सांस्कृतिक मंत्रालय
नवी दिल्ली येथील राष्ट्रीय वस्तू संग्रहालयात 16 ते 20 मे 2022 या दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय वस्तू संग्रहालय दिवस 2022 साजरा होणार
राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाच्या सभागृहात दर संध्याकाळी थेट सादरीकरणाचे विशेष कार्यक्रम होणार
Posted On:
15 MAY 2022 4:46PM by PIB Mumbai
आंतरराष्ट्रीय वस्तू संग्रहालय दिवस 2022 निमित्त नवी दिल्ली येथील राष्ट्रीय वस्तू संग्रहालय पाच दिवस युवा आणि प्रौढांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे.
या अंतर्गत सांस्कृतिक संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र (CCRT) द्वारका, माता सुंदरी महाविद्यालय दिल्ली आणि भारतीय सांस्कृतिक पोर्टल यांच्या सहयोगाने शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर होणाऱ्या संग्रहालय प्रशिक्षक संमेलनात दिल्लीतल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या वस्तू संग्रहालयांचे प्रतिनिधी सहभागी होतील. या कार्यक्रमानंतर होणाऱ्या हेरीटेज लॅब, फ्लो इंडिया, अक्सेस फॉर ऑल आणि हेरीटेज फॉर एज्युकेटर या संमेलनांचे सह आयोजन राष्ट्रीय वस्तू संग्रहालय करणार आहे. सरकारी वस्तू संग्रहालयांच्या प्रशिक्षकांना एका व्यासपीठावर एकत्र आणून त्यांच्या पुढील संधी, आव्हाने आणि त्यावरचे सहज साध्य उपाय यावर चर्चा घडविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाच्या पुढाकाराने प्रशिक्षक संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची वेळ 18, 19 आणि 20 मे रोजी वाढवण्यात आली असून ते सकाळी 10 ते रात्री 9 या वेळात खुले राहील. कामकाजाची अतिरिक्त वेळ लक्षात घेता संग्रहालयाचे क्युरेटर, सल्लागार आणि अन्य सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली गॅलेरी वॉक आयोजित करण्यात आली आहे. लहान मुलांसाठी आणि आगन्तुक यांच्यासाठी राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाचे संवर्धक विशेष सत्र आयोजित करतील. विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लहान मुलांसाठी संग्रहालयाची विशेष फेरी आणि उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाच्या सभागृहात दर संध्याकाळी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातील. हे कार्यक्रम रोज संध्याकाळी ७ वाजता सुरु होतील. 18 मे रोजी SADHO बॅन्डचा सुफी संगीताचा कार्यक्रम होईल. 19 मे रोजी सुधा जगन्नाथन आणि त्याचे नृत्य पथक भरतनाट्यम सादर करतील. शगुन बुटानी आणि त्यांचे पथक 'अभिसार' हा नृत्याविष्कार सादर करतील. यावेळी सादर होणाऱ्या ओडिसी नृत्याच्या पारंपरिक कलाविष्काराचे पडसाद राष्ट्रीय वस्तू संग्रहालयातल्या ऐतिहासिक कला कृतींमधून उमटतील.
विविध वयोगटाच्या, पार्श्वभूमीच्या, आवडी-निवडीच्या अनुभव समृद्ध अभ्यागतांना राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाच्या भेटीमधून अद्वितीय अनुभूतीचा प्रत्यय मिळतो. त्यांच्यामध्ये इतिहास आणि कलेविषयी जागृती निर्माण करण्याचा राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाचा प्रयत्न असतो. समाज आणि राष्ट्र निर्माण, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सांस्कृतिक आदान-प्रदान या कामात वस्तू संग्रहालये बजावत असलेल्या महत्वाच्या भूमिकेबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी दर वर्षी 18 मे रोजी जगातली सर्व वस्तू संग्रहालये आंतरराष्ट्रीय वस्तू संग्रहालय दिवस साजरा करतात.
Click here for complete schedule
***
S.Kane/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1825538)
Visitor Counter : 339