भारतीय निवडणूक आयोग
'लोकशाही शिखर परिषदेच्या' अनुषंगाने 100 लोकशाही देशांसोबत भागीदारी करून भारतीय निवडणूक आयोग करणार 'निवडणूक सातत्यावर' लोकशाही समूहाचे नेतृत्व
भारतीय निवडणूक आयोग इतर लोकशाही देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांसह अनुभव आणि कौशल्य सामायिक करणार
भारतीय निवडणूक आयोग निवडणूक व्यवस्थापन संस्थांसाठी अनेक क्षमता बांधणी आणि प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करणार
Posted On:
17 MAY 2022 8:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 मे 2022
अमेरिकेतील नागरी सुरक्षा, लोकशाही आणि मानवाधिकार विभागाच्या अंडर सेक्रेटरी उजरा झेया यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय अमेरिकी शिष्टमंडळाने आज नवी दिल्लीतील निर्वाचन सदन येथे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांची भेट घेतली. ‘लोकशाही शिखर परिषदेचा’ एक भाग म्हणून, भारताला ‘लोकशाही सातत्यावर लोकशाही समूहाचे’ नेतृत्व करण्याची आणि त्याचे ज्ञान, तांत्रिक कौशल्य आणि अनुभव जगातील इतर लोकशाहींसोबत सामायिक करण्याबाबत विनंती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जगभरातील निवडणूक व्यवस्थापन संस्थांना (EMBs) प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रम उपलब्ध करून देण्याची आणि इतर निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या गरजेनुसार तांत्रिक सल्लामसलत पुरवण्याची विनंती भारतीय निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे.
बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांनी भारतीय निवडणूक आयोगाचे अनुभव सामायिक केले आणि भारतीय निवडणूक आयोगाने मुक्त, निष्पक्ष, शांततापूर्ण आणि विश्वासार्ह निवडणुकांच्या आयोजनाबरोबरच त्या सर्वसमावेशक आणि प्रवेशयोग्य कशा बनवल्या हे स्पष्ट केले. केवळ मतदारांसाठीच नव्हे तर राजकीय पक्ष, उमेदवार आणि समाजातील इतर सदस्यांसारख्या सर्व हितधारकांसाठी नवीन माहिती तंत्रज्ञानाचा वापर, सर्व निवडणुकांशी संबंधित प्रक्रिया आणि मतदार सेवा अखंडित, विनासायास आणि सहभागयोग्य करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने एक उत्तम सक्षमकर्ता म्हणून घेतलेले नवीन उपक्रम त्यांनी सामायिक केले.
उजरा यांनी निवडणूक सेवांचे आधुनिकीकरण आणि निवडणुका अधिक सर्वसमावेशक आणि सुलभ बनवण्यात भारतीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेचे कौतुक केले.
आजची चर्चा 'लोकशाही शिखर परिषदेच्या' पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली होती जी डिसेंबर 2021 मध्ये अमेरिकेने आयोजित केलेल्या दोन दिवसीय आभासी कार्यक्रमाच्या रूपात सुरू झाली होती आणि आता सहभागी देशांसोबत लोकशाहीशी संबंधित विषयांवर कार्यक्रम आणि संवादांसह एक वर्षभर चालणारा हा उपक्रम झाला आहे. पहिल्या शिखर परिषदेत भारतासह 100 हून अधिक देशांचे नेते, नागरी संस्था, खासगी क्षेत्र, माध्यम प्रतिनिधी आणि इतर सहभागी झाले होते. भारताच्या पंतप्रधानांनी 9 डिसेंबर 2021 रोजी नेत्यांच्या पूर्ण सत्राला संबोधित केले होते . या शिखर परिषदेनंतर, अमेरिकेने लोकशाहीशी संबंधित विषयांवर कार्यक्रम आणि संवादांसह 2022 च्या अखेरीस व्यक्तिशः 'लोकशाहीसाठी नेत्यांची शिखर परिषद' आयोजित करण्यासाठी "कृती वर्ष" प्रस्तावित केले होते.
S.Kulkarni/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1826161)
Visitor Counter : 463