कृषी मंत्रालय

केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत गुजरातमध्ये जागतिक मधमाशी दिन साजरा


महाराष्ट्रासह 5 राज्यांमधील 7 मधचाचणी प्रयोगशाळा आणि प्रक्रिया एककांचे उद्घाटन

लहान शेतकर्‍यांना सक्षम बनवणे हे पंतप्रधानांचे ध्येय - कृषिमंत्र्यांचा मधमाशीपालकांना संदेश

ग्रामीण जनतेच्या प्रगतीनेच देशाची प्रगती होईल : श्री तोमर

Posted On: 20 MAY 2022 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 मे 2022

 

केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत आज जागतिक मधमाशी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशात “मधुर क्रांती” घडवून आणण्यासाठी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली सरकार अत्यंत गांभीर्याने काम करत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री श्री. नरेंद्र सिंह तोमर यांनी केले.  यानिमित्ताने केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री श्री. नरेंद्र सिंह तोमर यांच्या उपस्थितीत टेंट सिटी-२, एकता नगर, नर्मदा, गुजरात येथे राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

1.jpeg

श्री तोमर यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहून प्रदर्शनाचे उद्घाटन केले तसेच महाराष्ट्रातील पुणे, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा, बांदीपुरा आणि जम्मू, कर्नाटकातील तुमकूर, उत्तर प्रदेशातील सहारनपूर आणि उत्तराखंड येथील मधचाचणी प्रयोगशाळा आणि प्रक्रिया एककांचे उद्घाटन त्यांनी गुजरातमधून आभासी पद्धतीने केले. श्री. तोमर म्हणाले की, लहान शेतकर्‍यांना सक्षम बनवणे हे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांचे ध्येय आहे. भारतातील सुमारे 55 टक्के लोकसंख्या ग्रामीण आहे आणि जेव्हा ग्रामीण लोकसंख्येचा विकास होईल तेव्हाच देशाची प्रगती होईल, असे ते म्हणाले.

2.jpeg

'राष्ट्रीय मधमाशीपालन आणि मध अभियान' या केंद्र सरकारच्या अर्थसहाय्यातून साकार झालेल्या योजनेत 5 मोठ्या प्रादेशिक आणि 100 लहान मध आणि इतर मधमाशी उत्पादन चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे, त्यापैकी 3 जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत, तर 25 लहान प्रयोगशाळा स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहेत. भारत सरकार प्रक्रिया एककांच्या स्थापनेसाठी देखील मदत करत आहे. देशात १ लाख २५ हजार मेट्रिक टनांहून अधिक मधाचे उत्पादन होत असून, त्यापैकी ६० हजार मेट्रिक टनांहून अधिक नैसर्गिक मधाची निर्यात केली जाते. जागतिक बाजारपेठेला आकृष्ट करण्यासाठी देशांतर्गत मध उत्पादनात गुणात्मक सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने, भारत सरकार आणि राज्य सरकारे एकत्रितरित्या सुनियोजित प्रयत्न करत आहेत आणि वैज्ञानिक तंत्रांचा अवलंब करून मध उत्पादनासाठी मधमाशीपालकांची क्षमता वाढवण्यावर भर देत आहेत.


* * *

S.Patil/S.Auti/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1827073) Visitor Counter : 195


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia , Kannada