राष्ट्रपती कार्यालय
कुंडलधाम येथील श्री स्वामीनारायण मंदिराद्वारे आयोजित युवा शिबिराला राष्ट्रपतींनी ध्वनीचित्रमुद्रित संदेशाच्या माध्यमातून केले संबोधित
Posted On:
21 MAY 2022 3:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मे 2022
कुंडलधाम येथील श्री स्वामीनारायण मंदिराद्वारे आयोजित युवा शिबिराला, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज 21 मे 2022 रोजी ध्वनीचित्रमुद्रित संदेशाच्या माध्यमातून संबोधित केले.
समाजाच्या प्रगतीमध्ये आणि देशाच्या विकासात तरुणाईची भूमिका महत्त्वाची असते, असे राष्ट्रपतींनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले. सुरळीत आणि व्यसनाविरहित आयुष्यासाठी तरुणांना सुयोग्य मार्गदर्शन देण्याची गरज असते, असेही ते म्हणाले. युवापिढीमध्ये भारतीय संस्कृतीची जीवनमूल्ये रुजवण्याच्या पवित्र उद्देशाने आयोजित युवा शिबिरात आपले विचार प्रकट करताना आनंद होत असल्याची भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली.
देवालये आणि आश्रम म्हणजे आपल्या श्रद्धेची आणि जीवनाला आकार देण्याची केंद्रे असतात त्याचबरोबर गरिबांना सहाय्य आणि रुग्णांच्या यातना कमी करण्याच्या कामाद्वारे देशसेवा करण्याचीही ती केंद्रे असतात, असे राष्ट्रपती म्हणाले. नैसर्गिक आपत्ती काळात गरजूंना मदत देऊन, गरिबांना विनामूल्य अन्न व औषधे पुरवून आणि महामारीच्या काळात देवळाचे रूपांतर कोविड रुग्णालयामध्ये करून, कुंडलधामच्या श्री स्वामीनारायण मंदिराने देशसेवेचा आदर्शच निर्माण केला आहे, अशा शब्दांत त्यांनी आयोजक संस्थेचे कौतुक केले.
हवामानबदलाने उभ्या केलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपली पारंपरिक ग्रामीण जीवनशैली जगाला मार्गदर्शक ठरू शकते, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. पर्यावरणाचे संवर्धन करून तसेच निसर्गाची सहानुभूतीपूर्वक जपणूक करून आपण आपल्या पृथ्वीला हवामानबदलासारख्या संकटांपासून वाचवू शकतो. आपल्या नद्या, सरोवरे, वृक्ष आणि सर्व सजीवांचे रक्षण करून आपण मानवजातीला वाचवू शकतो, असेही राष्ट्रपती म्हणाले. गीर जातीच्या गायींची काळजी घेणे, उतावली नदीचे संवर्धन, वृक्षारोपण, सेंद्रिय शेती आणि देवळाच्या आवारात आयुर्वेदिक वनस्पतींची व वनौषधींची लागवड अशी अनेक कामे हे मंदिर करत आहे. पर्यावरणाच्या जतन-संवर्धनासाठी मंदिर करत असलेल्या अशा विविध कामांबाबत त्यांनी कुंडलधाम श्री स्वामीनारायण मंदिराचे कौतुक केले.
राष्ट्रपतींच्या हिंदीतील भाषणासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
N.Chitale/J.Waishampayan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1827194)
Visitor Counter : 176