युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

खेलो इंडिया युवा स्पर्धेत 8 सुवर्णपदके जिंकून महाराष्ट्राच्या खेळाडूंचे वर्चस्व

Posted On: 09 JUN 2022 5:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जून 2022

 

खेलो इंडिया युवा स्पर्धांमध्ये गुरुवारी महाराष्ट्राने  अॅथलेटिक्समधील त्यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. महाराष्ट्राच्या चार ऍथलिटसनी धावण्याच्या  स्प्रिंट प्रकारात चार पैकी  तीन विजेतेपदे जिंकली.

महाराष्ट्राने चमकदार कामगिरी करत आठ सुवर्ण, तीन रौप्य आणि ट्रॅक आणि फील्ड प्रकारात एक कांस्य पदक मिळवून गुणतालिकेत शीर्षस्थानी असलेल्या हरियाणाच्या गुण फरकातील अंतर कमी केले,  सकाळच्या सत्रानंतर हरियाणाच्या 30 सुवर्ण पदकांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या खात्यात 29 सुवर्णांपदकांसह  केवळ एक पदक कमी राहिले. 

महाराष्ट्राची धावपटू सुदेष्णा शिवणकरने शर्यतीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. मुलींच्या 200 मीटर प्रकारात सुदेष्णाने 24.29 सेकंदात शर्यत पूर्ण करून   महाराष्ट्राच्याच  अवंतिका नरळेला मागे टाकून सुवर्णपदक पटकावले. सुदेष्णाने    या सुवर्णपदकासह  स्प्रिंट विजेतेपदांची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. याआधी तिने मुलींच्या 100 मीटर प्रकारात आणि 4x100 मीटर रिले प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले आहे. 

मुलांच्या  200 मीटर धावण्याच्या शर्यतीत आर्यन कदमने (21.82 सेकंद )  विजेतेपद पटकावले, तर रिया पाटील, प्रांजली पाटील, वैष्णवी कातुरे आणि शिवेचा पाटील या चौकडीने  4x400 मीटर प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यांनी 4:02.76 अशी वेळ नोंदवत  दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पंजाबला 50 मीटर अंतराने  मागे टाकले.

इतर क्रीडा प्रकारात , मुलांच्या  हॉकीच्या अंतिम फेरीत पंजाब आणि  उत्तर प्रदेश संघात विजेतेपदासाठी लढत होईल. पंजाबने पहिल्या उपांत्य फेरीत झारखंडचा 3-0 असा पराभव केला तर उत्तर प्रदेशने ओडिशाचा 3-2 असा पराभव केला.

 

* * *

S.Kakade/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1832682) Visitor Counter : 117


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu