अर्थ मंत्रालय

2014 पासून सरकारने उचललेल्या विविध पावलांमुळे, कठीण काळात अर्थव्यवस्था आणि जनता दोन्हींना तरून जाण्यास मदत झाली- निर्मला सीतारामन


आर्थिक व्यवहार विभागाच्या विशेष दिन सोहळ्याचे वित्तमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, 'नेत्र' संकेतस्थळ आणि मोबाईल अॅपचाही केला प्रारंभ

आर्थिक व्यवहार विभागाच्या तीन लघुपटांचे वित्तमंत्र्यांच्या हस्ते अनावरण, बाह्य अर्थसहाय्यित प्रकल्प, वित्तीय साक्षरता आणि सरकारकडून इतर देशांना पतपुरवठा हे लघुपटांचे विषय

Posted On: 08 JUN 2022 4:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 जून 2022

 

आर्थिक व्यवहार विभागाच्या विशेष दिन सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत करण्यात आले. सेबी म्हणजे भारतीय समभाग आणि विनिमय मंडळाचाही या सोहळ्याच्या आयोजनात सहभाग असून, आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत हा सोहळा भरवण्यात आला आहे. आज उद्घाटन समारंभात, सचिव अजय सेठी आणि इतर मान्यवरांनीही भाग घेतला. तसेच वित्तीय क्षेत्रातील मान्यवर नेतृत्वानेही यावेळी उपस्थिती नोंदवली.

"2014 पासून सरकारने उचललेल्या विविध पावलांमुळे भारताचा पाया पुन्हा भक्कम झाला" असे सांगत वित्तमंत्री सीतारामन म्हणाल्या की, "कोविड महामारीने देशाला गाठण्यापूर्वी सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळेच महामारीच्या अभूतपूर्व परिस्थितीसाठी आपल्याला तयार केले आणि तरून जाण्यास मदत केली".  या उपाययोजनांमध्ये, कॉर्पोरेट कर कमी करणे, अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणावर डिजिटलिकरण करणे, वस्तू आणि सेवा कर लागू करणे दिवाळखोरी आणि नादारी संहिता लागू करणे- यांचा समावेश होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मदत देताना जेव्हा सरकार ठराविक लक्ष्यगटाचा विचार करून, तळागाळातून प्रत्यक्ष माहिती मिळवते, आणि हे सर्व वेगाने वेळेत पूर्ण करून पारदर्शकपणे काम करते, तेव्हा घडून येणारे सकारात्मक परिणाम सर्वांसमोर दिसतातच,  असे त्या म्हणाल्या.

ईसीएलजीएस म्हणजे आपत्कालीन पतहमी योजना या योजनेच्या एका अभ्यास-अहवालाचा संदर्भ सीतारामन यांनी यावेळी बोलताना दिला. मार्च-2022 पर्यंत, या योजनेंतर्गत मंजूर केलेल्या कर्जाची रक्कम  3.19 लाख कोटींपेक्षा अधिक आहे. आणि आता या योजनेला 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 'ही मुभा दिल्यामुळे अनेक लोकांना महामारीच्या काळात ते आर्थिक संकट झेलता आले', असे सदर अहवाल सांगतो

आर्थिक व्यवहार विभागाने अनेक बहुपक्षीय संस्थांच्या पाठिंब्याने देशाच्या प्रत्येक क्षेत्रासाठी बाह्य  मदत वितरीत  केली आहे. भारताने अतिशय हुशारीने निधी उभारला आणि तो केवळ पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठीच नव्हे तर प्रत्येक प्रदेशात उपजीविकेच्या शक्यतांसाठीही तो वितरित केला, हे वित्तमंत्र्यांनी अधोरेखित केले. अनेक देशांमध्ये असलेल्या आणि उपजीविकेसंदर्भातील वातावरणात बदल घडवून आणणाऱ्या, विशेषत: आफ्रिकेतील बहुतेक आणि बेटांवरील देशांमध्ये भारतीय विकास आणि आर्थिक सहाय्य योजना (आयडीईएएस) प्रकल्पांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार विभागाने केलेल्या प्रयत्नांची सीतारामन यांनी प्रशंसा केली.  

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत आयोजित, या समारंभात केलेल्या भाषणात मुख्य आर्थिक सल्लगार डॉ. अनंथा व्ही. नागेश्वरन यांनी सांगितले, की सध्याच्या परिस्थितीत जागतिक राजकीय घडामोडींचे ढग विरून गेल्यानंतर आणि दीर्घ पतधोरणासमोरील आव्हाने संपुष्टात आल्यानंतर, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) तसेच नादारी आणि दिवाळखोरी संहिता (आयबीसी) सारख्या सरकारच्या संरचनात्मक उपाययोजनांचे फायदे आणि क्षमता येत्या काही दशकांमध्ये दिसून येतील.

सीतारामन यांनी यावेळी ‘नेत्र' (नवीन ई-ट्रॅकिंग आणि रिमोट अॅडमिनिस्ट्रेशन)’ पोर्टल आणि भारतीय विकास आणि आर्थिक सहाय्य योजनेसाठी (आयडीईएएस) मोबाइल अॅप्लिकेशनचे उद्घाटन केले.  

एनएसडीएलचा आउटरीच उपक्रम असलेला, विशेषत: विद्यार्थ्यांना गुंतवणुकीसंबंधित मूलभूत गोष्टींशी आणि वित्तीय बाजारपेठेची ओळख करून देण्यासाठी तयार केलेला ‘बाजार का एकलव्य –एक्सप्रेस’ हा कार्यक्रम या समारंभादरम्यान  दाखवण्यात आला.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या अंतरंगात आयकॉनिक सप्ताह  सोहळ्यादरम्यान वित्तमंत्र्यांनी  बाह्य अनुदानित प्रकल्पांवर आधारित ‘सहयोग से समृद्धी’ या लघुपटाचे प्रकाशनही केले. या लघुपटात  1947 पासून भारताच्या विकासाच्या मार्गात बाह्य अनुदानित प्रकल्पांची भूमिका मांडण्यात आली आहे. यामध्ये गेल्या 8 वर्षांमधील  भारताच्या बहुपक्षीय आणि द्विपक्षीय संस्थां सोबतच्या प्रतिबद्धतेवर  विशेष भर देण्यात आला आहे.

सीतारामन यांनी "आयडीईएएस - इंडिया पार्टनरिंग इन ग्लोबल ग्रोथ" या पत सहाय्याशी संबंधित चित्रपटाचे प्रकाशनही  केले. या चित्रपटात विकसनशील अर्थव्यवस्थांसाठी विश्वासू विकास भागीदार म्हणून भारताची ओळख दाखवण्यात आली आहे.

 

* * *

R.Aghor/S.Chavan/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1832156) Visitor Counter : 161


Read this release in: Hindi , Telugu , English , Urdu , Tamil