कोळसा मंत्रालय

कोकिंग कोल उत्पादनात भरीव वाढ करण्यासाठी कोळसा मंत्रालयाची कृती योजना


मे 2022 पर्यंत 8.3 दशलक्ष टन कोकिंग कोळशाचे उत्पादन

2030 पर्यंत 140 दशलक्ष टन उत्पादनाचे उद्दिष्ट

आर्थिक वर्ष 2023 मध्ये कोल इंडिया पोलाद क्षेत्राला 3.45 दशलक्ष टन स्वच्छ कोकिंग कोलचा पुरवठा करणार

आणखी 9 वॉशरीज कार्यान्वित करण्याची योजना

Posted On: 25 JUN 2022 6:16PM by PIB Mumbai

 

भारताने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 51.7 दशलक्ष टन (MT) कच्च्या कोकिंग कोळशाचे उत्पादन केले आहे, जे आर्थिक वर्ष 2020 - 21 मधे झालेल्या 44.8 दशलक्ष टनाच्या (MT) तुलनेत 15% अधिक आहे. मे 2022 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात देशांतर्गत कच्च्या कोकिंग कोळशाच्या उत्पादनात वाढ नोंदविण्यात आली असून 8.3 दशलक्ष टन इतके उत्पादन झाले आहे, जे मागील वर्षाच्या याच कालावधीत झालेल्या 6.9 दशलक्ष टन उत्पादनाच्या तुलनेत 20 % अधिक आहे.

सध्या, देशांतर्गत कच्चा कोकिंग कोळसा स्वच्छ करण्याची क्षमता सुमारे 23 दशलक्ष टन प्रतिवर्ष आहे, ज्यात खाजगी क्षेत्रातील 9.26 दशलक्ष टन कोळशाचा समावेश आहे. कोल इंडिया लिमिटेड (CIL) 30 दशलक्ष टन प्रती वर्ष (एमटीपीए) क्षमतेच्या आणखी 9 नवीन वॉशरीजची स्थापना करून त्या कार्यान्वित करण्याची योजना आखत आहे. नवीन वॉशरीजच्या स्थापनेमुळे कोल इंडिया लिमिटेड सुमारे 15 दशलक्ष टन स्वच्छ कोकिंग कोळसा पोलाद क्षेत्राला पुरवू शकेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे कोकिंग कोळशाच्या आयातीमध्ये घट होईल. देशांतर्गत कोकिंग कोळशाची झपाट्याने वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी आणखी वॉशरीज उभारण्याची आवश्यकता आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये, कोल इंडिया लिमिटेडने पोलाद क्षेत्राला 1.7 दशलक्ष टन स्वच्छ  कोकिंग कोळशाचा पुरवठा केला असून आर्थिक वर्ष 2023 मध्ये 3.45 दशलक्ष टन पुरवठ्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

कच्च्या कोकिंग कोळशाच्या उत्पादनात आणखी भर घालण्यासाठी, कोळसा मंत्रालयाने गेल्या दोन वर्षांत 22.5 दशलक्ष टन पिक रेट कॅपेसिटीच्या (PRC) 10 कोकिंग कोल पट्ट्याचा खाजगी क्षेत्रात लिलाव केला आहे. 2025 पर्यंत यापैकी बहुतांश पट्ट्यामध्ये उत्पादन सुरू होईल अशी अपेक्षा आहे. मंत्रालयाने 4 नवे कोकिंग कोळसा पट्टे शोधले असून केंद्रीय खाण नियोजन आणि आराखडा संस्था (CMPDI) पुढील दोन महिन्यांत 4 ते 6 नवीन कोकिंग कोल पट्ट्यासाठीचा शासन आदेश  जारी करेल. देशांतर्गत कच्च्या कोकिंग कोळशाचा पुरवठा वाढवण्यासाठी हे पट्टे लिलावाच्या पुढील फेऱ्यांमध्ये खाजगी क्षेत्राला दिले जाऊ शकतात.

कोल इंडिया लिमिटेडने सध्या अस्तित्वात असलेल्या खाणींमधून कच्च्या कोकिंग कोळशाचे उत्पादन 26 दशलक्ष टनापर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे आणि आर्थिक वर्ष 2025 पर्यंत सुमारे 20 दशलक्ष टन पिक रेट कॅपॅसिटी उत्पादन क्षमतेच्या 9 नवीन खाणी शोधल्या आहेत. तसेच, एकूण 20 बंद केलेल्या खाणींपैकी कोल इंडिया लिमिटेडने सुमारे 2 दशलक्ष टन पिक रेट कॅपॅसिटी अपेक्षित असलेल्या 6 बंद केलेल्या कोकिंग कोळशाच्या खाणी खाजगी क्षेत्राला महसूल वाटणीच्या नाविन्यपूर्ण आदर्शावर देऊ केल्या आहेत.

पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारतउपक्रमांतर्गत कोळसा मंत्रालयाने घेतलेल्या या परिवर्तनात्मक उपायांमुळे, देशांतर्गत कच्च्या कोकिंग कोळशाचे उत्पादन 2030 पर्यंत 140 दशलक्ष टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1836972) Visitor Counter : 249


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil