निती आयोग

नीती आयोगाने ‘कोविड-19 आजाराचे उपशमन आणि व्यवस्थापन : भारतातील राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविण्यात आलेल्या आयुष आधारित उपचारपद्धतींच्या माहितीचे संकलन’ केले जारी

Posted On: 02 JUL 2022 1:05PM by PIB Mumbai

 

नीती आयोगाने देशातील राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविण्यात आलेल्या आयुष आधारित उपचार पद्धतींच्या माहितीचे संकलन जारी केले असून त्यामध्ये देशात पसरलेल्या कोविड -19 च्या साथीचे उपशमन तसेच व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी अंमलात आणलेल्या विविध आयुष आधारित उपक्रमांची तसेच उपचार पद्धतींची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.

नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी तसेच केंद्रीय आयुष आणि महिला, बालविकास राज्यमंत्री डॉ.मुंजपारा महेंद्रभाई काळूभाई यांनी हा संकलनवजा अहवाल जारी केला.

वर्ष 2020 पासून संपूर्ण जगाला कोविड-19 च्या रूपातील सार्वजनिक पातळीवर उद्भवलेल्या अभूतपूर्व आरोग्यविषयक आपत्तीला तोंड द्यावे लागत आहे. भारतात या साथीचे व्यवस्थापन करण्याच्या कामात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे केंद्र सरकारच्या बरोबरीने काम करत आहेत.भारताच्या कोविड-19 विरोधी लढ्याला अधिक बळकट करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आयुष विभागांनी राज्य स्तरावरील आरोग्य विभागांशी सहकारी संबंध प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे या संदर्भात आयुष उपचारांचा अधिक उत्तम प्रभाव दिसत असून या विश्वासार्हतेच्या बळावर या उपचारांचा प्रसार यापुढेही कायम ठेवण्याची गरज आहे.

हा संकलन अहवाल जारी करताना केंद्रीय आयुष राज्यमंत्री डॉ.मुंजपारा महेंद्रभाई काळूभाई म्हणाले, कोविड-19 महामारीने उभ्या केलेल्या आरोग्यविषयक आपत्तीला तोंड देण्यासाठी भारतात सध्या प्रचलित असलेल्या वैद्यकीय उपचार पद्धतीसोबतच, आयुष पद्धतींनी देखील विविध  आघाड्यांवर सक्रीय भूमिका निभावली आहे. पारंपारिक आणि समकालीन आरोग्यसेवा यंत्रणांच्या सामुहिक प्रयत्नांतून आपण जगासाठी एक समग्र आरोग्य सेवा यंत्रणेचा आदर्श नमुना तयार करू शकू अशी मला आशा वाटते,

आयुष आधारित उपचार पद्धतींचा सारांश तयार करण्यासाठी नीती आयोगाने सर्व राज्य सरकारे तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाशी संपर्क साधला आणि त्या सर्वांनी कोविड-19 महामारीचे उपशमन तसेच व्यवस्थापन यासाठी हाती घेतलेल्या आयुष उपचारपद्धतींची माहिती सामायिक करावी अशी विनंती केली.

या संकलनवजा अहवालात समाविष्ट करण्यात आलेल्या उपचार पद्धती पाच विभागांच्या अंतर्गत सादर करण्यात आल्या आहेत: (i) राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांनी स्वीकारलेल्या पद्धतींची उद्दिष्ट्ये आणि आढावा (ii)आयुष विषयक मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा (iii)हस्तक्षेप तसेच उपक्रम (iv)डिजिटल मंच आणि टेली-मेडिसिन (v)या पद्धतींची अंमलबजावणी करण्यात आलेल्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना. सदर अहवालात केंद्रीय आयुष मंत्रालयाची मार्गदर्शक तत्वे तसेच उपक्रम यांचा सारांश देखील समाविष्ट करण्यात आला आहे.

देशातील पारंपारिक आरोग्यसेवा यंत्रणा अधिक बळकट करण्याची गरज आहे असे हा अहवाल सांगतो. पुराव्यावर आधारलेल्या आयुष उपचार सेवा आणि आधुनिक वैद्यकीय पद्धती यांच्या एकत्रित अंमलबजावणीमध्ये भारताच्या आरोग्य सेवा यंत्रणेला लक्षणीयरीत्या मजबूत करण्याची क्षमता आहे.

या अहवालवजा संकलनाचे संपूर्ण दस्तावेज वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा:

***

S.Thakur/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1838803) Visitor Counter : 178