आदिवासी विकास मंत्रालय
आदिवासी समुदायांच्या उत्थानासंदर्भात पालघर येथे दोन दिवसीय मंथन चर्चासत्राचे केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते उद्घाटन
आदिवासी विकासाशी संबंधित सर्व संस्था आणि राज्यांनी एकत्र येऊन योजना तयार करण्याचे अर्जुन मुंडा यांचे आवाहन
Posted On:
14 JUL 2022 6:16PM by PIB Mumbai
मुंबई, 14 जुलै 2022
देशातील आदिवासी समुदायांच्या उत्थानासाठी पालघर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मंथन’ या दोन दिवसीय चर्चासत्राचे केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री बिश्वेश्वर टुडू यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
आदिवासी विकासाशी संबंधित सर्व संस्था, सर्व राज्यांनी एकत्र येऊन विकास योजना तयार करण्याचे केंद्रीय मंत्र्यांचे आवाहन मुंडा यांनी केले. अनुसूचित जमाती घटक (Schedule Tribe Component) ची अंमलबजावणी, आतापर्यंतची कामगिरी यावरही अहवाल तयार करण्याची सूचना मुंडा यांनी केली. दीर्घ अभ्यासानंतर एसटीसीची स्थापना करण्यात आली आहे, त्यामुळे एसटीसीची विविध राज्यांतील कामगिरीचे मुल्यमापन करणे गरजेचे आहे, असे मुंडा म्हणाले.
जी राज्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर प्रादेशिक भाषांमध्ये चांगले कार्य करत आहेत, अशा राज्यांचे प्रतिनिधी आणि शिक्षण मंत्रालय यांच्या सहकार्याने आदिवासी व्यवहार मंत्रालय यासंदर्भात काय करू शकेल यासाठी पाच सदस्यीय समिती नियुक्त करण्याची सूचना अर्जुन मुंडा यांनी यावेळी केली.
दोन दिवसीय चर्चासत्रासाठी केंद्रीय मंत्र्यांसह विविध राज्ये आणि केंद्र प्रदेशातील आदिवासी व्यवहार मंत्री, मुख्य सचिव, ज्या राज्यांमध्ये आदिवासी संग्रहालयाची उभारणी करण्यात येणार आहे तेथील संचालक उपस्थित आहेत.
मंथन चर्चासत्राविषयी
एकलव्य मॉडेल निवासी विद्यालये, शुल्क नियंत्रण प्राधीकरण, अनुदान विभाग, संग्रहालये, जनजातीय गौरव दिवसाचे आयोजन, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी हाती घेतलेले विविध उपक्रम यावर चर्चासत्रात भर दिला जाणार आहे. अनुसूचित जमाती घटकांच्या जीवनमानात सुधारणा, आरोग्य आणि शिक्षण या विषयांवर परस्परांमध्ये विचारांची देवाणघेवाण करण्यात येत आहे.
महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीर, बिहार, छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, गोवा, झारखंड, पश्चिम बंगाल, मणिपूर, त्रिपूरा, गुजरात, दादरा आणि नगर हवेली, आसाम, मिझोराम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नागालँड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू राज्यांचे आदिवासी विभागाचे प्रतिनिधी चर्चासत्रासाठी उपस्थित आहेत.
JPS/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1841527)
Visitor Counter : 194