अल्पसंख्यांक मंत्रालय

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते मुंबईत पाचव्या जागतिक चित्रपट पर्यटन परिषदेचे उद्घाटन


ट्रिलीयन डॉलर्सचे योगदान देत चित्रपट उद्योग जगभरातील देशाच्या अर्थव्यवस्थांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे : केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री

चित्रीकरण स्थळांना सुट्टीत भेट देण्याच्या पर्यटनस्थळांचे स्वरूप कसे द्यावे? चित्रपट पर्यटनाच्या माध्यमातून चित्रीकरणासाठी प्रसिध्द असलेल्या विविध स्थळांवर पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जागतिक चित्रपट पर्यटन परिषदेचे आयोजन

Posted On: 01 JUL 2022 8:45PM by PIB Mumbai

मुंबई, 1 जुलै 2022


केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते आज मुंबईच्या जुहू चौपाटीवरील  नोव्हाटेल येथे पाचव्या जीएफटीसी अर्थात जागतिक चित्रपट पर्यटन परिषदेचे उद्घाटन झाले. पीएचडीसीसीआय अर्थात पीएचडी वाणिज्य आणि उद्योग मंडळाने केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्या सहकार्याने ही पाचवी जागतिक चित्रपट पर्यटन परिषद आयोजित केली असून ‘चित्रपट पर्यटनाची क्षमता अजमावणे’ अशी या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे.

चित्रपट आयोग, पर्यटन मंडळे  तसेच निर्माता संस्थांना त्यांची चित्रीकरण स्थळे, चैतन्यमयी भारतीय चित्रपट उद्योगांमध्ये राबविले जाणारे प्रोत्साहनपर उपक्रम आणि सेवा यांची माहिती देण्यासाठी जीएफटीसीने एक वैशिष्ट्यपूर्ण मंच उपलब्ध करून दिला आहे. चित्रपट पर्यटन म्हणजे प्रेक्षकांना  चित्रपटांमध्ये पाहिलेल्या विशिष्ट ठिकाणांना भेटी देण्यासाठी प्रवृत्त करणे आहे.

“भारतीय चित्रपट आणि परदेशी चित्रपट यांनी दहशतवाद, हिंसा, कट्टरतावाद अशा अपप्रवृत्तींच्या विरोधात अर्थपूर्ण संदेश देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. केवळ मनोरंजन करणारे नव्हे तर समाजाला परिणामकारक संदेश देणाऱ्या चित्रपटांची आज अधिक गरज आहे,” असे केंद्रीय मंत्री त्यांच्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले. “चित्रपटांचा धारदार प्रवाह दहशतवादावर मोठा प्रहार करू शकतो,”असे त्यांनी सांगितले.

चित्रपट पर्यटनाचे ठिकाण म्हणून भारताकडे असलेल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण गुणांचा देखील केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी उल्लेख केला. “भारत हा जगातला एकमेव असा देश आहे जिथे प्रत्येक ऋतू, वातावरण, संस्कृती, रीतीरिवाज, उन्हाळा, हिवाळा,पावसाळा, बर्फवृष्टी, डोंगर, नद्या, धबधबे, समुद्र, जंगले, देखणी गावे, शोभिवंत शहरे आहेत. या वैशिष्ट्यांनी भारताला कोणत्याही चित्रपट निर्मात्याला चित्रीकरणासाठी एक आदर्श ठिकाण बनविले आहे,” असे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्र्यांनी चित्रपट उद्योगांचे महत्त्व आणि जगभरातील अर्थव्यवस्थांमध्ये असलेले त्यांचे योगदान याकडे देखील लक्ष वेधले. “अनेक देशांमधील चित्रपट उद्योग ट्रिलीयन डॉलर्सचे योगदान देत त्यांच्या देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत; हॉलीवुडमधील चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरील कमाई सुमारे 47 लाख कोटी रुपये आहे तर ब्रिटीश चित्रपट उद्योग जगभरातून 3.31 लाख कोटी रुपये कमवत आहे. चीनच्या चित्रपट उद्योगाची कमाई सुमारे 2.53 लाख कोटी रुपये आहे,” असे ते म्हणाले. “भारतीय चित्रपट उद्योगाची जगभरातील बॉक्स ऑफिसवरील कमाई सुमारे 48 हजार कोटी रुपये आहे,” असे त्यांनी पुढे सांगितले.

केंद्रीय मंत्री नक्वी म्हणाले की,सर्वसामान्य लोकांसह सुरु झालेला भारतीय चित्रपट उद्योगाचा यशस्वी आणि गौरवपूर्ण प्रवास प्रत्येकालाच भावला पाहिजे आणि त्याला कोणत्याही सामाजिक बंधनांची मर्यादा असू नये . “भारतीय चित्रपट उद्योग प्रतिष्ठितांपासून सर्वसाधारण जनतेपर्यंत सर्वांची पहिली पसंती असेल अशी परिस्थिती आपल्याला निर्माण केली पाहिजे, तेव्हाच, भारतीय चित्रपट उद्योगांची ओळख आणि अभिमान यांना जगभरात मान मिळेल,” ते म्हणाले.

भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारात मान प्राप्त करून देण्यात देशातील चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, लेखक,अभिनेते आणि तंत्रज्ञ या मंडळींनी दिलेल्या योगदानाबद्दल केंद्रीय मंत्री नक्वी यांनी यावेळी त्या सर्वांची प्रशंसा केली.

