ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारतीय मानक ब्युरोने, खेळण्यांची भौतिक सुरक्षितता, रसायनांपासून सुरक्षितता, ज्वलनशीलता, विद्युत सुरक्षितता यांच्याशी संबंधित सुरक्षिततेच्या पैलूंवर 10 भारतीय मानके केली प्रकाशित
Posted On:
21 JUL 2022 7:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जुलै 2022
भारतीय मानक ब्युरो, या भारताच्या राष्ट्रीय मानक संस्थेने खेळण्यांच्या भौतिक सुरक्षा, रसायनांपासून सुरक्षितता, ज्वलनशीलता, विद्युत सुरक्षा इत्यादींशी संबंधित 10 भारतीय मानके प्रकाशित केली आहेत. ही मानके खेळण्यांच्या निर्मितीमध्ये असुरक्षित आणि विषारी सामग्रीचा वापर प्रतिबंधित करतात.
या 10 मानकांपैकी 7 मानके 'खेळण्यांची सुरक्षितता' यावरील गुणवत्ता नियंत्रण आदेशाचा (QCO) भाग आहेत. हा गुणवत्ता नियंत्रण आदेश हे अनिवार्य करतो की, 14 वर्षाखालील मुलांसाठीची खेळणी, सुरक्षेची 7 भारतीय मानके (संलग्न केलेली यादीनुसार) पूर्ण करणारी आणि खेळणीवर भारतीय मानक ब्युरोच्या परवान्यानुसार मानक चिन्ह (ISI मार्क) असणे आवश्यक आहे. ही सरकारी मार्गदर्शक तत्त्वे 1 जानेवारी 2021 पासून लागू झाली आहेत.
भारतीय मानक ब्युरो, खेळणी उत्पादन प्रकल्पांना, उद्योगांच्या उत्पादन आणि चाचणी क्षमतेचे प्रत्यक्ष भेटीद्वारे मूल्यांकन करून तसेच भारतीय मानकांनुसार, भारतीय मानक ब्युरो प्रयोगशाळा किंवा भारतीय मानक ब्युरो मान्यताप्राप्त प्रयोग शाळेमधील खेळण्यांच्या चाचणीच्या आधारे परवाने देते. कोणत्याही व्यक्तीला भारतीय मानकांशी सुसंगत नसलेली आणि भारतीय मानक ब्युरोच्या परवान्यानुसार मानक चिन्ह म्हणजेच "ISI मार्क" नसलेली खेळणी विक्री करणे, खेळणी तयार करणे, आयात करणे किंवा वितरण करणे, साठवण करणे, भाड्याने घेणे, भाड्याने देणे किंवा प्रदर्शन करणे यासाठी परवानगी नाही.
परवाना मंजूर होण्यापूर्वी, खेळणी मुलांसाठी सुरक्षित आहेत याची खात्री करण्यासाठी विविध भौतिक, रासायनिक आणि विद्युत सुरक्षा आवश्यकतांसाठी कडक चाचण्या केल्या जातात. गुदमरण्याचा धोका, तीक्ष्ण टोक (शार्प पॉइंट टेस्ट) आणि तीक्ष्ण कडा (शार्प एज टेस्ट) ज्यामुळे त्वचेला छिद्र पडू शकते किंवा मुलाला इजा होऊ शकते, त्या तपासण्यासाठी चाचण्या केल्या जातात. खेळण्यांमधील अँटीमोनी, आर्सेनिक, बेरियम, कॅडमियम, क्रोमियम, शिसे, पारा आणि सेलेनियम यांसारख्या काही विषारी घटकांचे प्रमाण सुरक्षित मर्यादेत असल्याची खात्री करण्यासाठी रासायनिक चाचण्या केल्या जातात. पॉवर इनपुट, इलेक्ट्रिक स्ट्रेंथ, ओलावा प्रतिरोध, हीटिंग आणि असामान्य कार्य प्रणालीसाठी चाचण्या घेऊन खेळण्यांच्या इलेक्ट्रिकल पैलूंच्या संदर्भात सुरक्षितता सुनिश्चित केली जाते. तसेच यांत्रिक सामर्थ्य, बांधणी, स्क्रू आणि कनेक्शन, दोर आणि तारांचे संरक्षण, क्लिअरन्स आणि क्रिपेज अंतर, घटक, उष्णता आणि आग यांचा प्रतिकार इत्यादी चाचण्या देखील केल्या जातात.
भारतीय मानक ब्युरोने परवाना दिल्यानंतरही, खेळणी उत्पादन उद्योगांनी त्यांच्याद्वारे उत्पादित खेळण्यांची नियमितपणे चाचणी केली जाते याची खात्री करणे आणि तपासणी आणि चाचणीच्या परिभाषित आराखड्याचे पालन करणे आवश्यक आहे. बाजार आणि उद्योगांवर लक्ष ठेवण्याच्या क्रियेचा एक भाग म्हणून, भारतीय मानक ब्युरो परवानाधारक उत्पादन केंद्रावर लक्ष ठेवते तसेच कारखाने आणि बाजारातील खेळण्यांचे नमुने देखील घेते आणि त्यांची भारतीय मानक ब्युरो प्रयोगशाळा किंवा भारतीय मानक ब्युरो मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये त्यांची चाचणी घेते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील 800 पेक्षा जास्त खेळणी उत्पादकांनी भारतीय मानक ब्युरो प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.
ग्राहकांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांनी बाजारातून “ISI मार्क” असलेली सुरक्षित खेळणीच खरेदी केली आहेत. तसेच, “ISI मार्क” शिवाय कोणी खेळणी विकताना दिसल्यास ग्राहकांनी तक्रार करावी. या संबंधात बीएसआय केअर ॲपद्वारे (गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा) तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात किंवा complaints@bis.gov.in वरही तक्रार नोंदवता येते.
* * *
R.Aghor/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1843584)
Visitor Counter : 258