सांस्कृतिक मंत्रालय
जी. किशन रेड्डी ज्योतिर्गमय महोत्सवाचे उद्घाटन करणार , 21 ते 25 जून या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात घडणार दुर्लक्षित कलाकारांच्या प्रतिभेचे दर्शन
Posted On:
20 JUN 2022 9:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जून 2022
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी आणि जागतिक संगीत दिनानिमित्त, संगीत नाटक अकादमी ज्योतिर्गमय महोत्सव सादर करत आहे. यात देशभरातील रस्ते, रेल्वे आणि मंदिरात आपली कला सादर करणाऱ्या कलाकारांबरोबरच दुर्मिळ वाद्य वाजवणाऱ्यांच्या कलेचे दर्शनही घडेल. केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी. किशन रेड्डी या महोत्सवाचे उद्घाटन करतील.
दुर्मिळ वाद्ये वाजवण्याची कला आणि कौशल्य जपण्यासाठी तसेच प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या कलाकारांना पुढे आणण्याच्या उदात्त हेतूने या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. संगीत नाटक अकादमीचा हा भारतातील लोप पावत चाललेल्या कलेला वाचवण्याचा अनोखा प्रयत्न आहे आणि हा उपक्रम जागतिक संगीत दिनानंतरही पुढे सुरु राहील.
आतापर्यन्त न ऐकलेल्या कलेचा शोध घेण्यासाठी विविध मार्गाने आवाहन करण्यात आले. यात सहभागी होऊ इच्छिणार्यांना त्यांच्या कलेची एक छोटी क्लिप त्यांच्या तपशीलासह पाठवण्याची विनंती करण्यात आली. संगीत क्षेत्रातील प्रख्यात संस्था, सांस्कृतिक केंद्रे, संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते आणि प्रख्यात संगीतकारांनाही अशा दुर्मिळ प्रतिभावंतांचा शोध घेण्याची आणि त्यांना हुडकून काढण्याची विनंती करण्यात आली होती. सर्व प्रवेशिकांची पडताळणी केल्यानंतर आणि प्राप्त शिफारशी विचारात घेतल्यानंतर, 21-25 जून 2022 दरम्यान आयोजित 5 दिवसीय महोत्सवासाठी एकूण 75 कार्यक्रमांची निवड करण्यात आली.
दुर्मिळ वाद्ये तयार करण्याची 5 दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे , जी शैक्षणिक आणि संवादात्मक दोन्हीही असेल. या महोत्सवात देशाच्या कानाकोपऱ्यातून कलाकार सहभागी होणार आहेत.
अकादमीकडे रवींद्र भवन, नवी दिल्ली येथे वाद्य, मुखवटे आणि कठपुतळ्यांचे दालन आहे. कारागिरांनी बनवलेल्या वाद्यनिर्मितीचे प्रत्यक्ष प्रदर्शन महोत्सवादरम्यान दररोज खुले असेल. सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
S.Patil/S.Kane/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1835695)
Visitor Counter : 125