माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चित्रपटातील दृश्याला हवा तो अर्थ देऊन त्यात जीव ओतण्याचे काम ध्वनीरचनाकार करतो -सुप्रसिद्ध ध्वनीरचनाकार आणि ध्वनीसंकलक, रसूल पुक्कुटी मिफ्फ-2022 च्या मास्टरक्लासमध्ये दिले उत्कृष्ट ध्वनिरचनेचे ‘कान’ मंत्र


प्रेक्षकांना काय ऐकवायचे याची निवड ध्वनिरचनाकार करतो- रसूल पुक्कुटी

Posted On: 03 JUN 2022 6:33PM by PIB Mumbai

मुंबई, 3 जून 2022

 

"चित्रपट म्हणजे काळ (time) आणि अवकाश (space) यांचा सातत्याने चालणारा प्रवास असतो. यातला अवकाश कॅमेराच्या मदतीने दाखवला जातो, मात्र त्या अवकाशाला 'अर्थ' देतो तो 'ध्वनी'! म्हणूनच ध्वनी संयोजकाचे काम चित्रपटात सर्वात महत्वाचे असते',असं प्रतिपादन सुप्रसिद्ध ध्वनि रचनाकार पद्मश्री रसूल पुक्कुटी यांनी केलं.

सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग असलेल्या मास्टर क्लासेस मध्ये  आज रसूल पुक्कुटी यांचा ‘चित्रपटातील ध्वनीचे सौंदर्य’ या विषयावर मास्टर क्लास झाला, त्यावेळी ते बोलत होते.

एखादे चलचित्र आपण ध्वनीशिवाय पाहिले तर त्यातला जिवंतपणा आपल्यापर्यंत भिडत नाही.मात्र त्याच चलचित्रात आवाज असला तर, आपल्याला त्या विशिष्ट दृश्यामागचा आवाज, त्याचा वेग जाणवतो, प्रेक्षकाचे मन आणि मेंदू त्या दृश्यासोबत धावू शकते, एका अर्थाने त्या दृश्यात जीव ओतला जातो, असे पुककुटी यांनी सांगितले. हा मुद्दा अधिक परिणामकारकतेने स्पष्ट करण्यासाठी त्यांनी ‘स्लमडॉग मिलेनियर’ या त्यांच्या ऑस्कर विजेत्या चित्रपटातले दृश्य आधी मूक आणि नंतर ध्वनिसह दाखवून त्यातले बारकावे स्पष्ट केले.

ध्वनी रचनाकार, ध्वनी संयोजक नेमके काय करतो, या प्रश्नाला दीर्घ उत्तर देतांना पुक्कुटी यांनी सांगितले की  आपण आपले कान बंद करु शकत नाही, त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्या कानावर पडतात, मात्र आपण त्या ऐकत नाही. मानवात त्याला हवे ते ऐकण्याची क्षमता असते, आणि याचाच वापर ध्वनी संयोजक करतो. तो आपल्याला तेच ऐकवतो, जे त्याला ऐकवायचे आहे. एकच दृश्य त्या दृश्यातील विविध व्यक्तिरेखांच्या परिप्रेक्ष्यातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तशी ध्वनीरचना केली जाते, असं त्यांनी सांगितलं.

ध्वनीच्या विविध प्रकारांविषयी माहिती देतांना त्यांनी सांगितले की, चित्रपट निर्मिती करतांना आम्ही पाच प्रकारच्या ध्वनीचा वापर करतो. एक म्हणजे प्रॉडक्शन साऊंड, दूसरा फोले साऊंड, तिसरा अॅम्बियन्स साऊंड, डिझाईन्ड साऊंड आणि संगीत.”

'स्लमडॉग मिलेनियर' ह्या चित्रपटाच्या ध्वनी रचनेविषयी बोलतांना ते म्हणाले की मुंबईतल्या गजबजलेल्या रस्त्यांवर, धारावीसारख्या गर्दीच्या ठिकाणी ह्या सिनेमाचे चित्रीकरण झाले, त्यातही दिग्दर्शकाला सगळे नैसर्गिक आवाज हवे होते. अशावेळी,'मानवाची ठराविक गोष्टी ऐकण्याची क्षमता' या तत्त्वावरच मी काम केले. मानवाकडे निवड करण्याची ही क्षमता असली तरी, मशीनकडे ती नाही, ते सगळे आवाज टिपतात' म्हणून मी दृश्याच्या आजूबाजूला अनेक मायक्रोफोन लावून ठेवले,नंतर तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांचे मिश्रण संयोजन करुन दिगदर्शकाला हवा तो परिणाम मिळेल अशी ध्वनिरचना केली, असे त्यांनी सांगितले.

भारतातील काही चित्रपट जिथे नायकाला 'हिरो' म्हणून अनेक अद्भुत, अचाट गोष्टी करतांना दाखवले जाते, अशा चित्रपटात अत्यन्त लाऊड ध्वनी ची गरज असते, अशा अद्भुत दृश्यांवर प्रेक्षकांचा विश्वास बसावा, त्यांना त्या विश्वात घेऊन जाणे, हे आव्हानात्मक काम असते. आणि तिथे ध्वनीरचना काराची भूमिका महत्वाची ठरते. प्रेक्षकांना त्या दृश्यात घेऊन जाण्याचे कां ध्वनी रचना कार करतो, त्यांच्या मेंदूला ते दृश्य पटेल, अशी ध्वनी रचना तो करतो, असे पुक्कुटी यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी रजनीकांत यांचा रोबो-2 आणि पुष्पा या गाजलेल्या चित्रपटांतील दृश्येही दाखवली. ध्वनिरचना करतांना आपल्याला कथेचा संदर्भ, दिग्दर्शकाचा दृष्टिकोन आणि चित्रपटातून निर्माण होणारा सामाजिक-सांस्कृतिक प्रभाव अशा गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.’ असे त्यांनी सांगितले. हा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी त्यांनी “द गुड रोड’ चित्रपटाचे उदाहरण दिले.  कच्छच्या वाळवंटातील पार्श्वभूमीवर चित्रित चित्रपटात, वाळवंटातील वाऱ्याचा आवाज, कच्छी लोकगीतांचा पार्श्वसंगीत म्हणून वापर या सगळ्याचा मिलाफ करुन, केवळ दृश्यच नाही, तर त्या चित्रपटात चित्रित प्रदेशाची संस्कृती देखील दाखवता येते, हे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले

