संरक्षण मंत्रालय

नौदल कर्मचाऱ्यांचे मर्चंट नेव्हीमध्ये स्थित्यंतर करण्यासाठी भारतीय नौदल आणि जहाजबांधणी महासंचालनालय यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

Posted On: 22 JUN 2022 8:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जून 2022

 

भारतीय नौदल आणि जहाजबांधणी महासंचालनालय  यांच्यादरम्यान 20 जून 2022 रोजी एका ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून, या करारामुळे, भारतीय नौदलातील कर्मचाऱ्यांना - कार्यरत आणि सेवानिवृत्त दोन्ही- मर्चंट नेव्हीमध्ये स्थित्यंतर करता येणे शक्य होणार आहे. या सामंजस्य करारामुळे, भारतीय नौदलातील कर्मचाऱ्यांना आंतरराष्ट्रीय STCW (खलाशांसाठी प्रशिक्षण, प्रमाणन आणि टेहळणीविषयक मानके) च्या दर्जाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.  जागतिक खलाशांमध्ये भारतीय खलाशांचे प्रमाण वाढवण्याच्या  पंतप्रधानांच्या अपेक्षेला अनुरूप असे हे पाऊल उचलण्यात आले आहे. तसेच, नील अर्थव्यवस्थेसह, सागरी क्षेत्राला सरकारने दिलेले प्राधान्य लक्षात घेऊन, त्यासाठी कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याच्या दृष्टीनेही हा  सामंजस्य करार उपयुक्त ठरणार आहे.

या स्थित्यंतरासाठीची सविस्तर प्रक्रिया महासंचालनालयाने आपल्या आदेश 17 मध्ये जारी केली आहे. या आदेशानुसार, भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी केलेली सागरी सेवा आणि अत्याधुनिक प्रशिक्षण लक्षात घेतले जाणार आहे. तसेच, यात, भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांपासून ते नौसेनिकांपर्यन्त सर्व पदांवरील व्यक्तींचा विचार केला जाणार आहे. तसेच  नॉटिकल म्हणजेच सागरी क्षेत्र आणि तंत्रज्ञान क्षेत्र अशा दोन्ही क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा विचार केला जाईल.  या योजनेनुसार,नौदल कर्मचाऱ्यांना नौदल सेवेत असताना कार्यक्षमतेचे प्रमाणपत्र मिळेल, ही सुनिश्चित केले जाईल. या कर्मचाऱ्यांनी STCW च्या तरतुदींनुसार, काही अभ्यासक्रम, परीक्षा आणि मर्चंट नेव्हीत किमान सेवा दिल्यानंतर  हे प्रमाणपत्र, जागतिक पातळीवरही ग्राह्य धरले जाईल.

यामुळे, भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांना मर्चंट नेव्हीत सुलभतेने स्थित्यंतर करता येईल. केवळ भारतातच नव्हे, तर जगभर त्यांना ही संधी उपलब्ध असेल.

ही स्थित्यंतर योजना, सविस्तर नियोजन आणि परिश्रमानंतर तयार केली गेली आहे. तसेच ती आखतांना, आंतरराष्ट्रीय नियमांसह अनेक घटक विचारात घेतल्या असून त्याच्याशी सुसंगत विविध तरतुदी सादर केल्या आहेत. यामुळे, भारतीय नौदलातील  कर्मचार्‍यांना मर्चंट नेव्हीमधील अगदी सर्वोच्च पदापर्यंत  नोकरी मिळवणे शक्य होणार आहे. नौदलात पुरेसा अनुभव घेतल्यानंतर नौदल  कर्मचारी आता नॉटिकल विषयक अमर्याद टन वजनाच्या परदेशी जाणाऱ्या जहाजांवर मास्टर्स म्हणून तसेच, अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये मुख्य अभियंता पदापर्यंत थेट सहभागी होऊ शकतील.

 S.Kulkarni/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1836317) Visitor Counter : 146


Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali