गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर इथे स्वामी रामानुजाचार्य यांच्या (स्टॅचू ऑफ पीस) शांतता पुतळ्याचे अनावरण


आज काश्मीरमध्ये या शांतता पुतळ्याची स्थापना संपूर्ण देशासाठी आणि विशेषतः जम्मू-काश्मीरसाठी मोठे शुभ संकेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी काश्मीरमधील दहशतवादावर नियंत्रण मिळवले असून जम्मू-काश्मीर शांतता आणि प्रगतीच्या मार्गावर आहे

कलम 370आणि 35 अ हटवावे आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असावा, अशी देशाची दीर्घकाळापासून अपेक्षा होती, ही अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली आणि 5 ऑगस्ट 2019 पासून काश्मीरमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात झाली

सद्यस्थितीत, या शांतता पुतळ्याच्या स्थापनेमुळे रामानुजाचार्यांचा आशीर्वाद आणि संदेश सर्व धर्मातील काश्मिरी लोकांपर्यंत पोहोचेल आणि काश्मीरला शांतता आणि प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाईल

Posted On: 07 JUL 2022 9:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जुलै 2022

 

केंद्रीय गृहमंत्री  अमित शाह  यांनी आज जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर इथे स्थापन करण्यात आलेल्या  स्वामी रामानुजाचार्य यांच्या  (स्टॅचू ऑफ पीस ) शांतता पुतळ्याचे दूरदृश्य प्रणालीद्वारे अनावरण केले.यावेळी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल  मनोज सिन्हा आणि श्री यदुगिरी यतिराज मठाचे श्री श्री यतीराज जेयर स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आज काश्मीरमध्ये  स्वामी रामानुजाचार्य यांच्या संगमरवरी शांती पुतळ्याचे अनावरण करताना मला खूप आनंद होत आहे. भारताच्या इतिहासाच्या विविध कालखंडात जेव्हा जेव्हा समाजाला सुधारणांची गरज भासली तेव्हा सत्याचा मार्ग दाखवण्यासाठी एक महान व्यक्ती पुढे आली आणि रामानुजाचार्य यांचा जन्मही अशा वेळी झाला जेव्हा देशाला एका महान व्यक्तीची गरज होती.आज या निमित्ताने मी रामानुजाचार्यांचे जीवन, कार्य आणि व्यक्तिमत्त्वाला विनम्र अभिवादन करतो, असे आपल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.

आज काश्मीरमध्ये या शांततेच्या पुतळ्याची स्थापना संपूर्ण देशासाठी, विशेषतः जम्मू-काश्मीरसाठी एक मोठा शुभ संकेत आहे, असे अमित शाह  म्हणाले. नायब राज्यपाल  मनोज सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीरने शांतता आणि विकासाच्या  मार्गावर प्रगती केली आहे.पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली  मनोज सिन्हा यांनी काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात निर्णायक वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मनोज सिन्हा यांनी कोणताही भेदभाव न करता काश्मीरमधील जनतेपर्यंत विकास पोहोचवला आहे.प्रदीर्घ काळानंतर कलम 370 आणि ३५ अ हटवून काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असावा , अशी देशाची अपेक्षा होती.ही अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली आणि 5 ऑगस्ट 2019 पासून काश्मीरमध्ये नवे  पर्व सुरू झाले.अशा वेळी, या शांतता पुतळ्याच्या स्थापनेमुळे रामानुजाचार्यांचा आशीर्वाद आणि संदेश सर्व धर्मातील काश्मिरी लोकांपर्यंत पोहोचेल आणि काश्मीरला शांतता आणि प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाईल, असे शाह  यांनी सांगितले.

रामानुजाचार्यांनी  आपले  बहुतांश जीवन  दक्षिण भारतात व्यतीत केले आणि त्यांचे कार्य स्थळही तिथेच होते. पण त्यांच्या शिक्षण कार्याचा आणि त्यांनी दिलेल्या स्नेहाचा  प्रसार देशभरात दिसून येतो. रामानुजाचार्य आणि त्यांचे शिष्य रामानंद यांनी दिलेल्या  मूळ संदेशातून देशभरात अनेक पंथ, संप्रदाय वाढले आहेत. त्यामुळे आज काश्मीरमध्ये शांतता पुतळा स्थापन झाला आहे.हा पुतळा केवळ काश्मीरलाच नाही तर संपूर्ण भारताला शांततेचा संदेश देईल. 600 किलोग्रॅम वजनाचा हा पुतळा चार फूट उंचीचा असून पांढर्‍या शुभ्र मकराना संगमरवरीपासून तयार केलेला आहे. कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात असलेला यदुगिरी यथीराज मठ हा मेळकोटमधील एकमेव मूळ मठ आहे जो रामानुजाचार्यांच्या काळापासून अस्तित्वात आहे, असे शाह यांनी सांगितले.

R.Aghor /S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1839962) Visitor Counter : 305


Read this release in: English , Urdu , Telugu