पर्यटन मंत्रालयाचे सचिव अरविंद सिंह  यांनी भारतातील चित्रपट पर्यटनाच्या अफाट शक्यतांबद्दल बोलताना  यावर लक्ष केंद्रित करण्याची हीच योग्य वेळ का आहे हे देखील नमूद केले.  “मार्च 2023 नंतर जागतिक स्तरावर पर्यटन क्षेत्रात  तेजी येण्याची अपेक्षा आहे. मार्च 2023 नंतर  तीनपैकी एक रोजगार निर्मिती पर्यटन क्षेत्रात होईल,;असा विश्वास व्यक्त केला जात आहे , असे सांगत त्यांनी भारतातील चित्रपट पर्यटनाची व्याप्ती अधोरेखित केली.

निर्मिती संस्था आणि चित्रपट निर्मात्यांना जलद गतीने, ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) जारी करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल भारतीय पशु कल्याण मंडळाचे सचिव डॉ. सुजित कुमार दत्ता यांनी माहिती दिली. “भारतीय पशु  कल्याण मंडळाकडून चित्रपटांना विशेषत: ज्यामध्ये  प्राण्यांचा वापर केला जातो अशा चित्रपटांना परवानगी मिळण्यात कोणतेही  अडथळे येणार नाहीत यादृष्टीने   एनओसी जारी करण्याची प्रक्रिया डिजीटल करण्यात आली आहे;  अर्ज केल्यानंतर 72 तासांच्या आत आमचा विभाग एनओसी जारी करत आहे ,” असे त्यांनी सांगितले.

भारताला चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी विशेष ठिकाण म्हणून प्रोत्साहन आणि पाठबळ देण्यासाठी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हाती  घेतलेल्या अनेक उपक्रमांबद्दल, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे संचालक रविंदर भाकर यांनी माहिती दिली. आपण भारतीय चित्रपटांची आवड असलेल्या जगभरातील भारतीय वंशाच्या  नागरिकांना सतत काहीतरी देत खिळवून ठेवण्याचा  प्रयत्न केला पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. "आम्ही अधिक सह-निर्मिती घेऊन  येण्याचा आणि अनेक देशांसोबत अनेक सह-निर्मिती करार पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहोत," असे ते म्हणाले.

यावेळी प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते अनीस बाज्मी आणि राहुल रवेल, अभिनेते मनोज जोशी आदींचा सत्कार करण्यात आला. भारतात अनेक नयनरम्य ठिकाणे आहेत ज्यांचा शोध घेणे बाकी आहे, जर चित्रपट उद्योगाने या अद्याप न शोधलेल्या ठिकाणांचा शोध घेत   प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली,तर आपण केवळ चांगले चित्रपटच  बनवू शकणार नाही  तर स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या संधी देखील निर्माण करू शकतो ”, असे अभिनेते  मनोज जोशी यांनी सांगितले.

बजरंगी भाईजान , मोहेंजोदडो , पॅडमॅन, लुका छुपी, न्यूटन यांसारख्या भारतातील पर्यटन स्थळांना प्रोत्साहन देणाऱ्या चित्रपटांतील काही दृश्य या परिषदेमध्ये सादर करण्यात आली.
 

उद्घाटन कार्यक्रमानंतर पर्यटन मंत्रालयाचे सादरीकरण सत्र आयोजित करण्यात आले होते. छत्तीसगड, हंगेरी, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, नॉर्वे, पोलंड, सौदी अरेबिया, स्पेन, तुर्की यासारख्या अनेक पर्यटन मंडळांच्या प्रतिनिधींनी त्या प्रदेशातील ठिकाणांवर  चित्रपट चित्रीकरणासाठी  प्रोत्साहन योजना सादर केल्या.

या परिषदे दरम्यान, भारतात तसेच इतर देशांमध्ये चित्रपट पर्यटनाच्या प्रचारासाठी  समूह चर्चासत्र  आयोजित करण्यात आली होती. चित्रीकरणाची ठिकाणे  आणि खाजगी संस्थांसाठी आयोजित प्रदर्शन  मंचाच्या माध्यमातून  त्यांची ठिकाणे , कर प्रोत्साहने आणि इतर सेवा प्रदर्शित करण्यात आल्या.

प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया या कार्यक्रमासाठी समन्वय भागीदार आहे. भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय,  मध्य प्रदेश पर्यटन मंडळ, डब्लूएफएस  ग्लोबल, जम्मू आणि काश्मीर पर्यटन, सुपीरियर इंडस्ट्रीज, सौदी पर्यटन प्राधिकरण, छत्तीसगड पर्यटन मंडळ, आयआरसीटीसी, डेपिओनियर हॉलिडेज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि शेखावती प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  

पीएचडीसीसीआयची पर्यटन आणि आदरातिथ्य समितीचे सह- अध्यक्ष राजन सहगल, पीएचडीसीसीआयच्या मनोरंजन, माध्यम, कला आणि संस्कृती समितीचे अध्यक्ष मुकेश गुप्ता, पीएचडीसीसीआयचे सहाय्यक सचिव डॉ. योगेश श्रीवास्तव यांचीही यावेळी भाषणे झाली.

हा कार्यक्रम आपल्याला इथे पाहता येईल: 

 

* * *

PIB Mumbai | S.Kane/S.Chitnis/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1838703) Visitor Counter : 191


Read this release in: English , Urdu , Hindi