चित्रपटात सायलेन्स म्हणजे, ‘शांतता’ हाही एक ध्वनी असतो का, या प्रश्नाचे उत्तर देतांना त्यांनी सांगितले की, ध्वनिरचनाकाराने कितीही प्रयत्न केला तरी तो संपूर्ण शांतता निर्माण करु शकत नाही. कारण, कुठला ना कुठला आवाज तुमच्या कानांवर आदळत राहतो. तरीही, सत्यजित रे यांच्यापासून अनेक प्रतिभावंतानी असे म्हटले आहे, की ‘शांतता हा सर्वात परिणामकारक आवाज असतो’, तर त्याचा अर्थ काय? तर शांतता हा व्यक्तीच्या मनाने घेतलेला अनुभव असतो. म्हणजे एखाद्या अत्यंत भावनिक क्षणी प्रेक्षकांना त्या अनुभवाची प्रचिती करुन देणे म्हणजे, - ‘शांततेचा आवाज !’मानवी व्यवहार, मानवाचे वर्तन देखील, अशा गोष्टींवर अवलंबून असते, ज्या तो ऐकत असतो, असे मानसशास्त्रही त्यांनी सांगितले.

भारतीय आणि परदेशी, विशेषतः युरोपीय देशांमधल्या चित्रपटनिर्मितीतला, ध्वनिरचनेतला फरक स्पष्ट करतांना ते म्हणाले की युरोपीय लोक ध्वनीसंयोजनाबाबत अत्यंत संवेदनशील आहेत, त्यांना ध्वनीतले सूक्ष्म बदल कळतात, त्यातल्या बारकाव्याविषयी ते जागरूक असतात. युरोपीय लोकांच्या ध्वनि संवेदनशीलतेविषयी सांगतांना त्यांनी उदाहरण दिले, की त्यांनी अलीकडेच फारो बेटावर केलेल्या एका माहितीपटाविषयी संगितले, की त्या सिनेमात सागराच्या लाटांचा जो आवाज वापरला गेला, तो बाल्टिक समुद्राच्या लाटांचा नाही, असं दिग्दर्शकाला जाणवले. ध्वनीचा आवाज दृश्यापेक्षा मोठा असू नये, असा त्यांचा विचार असतो. त्याचवेळी भारतात, अनेकदा, नायकप्रधान चित्रपटात आवाज मोठा असावा, असा प्रयत्न असतो, असेही ते म्हणाले.

भारत हा जगातला एकमेव असा देश आहे, जिथे, ऐकणे-श्रवण म्हणजे ज्ञान समजले जाते. आपल्याकडे वेदासारख्या ग्रंथातून मिळालेले ज्ञान, वाणी आणि श्रवणातून पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचले. आपल्याच देशात बुद्धिमान व्यक्तीला, ‘बहुश्रुत’ म्हटले जाते, इतकी श्रवणाची परंपरा मोठी आहे. मात्र दुर्दैवाने आपण चित्रपट सृष्टीत ही परंपरा विसरूनच गेलो आहोत, ध्वनिची ताकद आपल्याला चित्रपटसृष्टीत हवी तेवढी वापरता आली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

यशस्वी ध्वनिरचनाकार होण्यासाठी कशी तयारी केली, या प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी सांगितले की, त्यांनी एफटीआयआय मधून ध्वनिरचनेचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर जगभरातील ध्वनि रचनेचा अभ्यास केला. आणि तशाच प्रकारची ध्वनिरचना भारतात यावी असा त्यांचा प्रयत्न होता, पण त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून मग त्यांनी हे क्षेत्र सोडण्याचा विचार जवळपास पक्का केला होता, मात्र, एका व्यक्तीनेत्यांना हवी तशी ध्वनिरचना करण्याचे आमंत्रण दिले आणि तेव्हापासून त्यांचा हा प्रवास सुर झाला, असे त्यांनी सांगितले.

रसूल पुक्कुटी, हे सुप्रसिद्ध ध्वनिरचनाकार, ध्वनिसंकलक आहेत. भारतीय अभिजात संगीताचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तम वापर करत, त्यांनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात नावलौकिक मिळवला आहे. त्यांच्या अनेक चित्रपटांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. स्लमडॉग मिलेनियर चित्रपटासाठी अकादमी पुरस्कार, बाफटा पुरस्कार यासह रोअर टायगर्स ऑफ सुंदरबन्स, अनफ्रीडम, इंडिया’ज डॉटर अशा चित्रपटांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना 2010 साली पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

 

* * *

PIB MIFF Team | R.Aghor/Darshana/MIFF-58

चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms /#FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !

#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?

जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.

कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट  उपलब्ध झाल्यावर  बघता येतील.

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1830892) Visitor Counter : 341


Read this release in: English , Urdu , Hindi