माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहितीपट,लघुपट आणि अनिमेशनपट यांना समर्पित असलेल्या 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उदघाटन समारंभात तीन प्रकारच्या चित्रपटांची रसिकांना मेजवानी
Posted On:
29 MAY 2022 11:16AM by PIB Mumbai
मुंबई, 29 मे 2022
माहितीपट,लघुपट आणि अनिमेशनपट यांना समर्पित असलेला 17 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आजपासून मुंबईतील फिल्म डिव्हिजन परिसरात सुरू होत आहे. आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम वरळी इथे नेहरू केंद्रातल्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. उद्घाटनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर महोत्सवाच्या ओपनिंग फिल्म्स म्हणून तीन चित्रपट देखील रसिकांना दाखवले जाणार आहेत.
आयोजकांनी शुभारंभाच्या चित्रपटांसाठी तीन विविध प्रकारच्या चित्रपटांची निवड केली आहे. यात 'कास्ट अवे' हा फ्रान्सचा अँनिमेशनपट, जपानचा, 'शाबु शाबु स्पिरिट' हा लघुपट आणि भारतातला मणिपुरी माहितीपट 'मीरम- द फायरलाईन' दाखवले जाणार आहेत. हा महोत्सव माहितीपट, लघुपट आणि अँनिमेशनपटाना समर्पित असतो, त्यामुळे शुभारंभाच्या चित्रपटांसाठी प्रत्येक प्रकारातून एका चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
हे तिन्ही चित्रपट मिफ मध्ये नंतरही दाखवले जाणार आहेत. मिफमधे समाविष्ट चित्रपटांमधील, भाषा, आशय, विषय आणि पद्धती यांच्यातील वैविध्य या तीन चित्रपटातून रसिकांना नक्कीच दिसेल.
शुभारंभाच्या चित्रपटांविषयी:
“कास्टअवे”
अॅनिमेशन | 6’ 30” | फ्रांस | 2020
दिग्दर्शक : रेचेल ब्ऑस्क-बिरेन, व्हेसो कॅरेत, सीमॉ फॅब्री, मॅरी गुटीयेर, मॅर्गो लोपेझ, लेओपोल्दीन पैरद्री आणि फ्लोरन व्हिक्टर
स्पेशल पॅकेज मधून : अनिम ! आर्ते (ANIM!ARTE) – विद्यार्थी अॅनिमेशन चित्रपट महोत्सव, ब्राझिल
कथासार :
एक एकाकी मुलगी, आकाशात राहत असते, तिला भीती वाटणाऱ्या पृथ्वीवरील जगापासून खूप दूर. एक दिवस, कोणी एक आगंतुक तिच्या जगात येतो, आणि तिचे शांत चालणारे आयुष्य ढवळून टाकतोआणि तिच्या हक्काच्या ढगावरुन ढकलून देतो.
“शाबु शाबु स्पिरीट”
लघुपट | 10’32”| जपान |2015
दिग्दर्शक : युकी साईतो
स्पेशल पॅकेज: फिल्म फ्रॉम शॉर्ट्स फिल्म फेस्टिव्हल, जपान
कथासार :
किटा हा प्रियकर, आपल्या प्रेयसीच्या कुटुंबीयांना, तिचे वडील शोजो ह्यांना भेटायला जातो. शोजो गुपचुप त्याची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करतो. किटा आपल्या मुलीशी लग्न करण्यास पात्र आहे की नाही, याची तो आडून आडून परीक्षा घेत असतो. त्यातून दोघांमध्ये नकळत निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी, मुलीची आई, शाबु-शाबु या एकाच भांड्यात बनवलेला नेब हा पारंपरिक जपानी पदार्थ बनवायला घेते, आणि हा शाबु-शाबु च शोजो आणि किटा ला एकमेकांच्या जवळ आणतो, त्यांच्यातला तणाव निवळतो.
शाबु-शाबु हा जपानी पदार्थ याच नावाच्या भांड्यात विविध जिन्नस एकत्रित करुन तयार केला जातो.वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ एकत्र येऊन एकजिनसी उत्तम पदार्थ तयार होतो, हे रूपक वापरून, वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एकत्र येऊन एक चांगलं कुटुंब तयार होऊ शकतं असा संदेश यातून दिला आहे.
“मीरम – द फायरलाईन”
माहितीपट | 33’|माणिपूर, भारत| 2021
दिग्दर्शक: जेम्स खामेग्नबाम
स्पेशल पॅकेज: द पोर्टेट्स फ्रॉम द नॉर्थ इंडिया,भारत
कथासार:
माणिपूरच्या इंफाळ शहराबाहेर असलेली लंगोलची टेकडी एरवी ओसाड असते, मात्र ऋतु कूस बदलतो तशी ही टेकडीही या शहराच्या एखाद्या झालरीसारखी नटते. जंगलात एखादी जादू झाल्यासारखा निसर्गचित्र बदलतं. लोइया, या तरुणाचं स्वप्न असतं की ही टेकडी कायमच हिरविगार असावी, त्याला तशाच समविचारी मित्रांची साथ मिळते. या सगळ्या ग्रुपची भटकंती, टेकडी हिरवीगार करण्याचे त्यांचे प्रयत्न दाखवतांनाच, वनसौंदर्य आणि जैवविविधतेचं वैविध्य चित्रपटात हळुवारपणे टिपलं आहे.
हा महोत्सव यंदा प्रथमच मिश्र म्हणजे प्रत्यक्ष आणि ऑनलाइन स्वरूपात होत असून रसिकांना नोंदणी करून चित्रपटांचा प्रत्यक्ष अथवा ऑनलाइन आस्वाद घेता येणार आहे. महोत्सव चार जून 2022 पर्यंत चालणार आहे.
* * *
PIB MIFF Team | Jaydevi PS/R.Aghor/Darshana/MIFF-9
चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms / #FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !
|
#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?
|
जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.
|
कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट उपलब्ध झाल्यावर बघता येतील.
|
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1829109)
Visitor Counter : 298