राष्ट्रपती कार्यालय

पुण्यातील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्य  महोत्सवी वर्ष कार्यक्रमात राष्ट्रपती झाले सहभागी


राष्ट्रपतींच्या हस्ते लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार 2022 प्रदान

Posted On: 27 MAY 2022 4:03PM by PIB Mumbai

 

पुण्यातील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर विश्वस्त मंडळाच्या 125 व्या शतकोत्तर रौप्य  महोत्सवी वर्ष सोहळ्यात  आज (27 मे 2022) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सहभागी होत, समारंभाला संबोधित केले.

पुण्यातील गणपती मंदिर आणि दत्तात्रेय मंदिराच्या स्थापनेसाठी दगडूशेठ कुटुंबीयांच्या योगदानाची राष्ट्रपतींनी यावेळी प्रशंसा केली.  गणेशोत्सव साजरा करण्यामध्ये  लोकमान्य टिळकांच्या कार्यात दगडूशेठ यांचा निकटचा सहभाग होता असे त्यांनी नमूद केले. आपल्या राष्ट्रीय राजकारणात गणेशोत्सवाचे अमूल्य योगदान आहे. हा सण ब्रिटीश राजवटीविरुद्ध राष्ट्रवाद आणि सामाजिक समरसतेचा स्रोत म्हणून उदयास आला आहे असे ते म्हणाले.

 

भगवान दत्तात्रेय मंदिराचे जतन आणि नुतनीकरण करण्याबरोबरच, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर विश्वस्त मंडळ गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे आणि अनाथाश्रम तसेच वृद्धाश्रमांसाठी भोजनाची व्यवस्था करणे यासारख्या विविध सामाजिक कल्याणकारी कामांमध्ये देखील सक्रीय असल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला.  दगडूशेठ कुटुंबीय आणि विश्वस्त मंडळाच्या सामाजिक आणि कल्याणकारी उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आले.

लेफ्टनंट जनरल निवृत्त डाॅ.माधुरी कानिटकर, डाॅ.भाग्यश्री पाटील, डाॅ.प्राजक्ता काळे यांना पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले.

डॉ. भाग्यश्री पाटील - उद्यानकृषी क्रांतीच्या जनक म्हणून ओळख असलेल्या राईज अ‍ँड शाईन बायोटेक प्रा. लि. च्या चेअरमन व कार्यकारी संचालिका आणि डॉ.डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ पिंपरीच्या प्र-कुलगुरुपदी डॉ.भाग्यश्री पाटील कार्यरत आहेत. अत्याधुनिक फुलांची शेती व आधुनिक पद्धतीने केळी रोपे करुन आवर्षणग्रस्त भागातील शेतक-यांना ती अल्पदरात देण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे.

डॉ.प्राजक्ता काळे - भारताच्या प्राचीन इतिहासातील वामन वृक्षकला ज्याला आधुनिक काळात बोन्साय आर्ट म्हणून जगभरात प्रसिद्धधी मिळाली, अशा भारतीय परंपरेचे जतन व संवर्धन डॉ. प्राजक्ता काळे करीत आहेत. कान्हे फाटा, मावळ येथे सुमारे 300 एकरांवर विविध प्रकारच्या बोन्साय वृक्षांची निर्मीती त्यांनी केली आहे.

डॉ.माधुरी कानिटकर - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉ.माधुरी कानिटकर सुपरिचित आहेत. त्या भारतीय सैन्यदलातील प्रथितयश वैद्यकीय अधिकारी असून बालरोगतज्ञ देखील आहेत. सैन्यदलातील परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक व सेवा पदक अशी पदके त्यांनी प्राप्त केली आहेत.

राष्ट्रपतींचे हिंदीत भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

***

S.Tupe/N.Chitale/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1828742) Visitor Counter : 170


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil