वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
देशांतर्गत पुरवठा साखळी मजबूत आणि अधिक लवचिक होण्यासाठी जेथे संधी असेल तेथे स्थानिक पातळीवर खरेदी करण्याचे पीयूष गोयल यांचे भारतीय उद्योगांना आवाहन
महागाई रोखण्यासाठी सरकारने अनेक कठोर उपाययोजना केल्या आहेत - पीयूष गोयल
Posted On:
24 MAY 2022 9:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मे 2022
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा आणि वस्त्रोद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी आज भारतीय उद्योगांना संधी मिळेल तिथे स्थानिक पातळीवर खरेदी करण्यास सांगितले जेणेकरुन देशांतर्गत पुरवठा साखळी मजबूत होऊन अधिक लवचिक बनू शकेल आणि आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीवर अत्यधिक अवलंबित्व ठेवण्याची प्रवृत्ती दूर होईल. ते आज स्वित्झर्लंडमधील दावोस येथे “व्यापार 4.0 वरील ब्रेकफास्ट सत्र चर्चा” या कार्यक्रमात बोलत होते.
विकास आणि समृद्धीवर परिणाम होऊ नये म्हणून भारताने महागाई नियंत्रित करण्यासाठी, व्याजदर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि रुपयाच्या अवमूल्यनाला लगाम घालण्यासाठी अनेक कठोर उपाययोजना केल्या आहेत यावर त्यांनी भर दिला.
मूल्यवर्धित निर्यातीला चालना देण्याकडे लक्ष देऊन कच्चा माल भारताबाहेर जाण्याऐवजी भारतात नवीन नोकर्या येतील याची खातरजमा करण्याचे आवाहन त्यांनी भारतीय उद्योगांना केले. त्या दिशेने होत असलेल्या महत्वपूर्ण प्रयत्नांवर प्रकाश टाकून गोयल म्हणाले की, सरकार किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि व्यवसायांद्वारे मूल्य आणि नोकऱ्यांमध्ये भर पडेल याची सुनिश्चिती करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
पीएम गतिशक्ती सारख्या उपाययोजनांद्वारे लॉजिस्टिक खर्च कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नावर जोर देऊन गोयल म्हणाले की राष्ट्रीय मास्टर प्लानमुळे पायाभूत सुविधांचे नियोजन सुधारण्यास तसेच वेळेत आणि अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार प्रकल्पांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात मदत होईल.
सरकार व्यवसायांना मनापासून पाठबळ देईल, असे आश्वासन देऊन त्यांनी उद्योगांना सर्व आर्थिक उपक्रमांमध्ये वाढ करण्याचे आवाहन केले.
आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळींवर अत्याधिक अवलंबित्वावर चिंता व्यक्त करून गोयल यांनी व्यवसायांना जेथे संधी असेल तेथे स्थानिक पातळीवर खरेदी करण्याचे आवाहन केले. त्यांनी व्यवसायांना एकमेकांना पाठबळ देण्यास आणि देशांतर्गत पुरवठा साखळी मजबूत करण्यात मदत करण्यास सांगितले.
संयुक्त अरब अमिरात आणि ऑस्ट्रेलियासोबत नुकत्याच झालेल्या व्यापार करारांचा संदर्भ देत गोयल म्हणाले की हे करार आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी नवीन प्रदेश खुले करत आहेत. कॅनडा, युरोपीय महासंघ, ब्रिटन, इस्रायल आणि आखाती सहकार परिषद यांच्याबरोबरचे करार प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी सांगितले. जगाला भारतावर प्रचंड विश्वास आहे आणि त्याला त्याच्याबरोबर उत्साहाने सहभागी व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यटन क्षेत्रात असलेल्या अफाट क्षमतेचा उल्लेख करून पर्यटन क्षेत्रात अधिकाधिक उद्योजकांनी यावे असे आवाहन त्यांनी केले.
जागतिक व्यापारात आघाडीची भूमिका बजावण्यासाठी तयार असलेल्या नव्या भारताच्या संहितेचे पुनर्लेखन करण्याच्या मोहिमेवर सरकार असल्याचे मंत्र्यांनी नमूद केले आणि गुंतवणूकदारांना भारतातील संकल्पना, प्रतिभा आणि अमर्याद क्षमता यांमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. भारत हे भविष्य आहे, असे गोयल म्हणाले.
S.Kulkarni/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1828069)
Visitor Counter : 232