संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पूर्वावलोकन


वाय-3023 (दुनागिरी) युध्दनौकेचे जलावतरण

Posted On: 14 JUL 2022 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जुलै 2022

 

कोलकाता येथील गार्डन रीच जहाजबांधणी आणि अभियांत्रिकी कंपनीच्या गोदीत उद्या 15 जुलै 2022 रोजी प्रकल्प 17 ए श्रेणीतील दुनागिरी या युद्धनौकेचे हुगळी नदीत जलावतरण होईल. या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

उत्तराखंड राज्यातील पर्वतरांगांच्या नावावरून नामकरण करण्यात आलेली ही युद्धनौका म्हणजे पी17 ए श्रेणीतील चौथे जहाज आहे.ही नौका म्हणजे शिवालिक वर्गातील पी 17 श्रेणीतील युद्धनौकेतील स्टेल्थ वैशिष्ट्ये, आधुनिक शस्त्रास्त्रे आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन यंत्रणांमध्ये अधिक सुधारणा करून विकसित केलेली युध्दनौका आहे. दुनागिरी युद्धनौका म्हणजे पूर्वीच्या ‘दुनागिरी’ या लिएंडर श्रेणीतील एएसडब्ल्यू युद्धनौकेने 05 मे 1977 ते 20 ऑक्टोबर 2010 अशा तेहतीस वर्षांच्या यशस्वी कार्यकाळात विविध आव्हानात्मक मोहिमांमध्ये तसेच बहुराष्ट्रीय सरावांमध्ये भाग घेतला त्या युध्दनौकेचा एक प्रकारे पुनर्जन्म आहे. जुन्या नौकेच्या चिरंतन आत्म्याचे सुयोग्य नौकेमध्ये रूपांतरण झाले आहे. पी17ए श्रेणीतील पहिल्या दोन नौकांचे वर्ष 2019 आणि 2020 मध्ये अनुक्रमे मुंबईतील माझगाव गोदी आणि कोलकाता येथील गार्डन रीच जहाजबांधणी आणि अभियांत्रिकी कंपनीच्या गोदीत जलावतरण करण्यात आले होते तर याच श्रेणीतील तिसरी नौका ‘उदयगिरी’चे यंदा 17 मे 2022रोजी मुंबईतील माझगाव गोदीत जलावतरण करण्यात आले. एवढ्या कमी कालावधीत या श्रेणीतील चौथ्या युध्दनौकेचे जलावतरण होणे म्हणजे केंद्रित दृष्टीकोनासह आत्मनिर्भरतेने जहाजबांधणी करण्यासाठी देण्यात आलेल्या प्रेरणेचा पुरावाच आहे.

यापूर्वी अनेक स्वदेशी युध्दनौकांच्या बहुसंख्य श्रेणीच्या आरेखनाच्या कामात यशस्वी नेतृत्व करणाऱ्या भारतीय नौदलाच्या नौदल आरेखन संचालनालयाने पी17ए श्रेणीतील युद्धनौकांचा आराखडा तयार केला आहे. या युद्धनौकेच्या बांधणीमध्ये आवश्यक असलेली साधनसामग्री आणि यंत्रणा यांची 75% खरेदी देखील देशातील एमएसएमई उद्योगांसह स्वदेशी कंपन्यांकडून करण्यात आल्यामुळे देशाला आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने केलेल्या अथक प्रयत्नांचे हे ठळक उदाहरण आहे.

 

S.Patil/S.Chitnis /P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1841547) Visitor Counter : 170