माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटात, फुलवा खामकर यांचा ‘मासा’ हा पहिलाच लघुपट


मराठी-हिन्दी चित्रपटसृष्टीतली सुप्रसिद्ध कलाकार मंडळी असलेला हा लघुपट सासू-सुनेच्या नात्यातली गुंतागुंत हळुवारपणे मांडतो—फुलवा खामकर, दिग्दर्शिका

समाजाच्या सर्व क्षेत्रात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असलेल्या पारंपरिक वेदनेचे दुष्टचक्र भेदले जाईल का, याचं उत्तर सासू सुनेच्या नात्यातून हा चित्रपट देतो – अभिनेत्री अमृता सुभाष

Posted On: 31 MAY 2022 4:25PM by PIB Mumbai

मुंबई, 31 मे 2022

 

“मासा’ हा लघुपट, दोन वेगळ्या वयातल्या स्त्रियांच्या नात्याची कथा आहे, त्याचवेळी ही त्या दोघींच्या वैयक्तिक आयुष्याचाही प्रवास मांडण्याचा प्रयत्न आहे, असं मत, या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आणि सुप्रसिद्ध नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर यांनी व्यक्त केलं. मुंबईत सुरु असलेल्या 17 व्या मिफ्फच्या आजच्या तिसऱ्या दिवशी ‘मिफ्फ संवाद’ मध्ये प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या. या चित्रपटात ‘केतकी’ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष देखील यावेळी उपस्थित होत्या.

‘मासा’ या लघुपटाची कथा अभिनेते आणि लेखक संदेश कुलकर्णी यांनी लिहिली आहे. हा सिनेमा सासू आणि सुनेमधलं नातं,आणि स्त्री म्हणून त्यातल्या अव्यक्त जाणीवा व्यक्त करणारा आहे.  सिनेमाची मुख्य व्यक्तिरेखा, रखमा यांचा तरुण मुलगा अपघातात गेल्यानंतर त्या, त्यांची सून केतकीसोबत, लहानग्या नातवाला सांभाळत, घरोघरी डबे देऊन चरितार्थ चालवत असतात. मुलगा आणि नवरा गेल्यामुळे, दोघींच्याही आयुष्यात निर्माण झालेल्या पोकळीतून त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला असतो. त्यात केतकीच्या आयुष्यात एक पुरुष येतो. गावातल्या, 75 वर्षांच्या, विधवा सून आणि नातू असलेल्या रखमाबाई या घटनेचा सामना कसा करतात, याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला हा सिनेमा बघायला हवा. चित्रपटात रखमाची व्यक्तिरेखा ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी साकारली आहे. तर, संदेश कुलकर्णी यांचीही यात महत्वाची भूमिका आहे.

‘मासा’ हा लघुपट सासू सुनेची कथा सांगतो, त्याचवेळी आपल्या समाजात, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, वारिष्ठांकडून कानिष्ठाचा छळ करण्याची जी मानसिक सहजवृत्ती आहे, त्यावरही हा सिनेमा भाष्य करतो, असे मत, अमृता सुभाष यांनी व्यक्त केले. “सासूला तिच्या तरुणपणी, सून म्हणून जो त्रास भोगावा लागतो, तोच त्रास ती सासूच्या भूमिकेत गेल्यावर आपल्या सुनेला देते. ही प्रत्येक नातेसंबंधांत आपल्याला दिसते. ही मानसिक प्रवृत्ती एखाद्या दुष्टचक्रासारखी सर्व नात्यांत तणाव निर्माण करते. याही नात्यात तो तणाव  कायम आहे, की निवळतो, ही आपल्याला सिनेमातून कळेल.” असं अमृता सुभाष यांनी सांगितले.

रायगड जिल्हयातल्या नागाव इथे चित्रीकरण झालेल्या या लघुपटात कोंकणी पार्श्वभूमी दाखवली आहे. नृत्यदिग्दर्शिका म्हणून इतक्या वर्षांचा अनुभव असतांना, सिनेमाचे, लघुपटाचे दिग्दर्शन करणे हा संपूर्ण वेगळा अनुभव होता. मात्र, नृत्याची, विशेषतः तालाची समज असण्याचा फायदा मला या दिग्दर्शनात झाला, अशी माहिती फुलवा खामकर यांनी दिली. उत्तम अभिनेते तर सोबत होतेच त्याशिवाय, छायाचित्रकार म्हणून अमोल गोळे, संकलक क्षिती खंडागळे, संगीतकार नीलेश मोहरीर अशी तगडी टिम माझ्यासोबत होती, त्याचा मला खूप आधार मिळाला, असंही त्या पुढे म्हणाल्या.

मिफ्फ हा लघुपटांना प्रोत्साहन आणि जागतिक व्यासपीठ उपलब्ध करुन देणारा एक उत्तम उपक्रम आहे, असंही त्यांनी सांगितलं. मुंबईत फिल्म्स डिव्हिजन च्या परिसरात सुरु असलेल्या सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपटात, वेगवेगळ्या विषयांवरील लघुपट, माहितीपट, आणि अॅनिमेशन पट रसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. हा महोत्सव चार जूनपर्यंत प्रत्यक्ष आणि ऑनलाईन स्वरूपात सुरु असणार आहे. 


* * *

PIB MIFF Team | R.Aghor/Darshana/MIFF-26

चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms /#FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !

#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?

जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.

कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट  उपलब्ध झाल्यावर  बघता येतील.

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1829761) Visitor Counter : 121


Read this release in: English , Urdu , Hindi