आयुष मंत्रालय

मानवतेसाठी योग ही आठव्या आंतरराष्ट्रीय योगदिनाची संकल्पना


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमात या संकल्पनेची घोषणा केली होती

Posted On: 30 MAY 2022 9:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 मे 2022

यंदाचा आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन "मानवतेसाठी योग" या संकल्पनेवर आधारित असेल. 21 जून 2022 रोजी भारतासह संपूर्ण जगभरात साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनासाठी आयुष मंत्रालयाने या संकल्पनेची निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कर्नाटकात म्हैसूर इथं आयोजित करण्यात आला आहे. कोविड 19 महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना "निरामयतेसाठी योग" अशी होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमात यावर्षीच्या संकल्पनेची घोषणा केली होती. या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना खूप विचारविनिमय आणि सल्लामसलत केल्यानंतर निवडण्यात आली आहे आणि ती अतिशय समर्पक आहे. कोविड-19 संसर्ग सर्वत्र थैमान घालत असताना , योगाभ्यासाने मानवतेचे दुःख कमी करण्यासाठी आणि कोविड नंतरच्या उदयोन्मुख भू-राजकीय परिस्थितीतही मदत केली. योगाभ्यास करुणा आणि दयेचा संदेश देऊन लोकांना एकत्र आणेल, त्यायोगे एकतेची भावना वाढीस लागेल आणि जगभरातील लोकांमध्ये प्रतिकूल परिस्थिती देखील तग धरून राहण्याची क्षमता निर्माण करेल.

 पंतप्रधानांनी अत्यंत समर्पकपणे यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना " मानवतेसाठी योग" अशी निवडली आहे, असं केंद्रीय आयुष, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री, सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले. योग ही एक अशी शक्ती आहे ज्यामुळे आनंद, आरोग्य आणि शांती यांचा अनुभव अंतर्मनाने घेता येतो आणि ती व्यक्तीच्या आंतरिक चेतना आणि बाह्य जग यांच्यातील सतत संबंधाची जाणीव वाढवते. आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना या विचाराचा प्रसार करण्यात नक्कीच यशस्वी होईल.

मानवतेसाठी योगावर लक्ष केंद्रित करून, यावर्षी दिव्यांगजन , तृतीयपंथीय, महिला आणि बालकांसाठी विशेष कार्यक्रम आखण्यात आले आहेत, शाळांमधील योगशिक्षणाचा अविभाज्य भाग असलेल्या मानवी मूल्यांवरही लक्ष केंद्रित केले आहे. यावर्षी आपल्या गावांमध्ये, ग्राम पंचायतींमध्ये देखील योग दिन कार्यक्रमात मोठा सहभाग अपेक्षित आहे,कारण सामाईक सेवा केंद्र (CSCs) सामाईक योगा प्रोटोकॉल (CYP) च्या सराव आणि प्रशिक्षणाला प्रोत्साहन देत आहेत आणि लाखो गावकरी आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 मध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

आठव्या आंतरराष्ट्रीय योगदिनी अनेक उपक्रमांचा आरंभ होणार आहे, त्यापैकी "गार्डियन रिंग" हा एक अभिनव कार्यक्रम आहे, जो सूर्याच्या हालचाली दर्शवेल, विविध देशांमध्ये सूर्याच्या हालचालींसोबत योगासने करणाऱ्या लोकांचा यात सहभाग असेल,. डीडी वाहिन्यांवर थेट प्रक्षेपित होणारा हा एक अद्भुत रिले योग प्रवाह कार्यक्रम असेल.

देश यंदा "आझादी का अमृत महोत्सव" देखील साजरा करत असल्याने, 21 जून रोजी राष्ट्रीय स्तरावरील 75 महत्वाच्या स्थळांवर मोठ्या प्रमाणात सामाईक योग प्रोटोकॉल (CYP) अंतर्गत प्रात्यक्षिकं देखील दाखवली जातील. त्याच धर्तीवर विविध राज्यांनी निवडलेल्या त्यांच्या राज्यातल्या 75 महत्वाच्या स्थळांवर देखील असेच कार्यक्रम आणि योग प्रात्यक्षिकं सादर केली जातील.

8व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयुष मंत्रालय आणि मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक कार्यक्रमांद्वारे आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 (IDY2022) आवृत्तीचा प्रचार केला जात आहे. .

13 मार्च 2022 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाची 100 दिवसांची उलटगणती अधोरेखित करण्यासाठी एक कार्यक्रम साजरा करण्यात आला होता आणि त्याद्वारे 13 मार्च ते 21 जून, 2022 पर्यंत जगभरात 100 दिवस, 100 शहरे आणि 100 संस्थांमध्ये ही मोहीम सुरु करण्याची पायाभरणी झाली. नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर 75व्या दिवसाच्या उलटगणतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आसाम मध्ये शिवसागर, येथे 50 व्या दिवसाची उलटगणती तर आणि हैदराबाद मध्ये तेलंगणा येथे 25 व्या दिवसाच्या उलटगणतीचे कार्यक्रम साजरे करण्यात आले.


G.Chippalkatti/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1829596) Visitor Counter : 267


Read this release in: Hindi , Telugu , English , Odia , Urdu