सहकार मंत्रालय

प्राथमिक कृषी पतसंस्थांचे संगणकीकरण करण्याच्या मंत्रिमंडळाच्या महत्वाच्या निर्णयासाठी  केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे  मानले  आभार

केंद्रीय मंत्रिमंडळाने सुमारे 63000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचे  (पीएसी) संगणकीकरण करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला; पीएसी हा सहकार क्षेत्रातील सर्वात लहान घटक असून त्याच्या  संगणकीकरणाचा या क्षेत्राला मोठा लाभ मिळेल.

या डिजिटल युगात, पीएससीच्या संगणकीकरणाचा हा निर्णय, या क्षेत्रात पारदर्शकता, विश्वासार्हता आणि कार्यक्षमता वाढवेल आणि बहुपयोगी कृषी पतसंस्थांच्या हिशेबातही सुधारणा होईल.

Posted On: 29 JUN 2022 8:15PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी मंत्रिमंडळाने प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांच्या (PACS) संगणकीकरणाला मान्यता देण्याचा महत्त्वपूर्ण निणर्य घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

सहकार मंत्रालयाची निर्मिती असो, की त्यानंतर हे क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेने घेण्यात आलेले सर्व निर्णय हेच सांगतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  सहकारातून समृद्धीही  केवळ घोषणा  नसून सहकाराशी संबंधित लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्यांचा अतूट संकल्प आहे. याच शृंखलेत आज पंतप्रधानांनी  जवळपास 63000 प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांच्या (PACS) संगणकीकरणाला मान्यता देण्याचा महत्त्वपूर्ण निणर्य घेतला आहे. प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था सहकार क्षेत्रातील सर्वात लहान घटक आहे आणि या घटकाचे संगणकीकरण या क्षेत्रासाठी वरदान ठरणार आहे. या दूरदर्शी निर्णयासाठी मी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानतो. असे अमित शाह यांनी आपल्या ट्वीट्स मध्ये म्हटले आहे.

देशातील 63000 प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांच्या संगणकीकरणावर 2516 कोटी रुपये खर्च केले जातील, ज्याचा लाभ जवळपास 13 कोटी लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना होईल, असे शाह म्हणाले. या डिजिटल युगात प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांच्या संगणकीकरणाचा निर्णय पारदर्शकता, विश्वासार्हता आणि कार्यक्षमता वाढवेल आणि बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांच्या हिशेबात देखील याचा लाभ होईल.

या संगणकीकरणासाठी लागणारे सॉफ्टवेयर स्थानिक भाषांमध्ये देखील उपलब्ध असेल असे अमित शाह म्हणाले. त्या सोबतच प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांना थेट लाभ हस्तांतरण योजना, व्याज सूट योजना पिक विमा योजना आणि खते, बियाणे इत्यादी वस्तू पुरवण्याचे नोडल केंद्र बनण्यात देखील मदत होईल.

***

N.Chitale/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1838080) Visitor Counter : 140