पंचायती राज मंत्रालय
पंतप्रधानांनी शिमला येथे ‘गरीब कल्याण संमेलना’ला संबोधित केले
गोव्यात मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची गरीब कल्याण संमेलनाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती
पंतप्रधानांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता जारी
गोव्यातील 16,000 शेतकरी पीएम-किसान योजनेचे लाभार्थी
Posted On:
31 MAY 2022 4:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/गोवा, 31 मे 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिमला, हिमाचल प्रदेश येथे गरीब कल्याण संमेलनाला संबोधित केले. केंद्र सरकारला सत्तेत 8 वर्षे पूर्ण झाल्यामुळे विविध राज्यांच्या राजधान्या, जिल्हा मुख्यालये आणि कृषी विज्ञान केंद्रांमध्ये गरीब कल्याण संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. गोव्यात उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने पणजी येथे आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने रवींद्र भवन, मडगाव येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी पणजी येथील कार्यक्रमात सहभाग घेऊन लाभार्थ्यांना संबोधित केले आणि त्यांच्याशी संवाद साधला. राज्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे 16,000 लाभार्थी असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्य वेगाने विकासाकडे वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राज्यातील 6 लाख नागरिकांना मोफत रेशन मिळत आहे.
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, उज्जवला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, स्वच्छ भारत मिशन (शहरी आणि ग्रामीण), जल जीवन मिशन आणि अमृत, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, एक देश-एक रेशनकार्ड, आयुष्मान भारत, पीएम जन आरोग्य योजना, मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, गोव्यात मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार केंद्र सरकारच्या सर्व योजनांची यशस्वी अंमलबजावणी करत आहे. जनकल्याण आणि आरोग्य ही सरकारची प्राथमिकता आहे. गोवा मेडिकल हब म्हणून उदयास येत आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयांतर्गत उभारण्यात आलेल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे लवकरच लोकार्पण करण्यात येईल. तसेच राज्यात आयुष मंत्रालयांतर्गत 20 आरोग्य केंद्र मंजूर झाल्याची माहिती श्रीपाद नाईक यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याप्रसंगी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 11 वा हप्ता जारी करण्यात आला. याअंतर्गत 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 21,000 कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आली. शिमला येथे झालेल्या कार्यक्रमाला हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची उपस्थिती होती.
***
S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1829771)
Visitor Counter : 142