नौवहन मंत्रालय
चाबहार बंदराच्या माध्यमातून मध्य आशियासमवेत व्यापार संधी खुल्या करण्याच्या दिशेने भारताचे काम - केंद्रीय नौवहन मंत्री
सीआयएस देशांपर्यंत पोहोचण्यासाठी चाबहार बंदराला आयएनसीटीसी अंतर्गत मालवाहतुकीचे केंद्र बनवण्याचा आमचा दृष्टिकोन- सर्बानंद सोनोवाल
शाहीद बेहेश्ती बंदर व्यवसायाच्या जलद विकासाला सहाय्यकारी ठरेल आणि मध्य आशियाई प्रदेशातील जीवनमान उंचावेल - श्रीपाद येसो नाईक
मध्य आशियातील देशांच्या उच्चस्तरीय राजनैतिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत मुंबईत ‘चाबहार दिवस’ साजरा
Posted On:
31 JUL 2022 5:39PM by PIB Mumbai
इराणमधील चाबहार बंदराचा वापर करून मध्य आशियाई क्षेत्रासमवेत व्यापार संधी खुल्या करण्याच्या दिशेने भारताच्या वचनबद्धतेचा केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी पुनरुच्चार केला. 'चाबहार दिवस' निमित्त,चाबहार विकास प्रकल्प येथे असलेल्या शाहिद बेहेस्ती बंदराच्या कामात सहभागी होण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या इंडियन पोर्ट्स ग्लोबल लिमिटेडच्या (आयपीजीएल ) सहकार्याने केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने मुंबईत एका परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत केंद्रीय मंत्री सोनोवाल आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी मध्य आशियाई देशांच्या उच्चस्तरीय राजनैतिक प्रतिनिधींशी संवाद साधला. ''स्वतंत्र देश राष्ट्रकुल (सीआयएस) देशांपर्यंत पोहोचण्यासाठी, चाबहार बंदराला आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक मार्गिका( आयएनसीटीसी) अंतर्गत मालवाहतुकीचे केंद्र बनवण्याचा आमचा दृष्टिकोन आहे'' , असे सोनोवाल यांनी सांगितले.
भारत आणि मध्य आशिया दरम्यान मालवाहतुकीला किफायतशीर करण्याचा भारतीय दृष्टीकोनातून, आयएनसीटीसीची सुरुवात म्हणून चाबहार दिवस" साजरा केला जातो. इराणमध्ये असलेले चाबहार बंदर हे या प्रदेशाचे आणि विशेषतः मध्य आशियाचे व्यापारी वाहतुक केंद्र आहे.
कझाकस्तान प्रजासत्ताक, किरगिझस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तानचे राजदूत, इराणची बंदरे आणि सागरी संस्थेच्या बंदर आणि आर्थिक व्यवहार विभागाचे उपप्रमुख जलील इस्लामी, अफगाणिस्तानच्या महावाणिज्यदूत झकिया वारडॅक, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे महावाणिज्यदूत ए. एम. अलीखानी, मसूद ओस्ताद होसेन, भारतीय बंदरे संस्थेचे अध्यक्ष राजीव जलोटा, परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव जे. पी सिंह आणि इंडियन पोर्ट्स ग्लोबल लिमिटेडचे, (आयपीजीएल) व्यवस्थापकीय संचालक सुनील मुकुंदन या कार्यक्रमाला उपस्थित होते.
चाबहार बंदर समृद्ध मध्य आशियाई प्रदेशाला दक्षिण आशियाई बाजारपेठांशी जोडते.व्यापार, आर्थिक सहकार्यासाठी आणि दोन भौगोलिक प्रदेशांमधील लोकांना जोडण्यासाठी ते महत्वाचे बंदर म्हणून उदयाला येते आहे, असे सोनोवाल यांनी पुढे बोलताना सांगितले. मध्य आशियाई बाजारांच्या क्षमतेमुळे, भारताच्या नेतृत्वाखालील संपर्क सुविधेने मध्य आशियाई देशांना हिंद महासागर क्षेत्रात सुरक्षित आणि व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य प्रवेश प्रदान केला आहे.
यामुळे कनेक्टिव्हिटी उपलब्ध होण्यासह आपल्या सांस्कृतिक आणि राजकीय संबंधांना आणखी पाठबळ देत गुंतवणूक देखील वाढेल, असेही ते म्हणाले. चाबहार येथील शाहिद बेहेश्ती बंदराची माल चढवण्याची आणि उतरवण्याची आता असलेली 8.5 दशलक्ष टन क्षमता प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर 15 दशलक्ष टनांपर्यंत वाढवली जाईल, असेही सोनोवाल यांनी सांगितले.
चाबहार येथील शाहिद बेहेश्ती बंदराला मालवाहतुकीचे केंद्र बनवणे आणि मध्य आशियाई देशांपर्यंत पोहोचण्यासाठी या बंदराला आयएनएसटीसीशी जोडणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे सर्बानंद सोनवाल यांनी आपल्या भाषणात सांगितले. मुक्त व्यापार क्षेत्राच्या प्रोत्साहनांचा वापर करण्यासाठी चाबहार येथील शाहीद बेहेश्ती बंदराचा फायदा व्यवसाय आणि लॉजिस्टिक कंपन्यांना होईल यादृष्टीने आम्ही उत्सुक आहोत. वाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी करण्याच्या दृष्टीने, भारतापासून इराण आणि मध्य आशियापर्यंत स्वस्त, कमी अंतराचा , जलद आणि अधिक विश्वासार्ह मार्ग बनवण्यासाठी सूचना द्याव्यात असे आवाहन सर्व प्रतिनिधी आणि संबंधितांना असल्याचे सोनोवाल यांनी सांगितले.
येत्या काही वर्षांमध्ये, शाहिद बेहेश्ती बंदरातील व्यापारविषयक घडामोडी उद्योगाच्या जलद विकासाठी आणि प्रदेशातील जीवनमान उंचावण्यास मदत करतील, असे राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी सांगितले. या पायाभूत सुविधांमुळे या प्रदेशात व्यापार आणि गुंतवणुकीच्या शक्यतांचा विस्तार होईल, असेही त्यांनी सांगितले. “या व्यापार परिषदेमुळे शाहिद बेहेश्ती बंदराच्या माध्यमातून संधी निर्माण होतील आणि सागरी क्षेत्राचा अधिक विकास होण्यास मदत होईल” असे नाईक म्हणाले.
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1846790)
Visitor Counter : 236