनाम हा भारताच्या पूर्वेकडील देशांसाठीच्या  धोरणाचा आणि हिंद- प्रशांत दृष्टिकोनाचा  महत्त्वाचा भागीदार आहे.

शांतता मोहिमांसाठी, संयुक्त राष्ट्र संघाचा भाग म्हणून अभियंता रेजिमेंट आणि वैद्यकीय पथकाची नियुक्ती आणि तैनाती ही या  ''एक्स विनबॅक्स2022"  या सरावाची संकल्पना आहे.  संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमांमध्ये सैन्य तैनात करण्याचा समृद्ध वारसा भारताला आहे आणि सर्वोत्कृष्ट पद्धतींचा समावेश करून संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये  प्रशिक्षण देण्याची आणि  संभाव्य संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांना  रणनीतिक,व्यवहार्य  आणि धोरणात्मक स्तरांवर प्रशिक्षण देण्याची सर्वोत्तम क्षमता भारताकडे आहे.

मागील दोन  द्विपक्षीय सरावांपेक्षा  अधिक  व्याप्तीसह ,क्षेत्रीय  प्रशिक्षण सराव म्हणून ''एक्स विनबॅक्स - 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. हा लष्करी सराव भारतीय लष्कर आणि व्हिएतनामी लष्कर यांच्यात परस्पर विश्वास, आंतर-कार्यक्षमता आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करेल.या संयुक्त सरावामुळे दोन्ही लष्कराच्या  तुकड्यांना एकमेकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाबद्दल जाणून घेण्याची संधी मिळेल. 105 अभियंता रेजिमेंट ही तुकडी भारतीय सैन्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

हा 48 तासाचा सराव, संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमांदरम्यान त्या  परिस्थितींमध्ये तांत्रिक लष्करी मोहिमा राबवताना, दोन्ही लष्करानी  प्राप्त केलेल्या मानकांचे मूल्यांकन करण्यासाठी असलेल्या योजनेचा एक भाग आहे. या सरावा दरम्यान, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण प्रात्यक्षिक आणि उपकरणांचे प्रदर्शन  नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी स्वदेशी उपायांचा वापर करून बचाव आणि मदतकार्य हाती घेण्याची भारताची क्षमता दर्शवेल.

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1846822) Visitor Counter : 272


Read this release in: English , Urdu , Hindi