युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

पहिल्या खेलो इंडिया महिला तलवारबाजी लीग स्पर्धेमध्ये ऑलिंपिकपटू भवानी देवी सहभागी होणार; या लीगच्या 3 टप्प्यांसाठी एकूण 1 कोटी 54 लाख रुपये मंजूर

Posted On: 22 JUL 2022 5:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जुलै 2022

 

नवी दिल्ली येथील तालकटोरा इनडोअर स्टेडीयममध्ये येत्या 25 जुलै रोजी पहिल्या खेलो इंडिया महिला तलवारबाजी लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन टप्प्यांमध्ये होणाऱ्या आणि 29 जुलैपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धा महिलांसाठी राष्ट्रीय पातळीवरील पहिल्याच तलवारबाजी स्पर्धा आहेत.

देशभरातील 20 राज्यांतून 300 हून अधिक महिलांनी या स्पर्धेत कॅडेट (17 वर्षांहून कमी वयाच्या), कनिष्ठ (20 वर्षांपेक्षा कमी वयाच्या), वरिष्ठ (20 वर्षांहून अधिक वयाच्या)स्पर्धक श्रेणीमध्ये सहभाग नोंदविला आहे. टोक्यो ऑलिंपिक तसेच टॉप्स अर्थात टार्गेट ऑलिंपिक पोडीयम योजनेत चमकदार कामगिरी करणारी भवानी देवी या स्पर्धेत वरिष्ठ श्रेणीमध्ये सहभागी होणार आहे. ती तामिळनाडू राज्याचे प्रतिनिधित्व करत आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या इतर टॉप्स खेळाडूंमध्ये जम्मू-काश्मीरची श्रेय गुप्ता, छत्तीसगडची वेदिका खुसी, हरियाणाची तनिष्का खत्री आणि शीतल दलाल यांचा समावेश आहे.

या स्पर्धेत सहभागी इम्फाळ,औरंगाबाद,गुवाहाटी आणि पतियाळा येथील भारतीय  क्रीडा प्राधिकरणाच्या( साई) राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राचे प्रतिनिधित्व करत आहेत. खेलो इंडिया महिला तलवारबाजी लीग स्पर्धा या महिलांसाठीच्या खुल्या राष्ट्रीय पातळीवरील मानांकन स्पर्धा असून एफएआय अर्थात भारतीय तलवारबाजी संघटनेच्या पोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि त्यांच्या संबंधित राज्यांनी नामनिर्देशित केलेल्या खेळाडू देखील त्यात भाग घेत आहेत.

ही स्पर्धा तीन टप्प्यांमध्ये घेण्यात येईल. पहिला आणि दुसरा टप्पा नवी दिल्ली येथे होणार आहे तर तिसऱ्या टप्प्यातील स्पर्धा पतियाळा येथे पार पडतील. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने या तिन्ही टप्प्यांच्या आयोजनासाठी एकूण 1 कोटी 54 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. प्रत्येक टप्प्यासाठी बक्षिसाची रक्कम 17 लाख 10 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय तलवारबाजी महासंघाच्या नियमानुसार या स्पर्धेत लीग पातळीवर सर्वोच्च पातळीवरील खेळाडूंमध्ये थेट बाद फेरीची पद्धत अनुसरली जाईल. खेलो इंडिया महिलांच्या तलवारबाजी स्पर्धेसह तालकटोरा स्टेडीयम मध्ये उपरोल्लेखित तारखांना पुरुषांच्या एफएआय मानांकन स्पर्धा देखील होणार आहेत. 

खेलो इंडिया महिलांची तलवारबाजी स्पर्धा हा खेलो इंडियाच्या महिला विभागासाठी केलेला आणखी एक उपक्रम असून त्याद्वारे विस्तृत प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत. यासाठी दिला जाणारा पाठिंबा केवळ अनुदानाच्या बाबतीत नव्हे तर योग्य प्रकारे संघटनआणि क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाच्या बाबतीत देखील दिला जात आहे. आतापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये खेलो इंडिया महिला तिरंदाजी राष्ट्रीय मानांकन स्पर्धा, खेलो इंडिया युवा महिला भारोत्तोलन राष्ट्रीय मानांकन स्पर्धा, खेलो इंडिया महिला कुस्तीच्या राष्ट्रीय स्पर्धा, खेलो इंडिया महिला हॉकी लीग (21 वर्षांखालील) तसेच खेलो इंडिया मुलींची फुटबॉल लीग स्पर्धा (17 वर्षांखालील) यांचा समावेश आहे.

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1843929) Visitor Counter : 125


Read this release in: English , Urdu , Hindi