वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
आंबा निर्यातीला चालना देण्यासाठी अपेडा तर्फे बहारीनमध्ये आठ दिवसीय आंबा महोत्सवाचे आयोजन
भारताच्या पूर्व भागातील 34 प्रकारचे आंबे प्रदर्शनात आहेत
Posted On:
14 JUN 2022 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जून 2022
आंबा निर्यातीस मोठे प्रोत्साहन देण्यासाठी कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) किंग्डम ऑफ बहारीन मध्ये भारतीय दूतावास आणि अल जझीरा समूह यांच्या सहकार्याने 13 जूनपासून आठ दिवसीय आंबा महोत्सव आयोजित केला आहे.
या प्रदर्शनात पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश,आणि ओडिशा या पूर्वेकडील राज्यांमधील 34 प्रकारचे आंबे, बहारीनमधील 8 वेगवेगळ्या ठिकाणच्या अल जझीरा सुपरमार्केट्मधे मांडण्यात आले आहेत. यापैकी 27 प्रकार पश्चिम बंगालमधील तर प्रत्येकी दोन प्रकार बिहार, झारखंड, ओडिशा येथील तर उत्तर प्रदेशातील एक प्रकार आहे. सर्व प्रकारचे आंबे थेट शेतकरी आणि दोन शेतकी उत्पादक संघटनांकडून घेण्यात आले आहेत. हे आंबा प्रदर्शन 20 जून 2022 पर्यंत सुरु राहील.
बहारीनमधील आंबा प्रदर्शन हा भारतीय आंब्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्याच्या अपेडाच्या ' आंबा महोत्सव 2022 ' या नवीन योजनेचा भाग आहे. भारतीय आंब्यांना जागतिक मंच उपलब्ध करून देण्यासाठी असलेली ही अपेडाची कटिबद्धता असून परिणामी पूर्व भागातील 34 प्रकारचे आंबे पहिल्यांदाच बहारीनमध्ये मांडण्यात आले आहेत. यापूर्वी हापूस, केसर, बेगमपल्ली, अशा प्रकारचे पश्चिम आणि दक्षिण भागातील आंब्यांचे प्रकार जागतिक प्रदर्शनात ठेवण्यात आले होते.
या आंबा महोत्सवाचे उदघाटन भारताचे बहारीनमधील राजदूत पीयूष श्रीवास्तव यांच्या हस्ते, जझीरा समूहाचे अध्यक्ष अब्दुल हुसेन खलील दवानी यांच्या उपस्थितीत झाले.
* * *
R.Aghor/N.Mathure/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1833993)
Visitor Counter : 286