पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
14 राज्यांमधील 166 सीएनजी स्टेशन्सचे हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते लोकार्पण
Posted On:
15 JUL 2022 7:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जुलै 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार, नैसर्गिक वायूवर आधारित अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज 166 कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी )स्टेशन्सचे लोकार्पण केले. गेल (इंडिया) लिमिटेड आणि त्यांच्या समूह शहर गॅस वितरण (सीजीडी )कंपन्यांनी 14 राज्यांमधील 41 भौगोलिक क्षेत्रांमध्ये ही सीएनजी स्टेशन्स स्थापन केली आहेत.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव पंकज जैन आणि मंत्रालयातील तसेच तेल आणि वायू कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात पुरी यांनी व्हिडिओ लिंकद्वारे या सीएनजी स्टेशन्सचे लोकार्पण केले.
सीएनजी स्टेशनच्या जाळ्याच्या विस्तारासाठी गेल (इंडिया) आणि सर्व सहभागी समूह शहर गॅस वितरण कंपन्यांचे पुरी यांनी अभिनंदन केले.400 कोटी रुपये खर्चून सुरू केलेली ही सीएनजी स्टेशन्स ,देशात गॅस-आधारित पायाभूत सुविधा आणि स्वच्छ इंधनाची उपलब्धता अधिक बळकट करतील, असे त्यांनी नमूद केले. 2014 मध्ये असलेल्या सुमारे 900 सीएनजी स्टेशन्सच्या तुलनेत सध्या सीएनजी स्टेशन्सची संख्या 4500 पेक्षा अधिक झाली आहे, तसेच येत्या दोन वर्षांत ती 8000 पर्यंत वाढवली जाईल. पीएनजी जोडण्यांची संख्या देखील 2014 मधील सुमारे 24 लाखांच्या तुलनेत आता 95 लाखांवर पोहोचली आहे, असे त्यांनी सांगितले.अशा प्रमाणात सीएनजी उपलब्ध करून दिल्याने सीएनजी वाहनांच्या बाजारपेठेला प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे तसेच उत्पादन, कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीच्या बाबतीत याचा लक्षणीय परिणाम होईल, यावर पुरी यांनी भर दिला. या सीएनजी स्टेशन्समुळे सुमारे 1000 लोकांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनीही संबंधित चमूचे अभिनंदन केले आणि देशभरात पर्यावरण स्नेही इंधनाचा अधिकाधिक वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे,असे त्यांनी सांगितले.
पुरी यांनी भारतीय वाहन उत्पादक संस्थेद्वारे (एसआयएएम) आयोजित सीएनजी आणि एलएनजी आधारित स्वच्छ वाहतूक तंत्रज्ञान वाहनांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रदर्शनालाही भेट दिली.यावेळी बोलताना त्यांनी वाहन क्षेत्रात स्वच्छ इंधन आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करून वाहनांमधून होणारे उत्सर्जन कमी करण्याच्या गरजेवर भर दिला.सीएनजी आणि एलएनजी वाहनांची व्याप्ती वाढवण्यावरही भर देत त्यांनी वाहन कंपन्यांना ,संपूर्ण भारतात सीएनजी /एलएनजी वाहनांची उपलब्धता सुनिश्चित करण्याची विनंती केली.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाच्या 11व्या आणि 11 ए सीजीडी बोली फेरी अंतर्गत प्रदान केलेल्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये सुरु असलेलया शहर वायू वितरण संबंधित सुधारणा पूर्ण झाल्यानंतर ,भारतातील 98% लोकसंख्येला आणि त्यांच्या भौगोलिक क्षेत्राच्या 88% लोकांना नैसर्गिक वायू उपलब्ध असेल.
आजचा हा लोकार्पण कार्यक्रम देशातील वाहतूक क्षेत्र, घरे आणि उद्योगांसाठी पर्यावरण स्नेही आणि सोयीचे इंधन असलेल्या नैसर्गिक वायूची उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे.बहुतांश पारंपरिक इंधनांच्या तुलनेत नैसर्गिक वायू सुरक्षित आणि किफायतशीर आहे.
वायू -आधारित अर्थव्यवस्थेची सुरुवात करण्यासाठी, पंतप्रधानांनी प्राथमिक ऊर्जा मिश्रणात नैसर्गिक वायूचा वाटा 15% पर्यंत वाढवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे.2070 पर्यंत भारताचे निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट गाठण्यात वायू -आधारित अर्थव्यवस्थेचा विकास महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.
R.Aghor/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1841885)
Visitor Counter : 190