राष्ट्रपती कार्यालय

भारताच्या राष्ट्रपतींनी उज्जैन येथे अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाच्या 59 व्या महाधिवेशानाचे आणि सरकारी आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे केले उद्घाटन


आयुर्वेद अधिक खोलवर जाणून घेण्याची आणि सध्याच्या काळानुसार तांत्रिक बाबींमध्ये सुधारणा करण्याची हीच वेळ: राष्ट्रपती कोविंद

Posted On: 29 MAY 2022 6:40PM by PIB Mumbai

 

भारताचे राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांनी आज मध्यप्रदेशमधील उज्जैन येथे अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाच्या महाधिवेशानाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उज्जैनमधील सरकारी आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचेही उद्घाटन केले.

या संमेलनाला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाले की, जगभरात अनेक वैद्यकीय प्रणाली अस्तित्वात आहेत, मात्र आयुर्वेद या सर्वांपेक्षा वेगळा आहे. आयुर्वेदाचा अर्थ आहे, जीवनाचे विज्ञान. पॅथीहा शब्द जगभरात प्रचलित असलेल्या अनेक वैद्यकीय प्रणालींशी संबंधित आहे. एखादा रोग झाल्यावर त्याचा उपचार करण्याची पद्धत असा या शब्दाचा अर्थ आहे. मात्र आयुर्वेदामध्ये आरोग्यसेवेबरोबर रोग प्रतिबंधावरही भर दिला जातो.

आपल्याकडे आयुर्वेदाचे पारंपरिक ज्ञान आहे, हे आपले भाग्य असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. परंतु आज प्रमाणीकरण आणि गुणवत्तेसाठी संशोधन आणि तपास करण्याची वेळ आहे. वैज्ञानिक चिकित्सेला जपून आणि आजच्या गरजेनुसार तांत्रिक बाबींमध्ये सुधारणा करून आयुर्वेदाचे ज्ञान अधिक खोलवर जाणून घेण्याची ही वेळ असल्याचे ते म्हणाले. 

भारतीय वैद्यकीय चिकित्सा पद्धतींचे संरक्षण आणि प्रचार करण्यासाठी भारत सरकारने वेळोवेळी अनेक उपाययोजना केल्याचे राष्ट्रपती म्हणाले. तरी, वर्ष 2014 मध्ये स्वतंत्र आयुष मंत्रालयाची स्थापना झाल्यावर या कामाला आणखी गती मिळाली. भारत सरकारशी संबंधित विविध संशोधन परिषदांनी आयुर्वेदाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. 

आपल्या आरोग्याची स्थिती आपला आहार, जीवन पद्धती आणि दिनचर्येवर देखील अवलंबून असते. आपली रोजची आणि ऋतूमानानुसार दिनचर्या काय असावी आणि  आपला आहार कसा असावा, हे सर्व आयुर्वेदात स्पष्ट केल्याचे ते म्हणाले. या महाधिवेशाना दरम्यान आयुर्वेद आहार- निरोगी भारताचा आधारया विषयावर चर्चा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या विचारमंथनाचे फलित लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी उपयोगी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन सुरुवातीपासूनच आयुर्वेदाच्या शास्त्राला भारताची राष्ट्रीय वैद्यकीय प्रणाली बनवण्याचे काम करत आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 

राष्ट्रपती म्हणाले की, आयुर्वेदाचे प्रशासन, संशोधन आणि शिक्षणाशी संबंधित लोक एका ठिकाणी जमले आहेत, त्यामुळे अशी अपेक्षा करता येईल की प्रशासक धोरणात्मक मर्यादा दूर करतील आणि सामान्य लोकांमध्ये आयुर्वेदाबद्दल जागृती वाढवतील; आयुर्वेदाचे शिक्षक असे दर्जेदार शिक्षण देऊन पात्र चिकित्सक तयार करतील, जे लोकांना परवडणारे उपचार देऊ शकतील; आणि संशोधक रोगाचा उपाचार आणि रोग-विज्ञानाच्या नवीन क्षेत्रांमधील संशोधन, दस्तऐवजीकरण आणि प्रमाणीकरणाच्या माध्यमातून आयुर्वेदाची पोहोच, परिणामकारकता आणि लोकप्रियता वाढवतील.  

***

G.Chippalkatti/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1829248) Visitor Counter : 144