आदिवासी विकास मंत्रालय

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त केंद्रीय आदिवासी कामकाज मंत्री अर्जुन मुंडा यांनी अधोरेखित केले संग्रहालयांचे महत्त्व

Posted On: 18 MAY 2022 8:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 मे 2022

 

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त केंद्रीय आदिवासी कामकाज मंत्री अर्जुन मुंडा यांनी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात संग्रहालयांचे महत्त्व अधोरेखित केले.

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा करण्याच्या निमित्ताने जगभरातील लोकांना संग्रहालयांच्या माध्यमातून आपापला इतिहास आणि संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळते, असे ते म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त संस्कृती मंत्रालयाद्वारे 16 ते 20 मे 2022 दरम्यान संग्रहालयांमध्ये एका उत्सवाचे आयोजन होत असल्याची माहितीही त्यांनी दिली. मंत्रालयाच्या अंतर्गत चालणाऱ्या सर्व संग्रहालयांमध्ये या पूर्ण आठवड्याभरात अभ्यागतांना विनामूल्य प्रवेश दिला जात असल्याचे संग्रहालयांनी घोषित केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतातील अनुसूचित जमातींच्या इतिहासाविषयी देशाला व जगाला माहिती करून देणारी आदिवासी संग्रहालये विकसित करण्यासाठी केंद्रीय आदिवासी कामकाज मंत्रालयाची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्ययुद्धात योगदान देणाऱ्या, ब्रिटिश राजवटीला आणि शोषकांना विरोध करणाऱ्या, स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या क्षेत्रात लढे उभारणाऱ्या आदिवासी सेनानींच्या शौर्यगाथा संग्रहालयांमधून मांडण्यासाठी केंद्रीय आदिवासी कामकाज मंत्रालय कार्यरत असल्याचेही मुंडा यांनी सांगितले.

या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनी प्रत्येकाने आपल्या कुटुंबासह संग्रहालयांना भेट द्यावी आणि आपल्या देशाच्या थोर स्वातंत्र्यसेनानींच्या बलिदानाची, देशाच्या समृद्ध इतिहासाची आणि संपन्न सांस्कृतिक वर्षाची माहिती घेतली पाहिजे, अशी अपेक्षाही मुंडा यांनी व्यक्त केली.

दरवर्षी 18 मे हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन म्हणून साजरा केला जातो. भारताच्या इतिहास आणि संस्कृतीचे अनेक पैलू तसेच आपल्या पूर्वजांच्या अनेक मौल्यवान आठवणी देशाच्या संग्रहालयांमध्ये जतन करून ठेवल्या आहेत. अशा दृष्टीने, संग्रहालयांचे महत्व विशद करण्यासाठीही जगभर हा दिवस साजरा करण्यात येतो.

 

 

S.Kane/J.Waishampayan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1826495) Visitor Counter : 142


Read this release in: English , Urdu , Hindi