आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी क्षेत्रीय पत्र सूचना कार्यालय, दूरदर्शन, आकाशवाणी आणि प्रादेशिक माध्यम प्रतिनिधींशी साधला संवाद; कोविड महामारीच्या काळातल्या त्यांच्या महत्वपूर्ण कामगिरीबद्दल केले कौतुक


समृद्ध भारतासाठी स्वस्थ भारताची आवश्यकता आहे आणि निरोगी भारतासाठी निरोगी नागरिक असणं आवश्यक आहे

नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कोविड प्रतिबंधक लसीकरणात हर घर दस्तक अभियानाद्वारे संदेश देणे आवश्यक : डॉ मनसुख मांडवीय

भारत सद्यस्थितीत वैद्यकीय पर्यटनाच्या उत्कर्षबिंदूवर असून त्याद्वारे केवळ ‘भारतात येऊन उपचार ’च नव्हे तर ‘भारताकडून उपचार ’ देण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे: डॉ मनसुख मांडवीय

भारत आरोग्याला सेवाधर्म मानतो आणि आरोग्यसेवा क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज आहे

Posted On: 03 JUN 2022 8:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2022

समृद्ध भारतासाठी आपल्याला निरोगी भारताची आवश्यकता आहे आणि निरोगी भारतासाठी देशातले नागरिक निरोगी असणं आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्याला केंद्रस्थानी मानलं आहे आणि केंद्र सरकारतर्फे विविध आरोग्य विषयक उपक्रम सुरु केले जात आहेत. आरोग्यसेवा क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज असून त्याद्वारे केवळ ‘भारतात येऊन उपचार ’च नव्हे तर ‘भारताकडून उपचार ’ देण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितले. आरोग्यमंत्र्यांनी क्षेत्रीय पत्र सूचना कार्यालय, दूरदर्शन, आकाशवाणी आणि प्रादेशिक माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. या ऑनलाइन सत्रात सर्व राज्यातील 150 हून अधिक अधिकारी आणि प्रादेशिक आरोग्य वार्ताहर उपस्थित होते.

प्रारंभी, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी कोविड महामारीच्या काळातल्या माध्यम प्रतिनिधींच्या महत्वपूर्ण कामगिरीबद्दल आभार मानले. ते म्हणाले की, अशा कसोटीच्या काळात प्रसारमाध्यमांनी तथ्यात्मक माहिती देऊन केवळ माहितीचा जलद प्रसार करण्याच्या इन्फोडेमिकशी लढा दिला. लसीकरणाशी संबंधित अपप्रचार आणि भीती दूर करून लसीची उपयुक्तता आणि लस घेण्याबाबत असलेली साशंकता या समस्यांचे निराकरण केले. पीआयबी, डीडी न्यूज, एआयआर न्यूज आणि माध्यम कर्मचार्‍यांनी कोविड संकटाच्या काळात घेतलेल्या सक्रिय भूमिकेचे त्यांनी कौतुक केले. केवळ सरकारचे प्रयत्न नव्हेत तर "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास" या तत्वामुळे आपण जगातील सर्वात मोठ्या आणि यशस्वी लसीकरण कार्यक्रमाचा भाग बनलो आहोत.असं सांगून या काळात प्राण गमावलेल्या पत्रकारांबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांनी महामारीच्या काळात त्यांच्या क्षमतेचे उच्च प्रमाण सिद्ध केले, असे ते म्हणाले. समृद्ध भारतासाठी निरोगी भारताची आवश्यकता आहे आणि निरोगी भारतासाठी निरोगी नागरिक असणं आवश्यक आहे, या संदेशाचा प्रसार करावा असे आवाहन त्यांनी मध्यमप्रतिनिधींना केले. संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी, नागरिकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने आपण हर घर दस्तक मोहिमेचा दुसरा टप्पा सुरु केला आहे. संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आपण सर्वांचे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा करतो, असं आरोग्यमंत्री म्हणाले. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना क्षयरोग निर्मूलन, मोतीबिंदू, टेलिमेडिसिन आणि ईसंजीवनी आणि मंत्रालयाच्या प्रादेशिक स्तरावरील इतर विविध उपक्रमांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.जनभागीदारीच्या माध्यमातून मोठ्या संख्येने पुढे येण्यास आणि या मोहिमांमध्ये उत्साहाने भाग घेण्यासाठी नागरिकांना प्रेरित करा, असे त्यानी सांगितले.

कोविड-19 महामारी व्यवस्थापन, कोविड-19 लसीकरण यातील मुख्य टप्पे आणि सद्यस्थिती, हर घर दस्तक मोहीम, लस मैत्री उपक्रमांतर्गत जागतिक लसीकरणाच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा, CoWIN ऍप ची उपयुक्तता आणि कोविड-19 व्यवस्थापनादरम्यान समुदायाशी प्रभावी संवाद साधण्यासाठी माध्यमांची महत्त्वपूर्ण भूमिका यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अगरवाल यांनी तपशीलवार सादरीकरण केले. यावेळी उपस्थितांनी त्यांचे अनुभव, राज्यांमधील सर्वोत्तम पद्धती, या क्षेत्रातील आव्हाने आणि नाविन्यपूर्ण सूचना मांडल्या.

 

G.Chippalkatti/B.Sontakke/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1830970) Visitor Counter : 138