ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उत्तम वीज ग्रीड व्यवस्थापनाकरता पॉवर सिस्टिम ऑपेरेशन कोर्पोरेशन POSOCO आणि भारतीय हवामान विभाग यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी

Posted On: 03 JUN 2022 6:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2022

 

राष्ट्रीय ग्रीड कार्यवाह संस्था (पॉवर सिस्टिम ऑपेरेशन कोर्पोरेशन) आणि भारतीय हवामान विभाग (IMD)यांच्यात आज सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार भारतीय उर्जा प्रणालीचे उत्तम व्यवस्थापन आणि विश्लेषणाच्या उद्देशाने संपूर्ण देशातील पॉवर सिस्टम ऑपरेटर्स, भारतीय हवामान विभागाने हवामानाविषयी दिलेल्या माहितीचा वापर करतील.

या सामंजस्य करारावर पोसोकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस. आर. नरसिम्हन आणि भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा, यांनी नवी दिल्ली इथल्या पोसोको कार्यालयात स्वाक्षरी केली. या बैठकीला दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भारतीय हवामान विभाग हवामान विषयक ताजी माहिती प्रत्येक तासाला किंवा त्याहूनही कमी कालावधीच्या अंतराने देईल. तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा, पाऊस पडण्याची शक्यता असलेल्या भागात पुढील 36 तासांचा पावसाचा अंदाज यासंदर्भातली माहिती दिली जाईल. पहाडी क्षेत्रात होणाऱ्या आणि डोंगराळ प्रदेशातून जाणाऱ्या महत्त्वाच्या प्रेषण मार्गावरच्या हिमवर्षावाची शक्यता, याविषयी देखील माहिती दिली जाईल. त्यासह नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांच्या ठिकाणी हवामानाच्या मापदंडांचा अंदाज देखील वर्तवला जाईल.

पोसोको आणि भारतीय हवामान विभाग यांच्यातील या आधीचा सामंजस्य करार यापूर्वी 18 मे 2015 रोजी झाला होता.

पॉवर सिस्टीम ऑपरेशन कॉर्पोरेशन या संस्थेची संपूर्ण मालकी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत परिशिष्ट अ उपक्रमाअंतर्गत भारत सरकारची आहे. राष्ट्रीय ऊर्जा ग्रीडचे एकात्मिक कार्य सुरक्षित पद्धतीने सुनिश्चित करण्याची जबाबदारी या संस्थेची आहे. यात विद्युत कायदा, 2003 अंतर्गत पाच प्रादेशिक लोड डिस्पॅच सेंटर (RLDCs) आणि राष्ट्रीय लोड डिस्पॅच सेंटर (NLDC) यांचा समावेश आहे.

 

 

 

 

G.Chippalkatti/B.Sontakke/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1830921) Visitor Counter : 199


Read this release in: English , Urdu , Hindi