राष्ट्रपती कार्यालय

भारताच्या राष्ट्रपतींनी मगहर येथे संत कबीर यांना वाहिली आदरांजली, 'संत कबीर अकादमी आणि संशोधन केंद्राचे' उद्घाटन तसेच 'स्वदेश दर्शन योजनेचा' केला प्रारंभ

Posted On: 05 JUN 2022 4:21PM by PIB Mumbai

 

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (5 जून 2022) उत्तरप्रदेशात मगहर येथे कबीर चौरा धाममध्ये संत कबीर यांना आदरांजली वाहिली. 'संत कबीर अकादमी आणि संशोधन केंद्राचे' उद्घाटन तसेच 'स्वदेश दर्शन योजनेचा' प्रारंभही त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांपूर्वी भूमिपूजन केलेल्या संत कबीर अकादमी आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन करताना कृतार्थ वाटत असल्याची भावना यावेळी राष्ट्रपतींनी व्यक्त केली. 

"संत कबीरांचा जन्म एका गरीब आणि वंचित कुटुंबात होऊनही त्यांनी त्या परिस्थितीला आपली दुर्बलता कदापि मानले नाही, उलट त्या स्थितीला त्यांनी शक्ती मानले आणि वाटचाल केली", असे प्रतिपादन राष्ट्रपतींनी यावेळी केले. "संत कबीर यांना पुस्तकी ज्ञान मिळाले नसले तरी, संतसज्जनांच्या सहवासातून त्यांनी अनुभवजन्य ज्ञान मिळवले. त्या ज्ञानाचे स्वतः प्रयोग करून खात्री पटल्यावर ते आत्मसात करून मगच ते  लोकांपर्यंत पोहोचवत असत. म्हणूनच आजही त्यांनी दिलेली शिकवण बहुजनांना आणि अभिजनांनाही तितकीच भावते", असेही राष्ट्रपती म्हणाले.

"संत कबीरांनी समाजाला समानता आणि सुसंवादाची वाट दाखवली. दिखाऊपणा/दांभिकता आणि भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. ते गृहस्थाश्रमातही संतांप्रमाणे जगले. समाजातील सर्वात दुर्बल घटकांप्रती करुणा आणि सहानुभूती असल्याशिवाय मानवतेची जपणूक होणार नाही, यावर त्यांचा भर असे. असहाय्य लोकांना मदत केल्याविना समाजात सुसंवाद आणि सौहार्द नांदू शकणार नाही, अशी त्यांची शिकवण होती", असे राष्ट्रपती म्हणाले.

संत कबीरांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे मानवता धर्माचे उत्कृष्ट उदाहरण आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. त्यांच्या निर्वाणातही सामाजिक सद्भावाचा आणि ऐक्याचा संदेश दिसून येतो. त्यांची समाधी आणि मझार दोन्ही एकाच ठिकाणी असून, हे सामाजिक ऐक्यचेच उदाहरण होय, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

"संत, गुरु, आणि समाजसुधारक यांनी वेळोवेळी समाजातील दुर्विचार आणि दुष्प्रवृत्ती यांचा नाश  करण्याचे मोठे काम केले, हे भारताचे सद्भाग्यच असल्याची भावनाही राष्ट्रपतींनी व्यक्त केली. समाजाने ज्यांची शिकवण मनापासून स्वीकारली अशा संतांच्या मांदियाळीमध्ये संत कबीर यांना अढळ स्थान आहे", असेही राष्ट्रपती म्हणाले.

मा. राष्ट्रपतींचे भाषण वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करावे.

***

S.Kane/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1831318) Visitor Counter : 192