माहिती आणि प्रसारण मंत्रालय
मिफ्फ-2022 मध्ये सहभागी झालेल्या तीन दिग्दर्शकांनी मिफ्फमध्ये साधला संवाद
मुलांसाठी असलेल्या अॅनिमेशनपटात हिंसा आणि अश्लीलता नको, केवळ निखळ मनोरंजन हवे- अॅनिमेशन निर्माते हेमंत शिंदे यांनी व्यक्त केले मत
प्रेमाचा गोडवा आणि नात्यातल्या ताजेपणा टिकवून ठेवण्याचा संदेश, माझा ‘गजरा’ हा चित्रपट देतो- विनीत शर्मा
‘इनकोंगनेटो’ हा रवी मुप्पा यांचा रहस्यकथा लघुपट ‘हिचकॉकियन थ्रीलर’ शैलीने तयार केलेला
Posted On:
31 MAY 2022 7:35PM by PIB Mumbai
मुंबई, 31 मे 2022
मुंबईत सुरु असलेल्या सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, विविध स्पर्धा गटात लघुपट आणि अॅनिमेशनपट असलेल्या तीन दिग्दर्शकांनी आज, 31 मे 2022 रोजी ‘मिफ्फसंवाद’ दरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अॅनिमेशन पट निर्माते हेमंत शिंदे यांचा “जंगल-मंगल’, विनीत शर्मा यांचा लघुपट ‘गजरा’ आणि पटकथाकर रवी मुप्पा यांचा ‘इनकोंगनेटो’हा रहस्यपट या महोत्सवात दाखवले जाणार आहेत.
अॅनिमेशनपट निर्माते हेमंत राजाराम शिंदे यांचा ‘जंगल मंगल’ हा अॅनिमेशनपट मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- मिफ्फ 2022 च्या स्पर्धा गटात आहे. ‘जंगल-मंगल’ हा एक विनोदी अॅनिमेशनपट आहे, ज्यात, जंगली-म्हणजे पृथ्वीवरचे लोक आणि मंगली म्हणजे मंगळ ग्रहवासी यांच्यात युद्ध होतं या संकल्पनेला धरून, धमाल कल्पनाविश्व रंगवलं आहे.
अॅनिमेशन क्षेत्रात दीर्घकाळाचा अनुभव असलेले,शिंदे यांनी, लोकप्रिय कार्टून मालिका, ‘मोटू-पतलू’, ‘शोले 3D’ आणि टूनपूरका सुपरहीरो अशा चित्रपट आणि मालिकांसाठी योगदान दिले आहे. लहान मुलांसाठी तयार केल्या जाणाऱ्या अॅनिमेशनपटात, हिंसा आणि इतर काही असभ्य गोष्टी असू नयेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं. हे चित्रपट मुलांना निखळ आनंद देणारे, त्यांना हसवणारे असावेत, असा आपला प्रयत्न असतो, असे ते म्हणाले. कोविडकाळात ह्या चित्रपटासाठी खूप मेहनत घेता आली, आणि त्यातूनच हा अॅनिमेशनपट तयार झाला असं त्यांनी सांगितलं.
अभिनेते आणि आता दिग्दर्शनात पदार्पण केलेले, विनीत शर्मा यांचा ‘गजरा’ हा लघुपट देखील या महोत्सवात राष्ट्रीय स्पर्धा विभागात आहे. सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी , क्षिती जोग आणि जयवंत वाडेकर अशा दिग्गज अभिनेत्यांची या चित्रपटात भूमिका असून, ध्वनिसंयोजन सुप्रसिद्ध ध्वनिसंयोजक रसूल पुक्कुटी यांनी केलं आहे. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा आणणाऱ्या गोष्टी खूप मोठ्याच असायला हव्यात असं नाही, एक साधासा गजरा देखील त्यांच्या नात्यातला ताजेपणा, गोडवा टिकवून ठेवू शकतो, या कल्पनेवर हा सिनेमा आधारलेला आहे. मुंबईत एका साध्याशा झोपडीत राहणाऱ्या एका जोडप्यात रोज नवऱ्याने बायकोसाठी आणलेल्या गजऱ्यामुळे कसा सुसंवाद कायम राहतो, हे प्रत्यक्ष पाहिल्यावर, त्यावर सिनेमा करावा असा विचार मनात आला, आणि त्यातूनच ह्या लघुपटाची कल्पना साकारली असं, विनीत शर्मा यांनी सांगितलं.
आपण पैसा कीर्ती, प्रसिद्धी अशा सगळ्याच्या मागे धावत आयुष्य वाया घालवतो, मात्र असं धावतांना आपल्याला आत्मचिंतन करायला, आपल्या कुटुंबासोबत राहायला वेळच मिळत नाही, कोविड काळात हे प्रकर्षाने जाणवलं. म्हणूनच नात्यातला बंध अधिक मजबूत करण्याचा संदेश देणारा हा चित्रपट मी तयार केला असं शर्मा यांनी सांगितले.
निर्माते आणि लेखक आणि पटकथाकार रवी मुप्पा यांचा ‘इनकोंगनेटो’ हा चित्रपट नावाप्रमाणेच, आपली ओळख लपवून काम करणाऱ्या मुलीची, रहस्यकथा आहे. एक तरुण मुलगी, छुप्या कॅमेराच्या मदतीने, स्वतःचे व्हिडिओ बनवून त्यातून पैसे मिळवत असते. मात्र एका व्यक्तीला ती हे व्हिडिओ पाठवते,तेव्हा त्यातून त्याला तिच्यावर होणाऱ्या देहविक्रीच्या अत्याचाराची माहिती कळते. तिच्या आयुष्यातला संघर्ष आणि संकटे पाहून त्याची सदसद्विवेकबुद्धी त्याला साद घालते. हा सिनेमा सुप्रसिद्ध इंग्रजी रहस्य चित्रपट दिग्दर्शक अल्फ्रेड हिचकॉक यांच्या ‘हिचकॉकियन थ्रीलर’ च्या शैलीने बनवण्यात आला आहे, असं रवी मुप्पा यांनी सांगितले.
रवी मुप्पा यांनी, स्त्री, बाला असे यशस्वी चित्रपट आणि ‘द फॅमिली मैन’ सारख्या लोकप्रिय वेबसीरिजची पटकथा लिहिली आहे. त्यांनी ‘वाळू’ या वाळूतस्करांवरील चित्रपटाची कथाही लिहिली आहे
* * *
PIB MIFF Team | R.Aghor/Darshana/MIFF-29
चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms /#FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !
|
#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?
|
जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.
|
कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट उपलब्ध झाल्यावर बघता येतील.
|
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1829866)
Visitor Counter : 222