राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींनी सारनाथ येथील धम्मकक्का दिन 2022 सोहळ्याला एका व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित केले
Posted On:
13 JUL 2022 9:43PM by PIB Mumbai
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज (13 जुलै, 2022 ) उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे धम्मकक्का (धम्मचक्र ) दिन 2022 सोहळ्याला एका व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित केले.
उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाले की, बौद्ध धर्म हा भारतातील महान आध्यात्मिक परंपरांपैकी एक आहे. भगवान बुद्धांच्या जीवनाशी आणि शिकवणीशी संबंधित अनेक पवित्र स्थळे भारतात आहेत. त्यापैकी चार मुख्य ठिकाणे आहेत - पहिले बोधगया, जिथे त्यांना ज्ञान प्राप्त झाले; दुसरे सारनाथ, जिथे त्यांनी पहिले प्रवचन दिले; तिसरा श्रावस्ती जिथे त्यांनी सर्वात जास्त चातुर्मास व्यतीत केले, आणि अनेक प्रवचने दिली आणि चौथे कुशीनगर, जिथे त्यांचे महापरिनिर्वाण झाले. ते म्हणाले की भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अनेक मठ, तीर्थक्षेत्रे, त्यांच्या शिकवणीशी संबंधित विद्यापीठे स्थापन झाली असून ती ज्ञानाची केंद्रे आहेत. आज ही सर्व ठिकाणे बुद्ध-सर्किटचा भाग आहेत आणि भारत तसेच परदेशातील यात्रेकरू आणि धार्मिक पर्यटकांना आकर्षित करतात.
राष्ट्रपती म्हणाले की, आपल्या लोकशाहीवर बौद्ध धर्माचे आदर्श आणि प्रतीकांचा मोठा प्रभाव आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभावरून राष्ट्रीय चिन्ह घेतले आहे, ज्यावर धर्मचक्र देखील कोरलेले आहे. लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या मागे ‘धर्मचक्र प्रवर्तनाय’ हे सूत्र कोरलेले आहे. आपल्या राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार बाबासाहेब, डॉ. भीमराव आंबेडकर म्हणाले होते की, आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये प्राचीन बौद्ध संघांच्या अनेक प्रक्रियांचा अवलंब करण्यात आला आहे.
भगवान बुद्धांच्या मते शांततेपेक्षा दुसरा मोठा आनंद नाही. भगवान बुद्धांच्या शिकवणुकीत आंतरिक शांतीवर भर देण्यात आला आहे असे राष्ट्रपती म्हणाले. आज याप्रसंगी या शिकवणींचे स्मरण करण्याचा उद्देश हा आहे की सर्व लोकांनी भगवान बुद्धांच्या शिकवणींचा योग्य अर्थ घ्यावा आणि सर्व दुष्कृत्ये आणि असमानता दूर करून शांतता आणि करुणेने परिपूर्ण ज़गाची निर्मिती करावी असे राष्ट्रपती म्हणाले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून सांस्कृतिक मंत्रालय आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाच्या सहकार्याने आषाढ पौर्णिमा दिवस साजरा करत आहे.
राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी येथे क्लिक करा -
***
S.Kakade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1841333)
Visitor Counter : 208