विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

विषाणू संसर्ग आणि मेंदूच्या कर्करोगाची वाढ यांमध्ये असणारा संबंध शोधण्याचे प्रयत्न

Posted On: 11 JUL 2022 6:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जुलै 2022

 

शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, कर्करोगाला कारणीभूत ठरणारा ईबीव्ही अर्थात एप्स्टीन बार हा विषाणू  न्यूरोनल म्हणजे मज्जासंस्थेच्या पेशींमध्ये संसर्ग निर्माण करू शकतो तसेच तो फॅटी असिड्स, कर्बोदके तसेच प्रथिन घटक यांसारख्या जैवरेणूंमध्ये केंद्रीय मज्जा संस्था आणि मेंदूचा कर्करोग यांना कारणीभूत ठरणारे विविध प्रकारचे बदल घडवून आणण्यासाठी कारक ठरतो.

ईबीव्ही हा विषाणू मानव जातीत मोठ्या प्रमाणावर आढळतो. सहसा हा विषाणू कोणतीही इजा करत नाही. मात्र, शरीरात रोगप्रतिकारविषयक तणाव अथवा रोगप्रतिकार क्षमतेला आव्हान देणारी असामान्य परिस्थिती निर्माण झाली तर हा विषाणू लगेच कार्यरत होतो. यामुळे, बर्किट्स लिम्फोमा नामक रक्ताचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, मल्टीपल स्क्लेरोसिस  या आणि इतर अनेक प्रकारच्या कर्करोगांसारख्या  गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात. शरीराच्या मज्जासंस्थेची हानी करणाऱ्या विविध प्रकारच्या रोगांच्या रुग्णांमध्ये ईबीव्ही विषाणूचा संबंध असल्याचे यापूर्वी करण्यात आलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे. मात्र, हा विषाणू मेंदूच्या पेशींवर कशा प्रकारे परिणाम करतो आणि त्या पेशींमध्ये कर्करोगाचा संसर्ग कशा प्रकारे निर्माण करतो हे अद्याप शोधून काढता आलेले नाही.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने एफआयएसटी योजनेच्या माध्यमातून पुरविलेल्या पाठबळावर इंदूर येथील आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील संशोधकांच्या पथकाने कर्करोग निर्माण करणाऱ्या विषाणूचा मेंदूच्या पेशींवर होऊ शकणारा परिणाम शोधून काढण्यासाठी रामन मायक्रोस्पेक्ट्रोस्कोपी तंत्राचा वापर केला. रामन परिणामावर आधारित तंत्र जैविक नमुन्यांमध्ये घडून येणारे संवेदनशील रासायनिक बदल शोधून काढण्याचे साधे आणि किफायतशीर तंत्र आहे.

एसीएस केमिकल न्युरोसायन्स या पत्रिकेत प्रसिध्द झालेल्या अभ्यास अहवालातून असे दिसून आले आहे की, या ईबीव्ही विषाणूच्या प्रभावाखाली मज्जासंस्थेच्या पेशींमधील विविध जैवरेणूंमध्ये कालबद्ध पद्धतीने हळूहळू बदल घडून येऊ शकतात. त्याचबरोबर, या अस्ट्रोसाईट आणि मायक्रोग्लिया यांसारख्या इतर पूरक मेंदू पेशींमध्ये दिसून येणाऱ्या बदलांपेक्षा हे बदल अधिक ठळक असतात.

या समूहात एकत्रितपणे काम करणाऱ्या आयआयटी, इंदूर येथील इन्फेक्शन बायोइंजिनियरिंग ग्रुपचे समूह प्रमुख डॉ. हेमचंद्र झा आणि त्यांचे विद्यार्थी ओंकार इंदारी, श्वेता जाखमोला आणि मीनाक्षी कांडपाल तसेच मटेरियल अँड डिव्हाईस लॅबोरेटरी (भौतिकशास्त्र विभाग) याचे समूह प्रमुख प्राध्यापक राजेश कुमार आणि डॉ. देवेश के. पाठक आणि श्रीमती मनुश्री तन्वर यांना असे आढळून आले, की या पेशींमध्ये काही वेळा काही सामान्य जैवरेणवीय बदल दिसून आले.  विषाणूंच्या प्रभावाखाली असलेल्या या पेशींमध्ये लिपिड, कोलेस्टेरॉल, प्रोलिन आणि ग्लुकोजचे रेणू वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले.हे  जैवरेणवीय घटक शेवटी विषाणूद्वारे पेशींना हानी पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.  याशिवाय या जैवरेणवीय बदलांचा संबंध विषाणू-संबंधित प्रभावांशी असू शकतो आणि न्यूरोलॉजिकल गुंतागुंत होण्याला तो कारणीभूत होऊ शकतो हे देखील या अभ्यासातून स्पष्टपणे समोर आले.

"हे संशोधन मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या विविध भागांमध्ये होत असलेल्या ईबीव्ही मिडिएटेड बायोमोलेक्युलर बदलांना समजून घेण्यास मदत करते; ज्यामुळे मज्जासंस्थेच्या आजारांचे स्वरुप स्पष्ट होते," असे डॉ हेम चंद्र झा म्हणाले.

आजारपणाच्या अवस्थेत मध्ये  (क्लिनिकल सेटिंग्ज) विषाणू-संबंधित पेशींत होणाऱ्या गुंतागुंतीचा अभ्यास करण्यासाठी वापरात असलेल्या रामन मायक्रोस्पेक्ट्रोस्कोपी, या किफायतशीर आणि अनाक्रमक तंत्राचे लाभ निश्चित करण्यासाठी देखील हा अभ्यास उपयुक्त आहे, असे प्रोफेसर राजेश कुमार यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. पेशी, ऊती आणि अवयवांमधील विषाणू-संबंधित बदलांचा अभ्यास करण्यासाठी ज्या प्रगत यंत्रणेची आवश्यकता असते, अशा इतर यंत्रणांच्या तुलनेत क्लिनिकल नमुन्यांचे विश्लेषण करण्यासाठी हे तंत्र निश्चितच वरचढ ठरू शकते.

https://pubs.acs.org/doi/full/10.1021/acschemneuro.2c00081

S.Patil /S.Chitnis/S.Patgaonkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1840792) Visitor Counter : 178


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil