उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींचा तीन दिवसांचा कतार दौरा सुरु, कतारच्या पंतप्रधानांशी केली शिष्टमंडळस्तरीय चर्चा

Posted On: 05 JUN 2022 6:07PM by PIB Mumbai

 

सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर असलेले भारताचे उपराष्ट्रपती एम.वेंकैया नायडू, दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात काल कतारमध्ये पोहोचले. कतार देशाला भेट देणारे ते भारताचे पहिलेच उपराष्ट्रपती आहेत. दोहा विमानतळावर त्यांचे स्वागत कतारचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री सुलतान बिन साद अल मुरैखी यांनी केले. त्यानंतर कतारमधील भारतीय समुदायाने त्यांच्या निवासस्थानी समारंभपूर्वक त्यांचे स्वागत केले.

आज उपराष्ट्रपती नायडू यांनी कतारच्या राजाचे वडील शेख हमद बिन खलिफा अल थानी यांची भेट घेतली. आणि त्यानंतर त्यांनी कतारचे पंतप्रधान आणि गृहमंत्री शेख खालिद बिन अब्दुलअझीझ अल थानी यांच्यासोबत शिष्टमंडळस्तरीय चर्चा केली.

भारत आणि कतार यांच्यात परस्पर विश्वास आणि आदर या मूल्यांवर आधारित असे ऐतिहासिक नातेसंबंध असल्याचे यावेळी कतारच्या राजाचे वडील शेख हमद बिन खलिफा अल थानी यांनी अधोरेखित केले. भविष्यात कतार भारतात आणखी गुंतवणूक करेल आणि औद्योगिक आणि व्यवसायिक / व्यापार क्षेत्रात यशस्वी झालेले अधिकाधिक उद्योग कतारशी आर्थिक संबंध प्रस्थापित करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. उभय देशांमधील व्यापाराला आणखी नवे आयाम देता येतील तसेच, ऊर्जा क्षेत्रात सर्वंकष भागीदारी आणि परस्परांना फायदेशीर अशी गुंतवणूक भागीदारी प्रस्थापित करता येईल यावर उभय नेत्यांचे एकमत झाले.

मार्च 2020 पासून कतारची भारतातील गुंतवणूक पाचपटीने वाढली असल्याबद्दल प्रशंसा करत नायडू यांनी, "यामध्ये वाढीची आणखी क्षमता आहे, आणि त्यात निश्चितच भरपूर वाढ होऊ शकेल" असे मत व्यक्त केले.

कतार आसपासच्या प्रदेशात एक शैक्षणिक केंद्र म्हणून उदयाला आल्याबद्दल नायडू यांनी कतारचे कौतुक केले. भारतातील अनेक विद्यापीठे कतारमध्ये आपली विदेश अध्ययन केंद्रे सुरु करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

 

The Vice President during delegation level talks with the Prime Minister of Qatar in Doha

भारताच्या गॅसच्या गरजेपैकी सुमारे 40% हिस्सा कतारकडून पुरवला जात असल्याचे नायडू यांनी नमूद केले. भारताच्या ऊर्जासुरक्षेत कतारचे स्थान मोलाचे असल्याचे सांगत, या बाबतीतील संबंध केवळ ग्राहक-विक्रेता इतकेच मर्यादित न ठेवता, सर्वंकष ऊर्जा भागीदारीत ते रूपांतरित होण्याची गरज आहे, असे नायडू यांनी अधोरेखित केले.

हरित विकासावर भारताचा भर असल्याचे आवर्जून सांगत, या नव्या प्रवासातही कतारने भागीदारीच्या मार्गाने भारताला साथ द्यावी, अशी अपेक्षा उपराष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केली.

कतारमध्ये एक प्रार्थना सभागृह आणि एक स्मशानभूमी मिळावी अशी तेथील भारतीयांची दीर्घकाळापासूनची विनंती असल्याचा पुनरुच्चार उपराष्ट्रपती नायडू यांनी यावेळी केला..

***

S.Kane/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1831358) Visitor Counter : 166