वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा भाग म्हणून अपेडाकडून विद्यार्थ्यांसाठी शेती प्रात्यक्षिके आणि शेती प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन


भातशेतीची नांगरणी, लावणी, प्रक्रिया, उत्पादन आणि निर्यात प्रक्रिया यांसारख्या घटकांवर प्रशिक्षण केंद्रित

Posted On: 09 JUL 2022 10:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जुलै 2022

 

उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील मोदीपुरम येथे असलेल्या अपेडाचे पाठबळ लाभलेल्या  बासमती निर्यात विकास फौंडेशनच्या (बीईडीएफ)  प्रशिक्षणासाठी असलेल्या शेतजमिनीवर आयोजित, प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक उपक्रमात इयत्ता चौथी ते बारावीच्या 150 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग  घेतला आणि भातशेतीचे मूलभूत घटक शिकून घेतले. विद्यार्थ्यांनी तीन वेगवेगळ्या दिवशी प्रशिक्षणासाठी असलेल्या शेतावर उपस्थित राहत, नांगरणी, लावणी, प्रक्रिया, उत्पादन आणि निर्यात प्रक्रिया यांसारख्या भातशेतीशी निगडीत  गोष्टी शिकून  घेतल्या. भातापासून तांदूळ तयार करणे, भाताची तुसे वेगळी करणे, उकडा तांदूळ बनवणे, निर्यातीसाठी भात उत्पादन करणे आणि तांदूळापासून तेल आणि जनावरांसाठी चारा बाजूला  काढणे आदी घटकांविषयीही विद्यार्थ्यांनी जाणून घेतले.

याशिवाय, बासमती तांदूळ  उत्पादन प्रक्रिया, प्रक्रिया, साठवण, व्यापार आणि निर्यात यासंदर्भात  बासमती निर्यात विकास संस्थेच्या शास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी मृदा आरोग्य पत्रिका व्यवस्थापनाबद्दल माहिती जाणून घेतली आणि मूगासह शेंगायुक्त पिके  तसेच  बासमती तांदुळाच्या पिकाच्या लावणीचा अनुभव घेतला.

सरकारच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याच्या दृष्टीने, .विद्यार्थ्यांना शेतीसंदर्भात व्यावहारिक ज्ञान देणे तसेच निर्यातीपर्यंतच्या  तांदूळ उत्पादनाच्या संपूर्ण मूल्य-साखळीचे  त्यांचे आकलन  वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे,असे अपेडाचे अध्यक्ष   एम अंगमुथू यांनी सांगितले. कृषी उत्पादन व्यवस्थेसंदर्भात  व्यावहारिक ज्ञान देण्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या शेतावरील असेच दौरे देशाच्या इतर भागातही आयोजित केले  जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

राष्ट्रीय शिक्षण धोरणातील  उद्दिष्टाच्या  अनुषंगाने, विद्यार्थी , स्टार्ट-अप्स आणि इतरांमध्ये भातशेतीचे व्यावहारिक ज्ञान वाढवणे आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी, कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या  (अपेडा )  वतीने   शेती प्रात्यक्षिके आणि शेती प्रशिक्षण आयोजित करण्यात येते.

सैद्धांतिक शिक्षणाऐवजी व्यावहारिक ज्ञान आणि कौशल्य विकासाला विशेष चालना देणे हे  राष्ट्रीय शिक्षण  धोरणात नमूद करण्यात आले आहे.

अपेडा  बासमती निर्यात विकास संस्थेच्या माध्यमातून बासमती तांदूळ लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारांना मदत करत आहे.

 

* * *

N.Chitale/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1840461) Visitor Counter : 203


Read this release in: English , Urdu , Hindi